पाण्याअभावी तडफडून काळविटाचा मृत्यू
By Admin | Updated: April 16, 2016 00:05 IST2016-04-15T23:28:09+5:302016-04-16T00:05:14+5:30
बीड : दुष्काळी स्थितीमुळे वन्यप्राण्यांच्या जगण्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, गुरूवारी पाण्याच्या शोधार्थ भटकंती करणाऱ्या एका काळविटाचा मानेवाडीत तडफडून मृत्यू झाला.

पाण्याअभावी तडफडून काळविटाचा मृत्यू
बीड : दुष्काळी स्थितीमुळे वन्यप्राण्यांच्या जगण्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, गुरूवारी पाण्याच्या शोधार्थ भटकंती करणाऱ्या एका काळविटाचा मानेवाडीत तडफडून मृत्यू झाला.
मानेवाडी व परिसरात पाण्याची समस्या अतिशय बिकट आहे. हंडाभर पाण्यासाठी वन्यप्राण्यांना रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे वन्यप्राणी मानवी वस्तीकडे धाव घेऊ लागले आहेत. गुरुवारी दुपारी एक काळविट पाण्याच्या शोधार्थ भटकत होते. मात्र, दूरपर्यंत पाणी न मिळाल्याने त्याचा तडफडून मृत्यू झाला. दरम्यान, काळविट तेथेच पडून होते. वनविभागाचे अधिकारी मानेवाडीकडे फिरकलेही नाही.
याबाबत तालुक्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. पी. काळे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, वनविभागाचे कर्मचारी पाठविण्यात आले आहेत. सध्या सर्वत्रच दुष्काळीस्थिती आहे. त्यामुळे चारा- पाण्याची समस्या आहे. (प्रतिनिधी)
वनविभागाचे दुर्लक्ष; वन्यप्राण्यांची हेळसांड
मानेवाडी परिसरात काळविट, हरिण आदी वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात आहेत. दुष्काळी स्थितीत त्यांच्यासाठी चारा- पाण्याची सोय करावी, अशी मागणी वनविभागाकडे केली होती; परंतु अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले, असा आरोप शिवसंग्रामचे पांडुरंग आवारे यांनी केला. चारा-पाण्याअभावी काळविटाला जीव गमवावा लागला. उपाययोजना न केल्यास इतर वन्यप्राणीही दगावतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. वनाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.