कलावतीचा केला नियोजनपूर्वक खून
By Admin | Updated: July 29, 2015 00:48 IST2015-07-29T00:44:48+5:302015-07-29T00:48:00+5:30
! तामलवाडी : तामलवाडी शिवारात झालेल्या कलावती महंतू यांच्या खून प्रकरणात वापरण्यात आलेली कार पोलिसांनी ताब्यात घेतली असून, कारचालकालाही जेरबंद करण्यात आले

कलावतीचा केला नियोजनपूर्वक खून
!
तामलवाडी : तामलवाडी शिवारात झालेल्या कलावती महंतू यांच्या खून प्रकरणात वापरण्यात आलेली कार पोलिसांनी ताब्यात घेतली असून, कारचालकालाही जेरबंद करण्यात आले आहे़ मात्र, आरोपी सिद्धाराम खांडेकर याने कारमध्येच लोखंडी चैनने कलावती यांना मारहाण करून गळा आवळला होता़ या मारहाणीत कलावती या गंभीर जखमी झाल्या होत्या़ त्यानंतर तामलवाडी- गंजेवाडी मार्गावर कार नेवून दगडाने ठेचून त्यांचा खून करण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली आहे़ यामुळे सिद्धाराम खांडेकर याने कलावती महंतू यांचा खून नियोजनपूर्वकच केल्याचे दिसत आहे़ तामलवाडी-गंजेवाडी रस्त्यावर २२ जुलै रोजी रात्री साडेनऊ वाजता कलावती शंकरकुमार महंतू या महिलेचा खून केल्याची घटना समोर आली होती़ चुलती कलावती हात उसणे घेतलेल्या दोन लाख रूपये परत दे म्हणून तगादा लावत असल्याने सिद्धाराम खांडेकर याने त्यांचा खून केल्याचे समोर आले होते़ खून होण्यापूर्वी खांडेकर याने सोलापूर येथे २२ जुलै रोजी कलावती यांना बोलावून घेतले होते. नंतर त्याने गावाकडे ओमिनी (क्र.एम.एच.२१ बी. ४००) ही ९०० रुपये भाड्याने करुन सिद्धराम खांडेकर याने सोलापूर बसस्थानकावर येवून कलावतीची भेट घेतली. नंतर त्याने कलावतीस कारमध्ये बसवून बाळे सोलापूर येथे सिद्धापाच्या मावशीच्या घरी नेले. रात्री साडेसात वाजता चालकासह सर्वांनी मिळून भोजन केले. तेथून चालकास सांगितले की, ही महिला पैसे देणार आहे. तुळजापूरला जायचे आहे, असे सांगून कार तुळजापूर रस्त्यावर येताना कलावती व सिद्धाराम यांच्यामध्ये भांडण सुरु झाले. सिद्धाराम याने लोखंडी चैनने कलावतीचा गळा आवळू लागला. डोक्यात चैन मारुन तिला जखमी केले. तामलवाडी येथे आल्यानंतर कार अंधारात गंजेवाडी रस्त्यावर घालण्यास सांगितले. काही अंतरावर आल्यावर रस्त्यालगत कार उभी केली. अन् कलावतीस हाताला धरुन शेतात ओढीत नेले. त्यावेळी कार चालक कलाप्पा ज्ञानेश्वर खांडेकर (रा. हालचिंचोली ता. अक्कलकोट) हा सिद्धाराम खांडेकर यास ‘मारु नको मी तुझी माफी मागतो’, अशी विनवणी करीत होता़ परंतु सिद्धाराम याने नियोजन करुन कलावतीच्या छातीवर बसून दगडाने ठेचून तोंडावर मारुन तिचा साडेनऊ वाजता खून केला. नंतर १ वर्षाची मुलगी कारमध्ये झोपली होती. तिला हाताला धरुन मयत कलावती हिच्या प्रेताजवळ फेकून दिले आणि ही घटना कुणाला सांगितली तर तुलाही जिवंत मारीन अशी धमकी कारचालक कलाप्पा खांडेकर यास दिली. नंतर कार गंजेवाडीमार्गे सुरतगाव येथे आली. सिद्धाराम याने कारमध्ये रक्ताने मारखलेले कपडे बदलून दुसरे कपडे घातले व तुळजापूर गाठले. तेथून ईटकळमार्गे रात्री हालचिंचोली गाव गाठल्याचे तपासात उघडकीस आले. केवळ उसने पैसे मागण्यासाठी तगादा लावत असल्याने पुतण्याने चुलतीचा काटा काढल्याचे उघड झाले. सोमवारी गुन्ह्यात वापरलेली ओमिनी कार व तिच्या चालकास सपोनि मिर्झा बेग, पोउपनि सुरेश शिंदे, हरिष गायकवाड, ताटे, राजेंद्रसिंह ठाकूर यांनी अक्कलकोट तालुक्यातील हालचिंचोली येथे जावून ताब्यात घेतले. (वार्ताहर)