बस खड्ड्यात कोसळली
By Admin | Updated: June 9, 2014 01:11 IST2014-06-09T00:43:12+5:302014-06-09T01:11:19+5:30
पाथरी : पाथरी- उमरा बस उमरा येथून परत येत असताना गुंज गावाजवळ बसचा स्टेरिंग रॉड तुटल्याने रस्त्याच्या बाजूला दहा फूट खोल खड्ड्यात उलटून अपघात घडला.

बस खड्ड्यात कोसळली
पाथरी : पाथरी- उमरा बस उमरा येथून परत येत असताना गुंज गावाजवळ बसचा स्टेरिंग रॉड तुटल्याने रस्त्याच्या बाजूला दहा फूट खोल खड्ड्यात उलटून अपघात घडला. या अपघातात २० प्रवासी जखमी झाले असून १२ जणांवर पाथरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. ही घटना ८ जून रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारस घडली. रस्त्यावर खड्डे असल्यामुळे ते चुकविताना हा अपघात घडला.
पाथरी आगाराची बस (क्रमांक एम.एच.०६- एक्स ८७९२) सकाळी ७.३० वाजता पाथरीहून उमरा गावाकडे निघाली होती. पाथरी, बाभळगाव, लोणी, गुंज, अंधापुरी, उमरा या मार्गावरुन ही बस उमरा येथून प्रवासी घेऊन परत निघाली. अंधापुरी ते गुंज या रस्त्यावर गुंज जवळील जायकवाडी कॅम्पच्या बाजूला या बसला सकाळी ८.३० वाजता पाथरीकडे परत येत असताना अपघात झाला. गुंज ते अंधापुरी हा रस्ता अत्यंत खराब झाल्याने या रस्त्यावरील खड्डे चुकविताना बसचा अचानक स्टेरिंग रॉड तुटल्याने बस चालकाच्या बाजूने रस्त्याच्या बाजूला १० फूट खोल खड्ड्यामध्ये कोसळली.
या बसमध्ये जवळपास ३० प्रवासी होते. अचानक अपघात घडल्याने बसमधील प्रवाशांनी आरडा-ओरड सुरु केली. याचवेळी बसच्या पाठीमागील संकटकालीन खिडकीमधून प्रवासी बाहेर पडले. अपघात घडल्यानंतर या अपघातील २० प्रवाशांना मार लागला. यातील १२ प्रवाशांना गजानन रामकिशन वाघमारे यांनी आपल्या जीपमधून (एम.एच.४४ बी.२७०२) पाथरी येथे उपचारासाठी आणले. येथील ग्रामीण रुग्णालयात जखमी प्रवाशांवर उपचार करण्यात आले. एवढा मोठा अपघात घडल्यानंतरही प्रवाशांना किरकोळ इजा झाल्या. दोन प्रवाशांना मात्र पायाला गंभीर इजा झाली.
जखमी प्रवाशांची नावे
अपघातात जखमी झालेल्या १२ प्रवाशांवर पाथरी येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. यामध्ये चंपाबाई गणपतराव पायघन (खादगव्हाण ता.माजलगाव) , शेषराव निवृत्ती इघारे (वय ६०, रा.गौडगाव ता.पाथरी), बाबूराव यादवराव कोल्हे (६५ रा.उमरा), चंद्रशेखर नंदकुमार कोल्हे (१८, रा. उमरा), सीमा शिवाजी हजारे (२६ रा. उमरा), गौतम लक्ष्मण जाधव (रा.गौडगाव), धर्मराज किशनराव हजारे (६५ रा.उमरा), नवनाथ शंकर पायघन (१४, रा.खादगव्हाण ता.माजलगाव), हरिभाऊ भिवा शेळके (रा.उमरा), कुसूम शंकरराव पाईकराव (३९, रा.खादगव्हाण ), रमेश मुरलीधर शहाणे (५०, रा.आहेरबोरगाव), रंगनाथ नारायण शिंदे (४१, रा.परभणी यांचा समावेश आहे.
पाथरी-उमरा हा रस्ता अत्यंत खराब झाल्याने यापूर्वीही दोन वेळा बसला अपघात झाला होता. खराब रस्त्यामुळे आणि बस नादुरुस्त असल्याने महामंडळाच्या बसमधून प्रवासी प्रवास करताना आता धजावत नाहीत. जखमी झालेल्या काही प्रवाशांनी बस नादुरुस्त असल्याचे सांगितले. दरम्यान, घटना घडल्यानंतर शिवसेनेचे तालुकासंघटक मुंजाभाऊ कोल्हे यांनी घटनास्थळाला भेट देऊन काही जखमी प्रवाशांना गुंज आणि पाथरी येथे उपचारासाठी हलविले. खराब रस्त्यामुळेच हा अपघात घडल्याची तक्रार यावेळी केली.