कदीर मौलाना यांचा राष्ट्रवादीचा राजीनामा
By Admin | Updated: October 6, 2014 00:43 IST2014-10-06T00:25:46+5:302014-10-06T00:43:21+5:30
औरंगाबाद : अब्दुल कदीर मौलाना यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे रविवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले.

कदीर मौलाना यांचा राष्ट्रवादीचा राजीनामा
औरंगाबाद : पक्षाचे नेतृत्व अल्पसंख्याक समाजाची फसवणूक करणारे आहे, अशी तोफ डागत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि औरंगाबाद मध्य मतदारसंघातून तिकीट नाकारलेले अब्दुल कदीर मौलाना यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे रविवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पाडा, असे यापुढे आपले धोरण असल्याचे सांगत त्यांनी काँग्रेसला पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले.
कोणत्या पक्षात जायचे याचा निर्णय कार्यकर्त्यांची बैठक झाल्यानंतर घेणार असलो तरी सध्या काँग्रेससारख्या धर्मनिरपेक्ष पक्षाशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे ते म्हणाले. औरंगाबाद मध्य मतदारसंघात २००९ च्या निवडणुकीत आपल्याला पक्षाने तिकीट दिले आणि काही लोकांनी विरोधात काम करून पाडले. तरीही मुस्लिम समाजाच्या मतदानावर दुसऱ्या क्रमांकावर येत मी पक्षाची लाज राखली. मी मतदारसंघात पक्षाचे वर्चस्व कायम ठेवले. मुस्लिम समाजाला विश्वास होता की, पक्ष मला किंवा दुसऱ्या मुस्लिम कार्यकर्त्याला उमेदवारी देईल. मराठवाड्यात औरंगाबाद मध्य हाच एकमेव मतदारसंघ आहे, जेथून मुस्लिम उमेदवार निवडून येऊ शकतो. १८ सप्टेंबर रोजी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मला तिकीट पक्के असून कामाला लागण्याचे आदेश दिल्याने मी येथे फटाकेही फोडले. मात्र, नंतर युती आणि आघाडी बिघडल्यानंतर आपले तिकीट कापून मराठा समाजाच्या उमेदवाराला देण्यात आले. यामुळे पक्षाचा खरा चेहरा उघड झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची आतून जातीयवादी पक्षांशी युती असून, मुस्लिम समाजाने यापुढे काँग्रेसला समर्थन दिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
पक्षाचे नेते अजित पवार यांच्यावरही त्यांनी टीका केली. ते हुकूमशहा असून पक्षाचे कार्यकर्ते म्हणजे गुलाम समजतात. दलित, मुस्लिम, अल्पसंख्याक समाजाला या पक्षात न्याय देत नाहीत. दलित समाजासाठीची ७ कोटी रुपयांची उद्योग योजनाही अजित पवार यांनी रोखून धरली, असे ते म्हणाले. या पक्षात मराठेतरांना पद्धतशीरपणे बाजूला केले जाते. हा पक्ष म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाल्याचा आरोपही त्यांनी केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरजितसिंग खुंगर, पक्षाचे शहर उपाध्यक्ष हाजी इसा कुरेशी आणि नवाब पटेल यांनीही पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे जाहीर करण्यात आले.