कलाग्राममध्ये लोककला महोत्सव
By Admin | Updated: February 10, 2015 00:32 IST2015-02-10T00:12:32+5:302015-02-10T00:32:38+5:30
औरंगाबाद : सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे १३ ते १५ फेब्रुवारीदरम्यान, कलाग्राममध्ये पहिल्या कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

कलाग्राममध्ये लोककला महोत्सव
औरंगाबाद : सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे १३ ते १५ फेब्रुवारीदरम्यान, कलाग्राममध्ये पहिल्या कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात विविध राज्यांमधील कलावंत सहभागी होणार आहेत. १२ फेब्रुवारी रोजी शोभायात्रा काढण्यात येणार आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालय, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर, पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक कें द्र, उदयपूर, जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दररोज सायंकाळी ६.३० ते रात्री ९.३० पर्यंत कला महोत्सव होणार आहे.
सात राज्यांतील लोककलाप्रकार बघण्याची संधी शहरवासीयांना मिळणार आहे. गरवारे कम्युनिटी सेंटर महोत्सवाच्या आयोजनासाठी सहकार्य करीत आहे. महोत्सवात महाराष्ट्रासह जम्मू-काश्मीर, छत्तीसगड, कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश या राज्यांतूनही २०० कलाकार विविध कलाकृती सादर करणार आहेत. १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होईल. यावेळी जिल्हाधिकारी विक्रमकुमार, महापालिका आयुक्त प्रकाश महाजन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.
स्थानिक कलाकारांसाठी नूपुर महोत्सव ठेवण्यात आला आहे. पहिल्या दिवशी व्ही. सौम्यश्री व देवमुद्रा संस्थेचे विद्यार्थी नृत्याविष्कार सादर करतील. तसेच विक्रांत वायकोस यांचे शिष्य भरतनाट्यम सादर करतील. १५ रोजी पार्वती दत्ता यांचे शिष्य कथ्थक नृत्य सादर करतील.
१२ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता क्रांतीचौकातून शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या मैदानावर शाभायात्रेचे विसर्जन होईल. रसिकांनी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक अजय अंबेकर, द. म. क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक डॉ. पीयूष कुमार आणि पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक फुरकान खान यांनी केले आहे.