कल्पनाला एडस्ने पुन्हा ‘अनाथ’ केले

By Admin | Updated: June 10, 2014 00:41 IST2014-06-10T00:41:13+5:302014-06-10T00:41:26+5:30

सोमनाथ खताळ, बीड लहानपणीच आई-बाबा गेले. अनाथाश्रमात वाढत असताना एका महिलेने जवळ केले. मायेची ऊब दिली. लग्नाचे वय झाले. चांगला नवरा पाहून मुलीचे हात पिवळे केले. दीड वर्ष सुखाचा संसार चालला.

Kalpana Edsan again made 'orphan' | कल्पनाला एडस्ने पुन्हा ‘अनाथ’ केले

कल्पनाला एडस्ने पुन्हा ‘अनाथ’ केले

सोमनाथ खताळ, बीड
लहानपणीच आई-बाबा गेले. अनाथाश्रमात वाढत असताना एका महिलेने जवळ केले. मायेची ऊब दिली. लग्नाचे वय झाले. चांगला नवरा पाहून मुलीचे हात पिवळे केले. दीड वर्ष सुखाचा संसार चालला. घरात पाळणा हालला आणि सारेच बदलले. कन्यारत्न पाहून साऱ्यांनाच आनंद झाला असताना आईला एडस्ची लागण झाल्याचे समोर आले. पायाखालची जमीनच सरकली. प्रेम करणारे सारेच हात दुरावले. मुलाचे दुसरे लग्न करण्यासाठी सासरच्यांनी एका क्षणात तिला पुन्हा ‘अनाथ’ करुन टाकले.
कल्पना (२७ नाव बदललेले) आई-बाबाविशषयी फारसे आठवत नाही. ते गेल्याने अनाथ आश्रम हेच घर बनले. पुढे पुण्यातील एका कामगार महिलेने दत्तक घेत कल्पनाला मायेची ऊब दिली. पाहता-पाहता कल्पना लग्नाला आली. पुण्यातील कात्रज भागात राहणाऱ्या व एका खासगी कंपनीत नोकरी करणाऱ्या मुलासोबत तिचे लग्न लावून देण्यात आले. काही दिवसांत गुड न्यूज मिळाली. अनाथ कल्पनाला आकाश ठेंगणे झाले. सासरचे लोकही आनंदले. कल्पनाने गोंडस मुलीला जन्म दिला. कल्पनाची प्रसूती झाल्यानंतर डॉक्टरांनी दिलेल्या अहवालात तिला एड्सची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आणि सुखाच्या संसारात मिठाचा खडा पडला. प्रेमाचे हात दुरावले. मुलाचा दुसऱ्या लग्नाचा विचार सुरू झाला. या विचारांनी सोमवारी टोक गाठले. सासू-सासरा आणि एका शेजारच्या महिलेने कल्पनाला उपचाराचे कारण सांगून थेट बीड गाठले आणि इन्फंड इंडिया संस्थेत तिला दाखल केले. तिच्या आठ महिन्यांच्या मुलीला सोबत घेऊन ते सर्वजण पुण्याला परतले. या संस्थेत अशा ५३ एचआयव्हीबाधितांचा सांभाळ केला जात आहे. कल्पना सध्या गरोदर आहे. आपल्या मुलीचा आणि पतीचा अहवाल निगेटीव्ह असल्याचे ती सांगते. एचआयव्हीची लागण झाल्याचे कळल्यानंतर पुन्हा गर्भ ठेवण्याचा निर्णय दोघांनीही घेतला का, या प्रश्नाचे उत्तर ती देऊ शकली नाही. फारसे काही बोलण्याच्या मनस्थितीत नसलेल्या कल्पनाला लहानपणी माकड आणि कुत्र्याने चावले. तब्बल ३९ इंजेक्शन त्यावेळी घ्यावे लागले. यातूनच एड्सची लागण झाली असावी, असा दावा ती करते. कल्पनाला मायेची उब देण्याचे प्रयत्न आम्ही करू असे इन्फंड इंडीया संस्थेचे संचालक दत्ता बारगजे, संध्या बारगजे यांनी सांगितले.
बाळाची आठवण येतेय!
माझी चिमुकली अवघ्या आठ महिन्यांची आहे. ती खूप गोड आहे. मला इकडे सोडताना तिला भेटूसुद्धा दिले नाही. मला तिची खूप आठवण येतेय. माझ्या चिमुकलीला चांगले सांभाळावे, एवढीच माझी इच्छा असल्याचेप सांगताना कल्पनाच्या आश्रूंचा बांध फुटला.

Web Title: Kalpana Edsan again made 'orphan'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.