बस नाही धड, प्रवास जड
By Admin | Updated: December 4, 2014 00:55 IST2014-12-04T00:24:50+5:302014-12-04T00:55:20+5:30
सोमनाथ खताळ / राजेश खराडे, बीड ‘बसचा प्रवास, सुखाचा प्रवास’ असे अविर्भावात सांगणाऱ्या एसटीचा प्रवास सुखाचा नव्हे तर वेदना अन् दु:खाचा झाला आहे. फुटलेले आरसे, तुटलेल्या खिडक्या, नादुरुस्त वायपर,

बस नाही धड, प्रवास जड
सोमनाथ खताळ / राजेश खराडे, बीड
‘बसचा प्रवास, सुखाचा प्रवास’ असे अविर्भावात सांगणाऱ्या एसटीचा प्रवास सुखाचा नव्हे तर वेदना अन् दु:खाचा झाला आहे. फुटलेले आरसे, तुटलेल्या खिडक्या, नादुरुस्त वायपर, निकामी हेडलाईट, फाटलेले सीटकव्हर अन् खिळखिळ्या बसगाड्या रस्त्यावरुन धावत आहेत. ‘लोकमत’ने बुधवारी केलेल्या स्टींगमध्ये ही धक्कादायक बाब समोर आली.
जिल्ह्यात एक हजाराहून अधिक बसगाड्या आहेत. त्यापैकी २५ बसगाड्यांची पाहणी केली तेंव्हा एसटीचा प्रवास किती खडतर आहे याची प्रचिती आली. ‘प्रवाशी हेच आमचे दैवत’ यासारखे अनेक ब्रीदवाक्य राज्य परिवहन महामंडळाने बनविलेले आहेत़ मात्र या ब्रीद वाक्यांची तेवढ्याच काटेकोरपणे अंमलबजावणी होते का? याची पाहणी करायला सुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेळ नाही़ अधिकाऱ्यांच्या या दुर्लक्षामुळेच बीड विभागात सध्या अनेक बस गाड्या भंगार अवस्थेत धावत आहेत़ यामुळे अपघातही होत असून बसचालकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे़ बसगाड्यांना व्यवस्थित ‘ब्रेक’ नाहीत, ‘गिअर’ पडत नाहीत, ‘इंजिन’ खराब झालेले आहे, धक्का दिल्यावरच बस चालू होते, अशी स्थिती आहे. या बसगाड्यांच्या दुरूस्तीसाठी निधी आलेला असतो, साहित्यही आलेले असते तरीही बसगाड्या खिळखिळ्या कशा ? असा सवाल उपस्थित होत आहे.
कधी होणार दुरूस्ती
जिल्ह्यातील सर्वच आगारातील बसगाड्या खराब झालेल्या आहेत़ त्यामुळे अपघाताची शक्यता वर्तविली जात आहे़ एवढी गंभीर परिस्थिती असतानाही वरिष्ठ अधिकाऱ्यांना हे पाहण्यासाठी वेळही मिळत नाही़ आता या गाड्या कधी दुरूस्त होणार आणि प्रवाशांना आरामदायी प्रवास कधी मिळणार असा सवाल सर्वसामान्यांमधून उपस्थित केला जात आहे़
ब्रेकविनाच बसगाड्या सुसाट
अनेक बसगाड्यांना मागचे ब्रेकच नाहीत. समोरच्या ब्रेकवरच त्यांना स्थानकातून प्रवाशांना घेवून जावे लागते. एवढी गंभीर परिस्थिती असतानाही बसचालकही याला गांभीर्याने घेत नाहीत. अहवाल देण्यापलीकडे काहीही होत नाही. मागचे ब्रेक नसल्यामुळेच बसगाड्यांचे अपघात होत आहेत.
अनेक बसगाड्यांचे साईड इंडिकेटर गायब झालेले होते तर काहींचे फुटलेले होते.
४अनेकांचे आरसेच गायब झाल्याने बसचालकांना मागील वाहने पाहण्यासाठी चक्क बाहेर डोकावून पहावे लागत आहे.