औरंगाबाद : शहराला मागील एक महिन्यापासून कचऱ्याचा प्रश्न भेडसावत असताना पुन्हा एकदा महापालिका सर्वसाधारण सभेत तब्बल दोन तास चर्चा करण्यात आली. यातून ठोस असा कोणताच निर्णय घेण्यात आला नाही. नाशिक येथील एक संस्था मंगळवारपासून रस्त्यावर पडलेल्या कच-यावर जागीच प्रक्रिया करणार असल्याची घोषणा करण्यात आली. आता हा प्रयोग कितपत यशस्वी होतो हे लवकरच दिसून येईल.
सोमवारी सकाळी ११.३० वाजता सभेला सुरुवात होताच सवयीनुसार नगरसेवकांनी कच-यावर हल्लाबोल केला. सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. काहींनी प्रशासनाला यातून मार्ग कसा काढायचा, याचा सल्लाही दिला. ज्या वॉर्डांमध्ये ओला व सुका कचरा वेगळा करून ओल्या कच-यावर प्रक्रिया सुरू आहे त्या लोकप्रतिनिधींनी आमचा आदर्श घ्यावा, असेही नमूद केले. प्लास्टिक, कॅरिबॅगवर शंभर टक्के बंदी घालावी, अॅक्शन प्लॅन तयार करावा, आदी असंख्य मागण्या करण्यात आल्या. या चर्चेत नगरसेवकांनी भाग घेतला. दीड तासाच्या चर्चेनंतर प्रभारी आयुक्त नवल किशोर राम यांनी माईकचा ताबा घेतला.
शहरातील रस्त्यावर फक्त एक हजार मेट्रिक टन कचरा असल्याचा दावा त्यांनी केला. कच-यावर प्रक्रिया करण्यासाठी ८६ कोटींचा डीपीआर मंजूर झाला आहे. यामध्ये नारेगाव येथील कच-यावर प्रक्रिया करण्याचा उल्लेख नाही. नारेगावच्या कच-यावर ५० कोटींपेक्षा अधिक रक्कम लागेल. ती मनपा फंडातून करावी लागणार आहे. सध्या साचलेल्या कच-यावर प्रक्रिया करण्याचे मोठे आव्हान आहे. नाशिकच्या कुंभमेळ्यात ज्या संस्थेने काम केले त्या संस्थेला पाचारण करण्यात आले असून, मंगळवारपासून ही संस्था काम करणार आहे. कचरा वेचकांना मानधन देऊन काम करून घेतले जाणार आहे. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी वॉर्डनिहाय बैठका घेण्यात येतील.उद्या डीपीआरची अंमलबजावणी करायची तर २७ ठिकाणी कचºयावर प्रक्रिया करणा-या मशीन कुठे लावणार, हा मोठा प्रश्न, असेही त्यांनी नमूद केले.