उत्कट, मधुर गायकीसह झंकारला सतारस्वर!
By Admin | Updated: October 19, 2014 00:39 IST2014-10-19T00:35:29+5:302014-10-19T00:39:34+5:30
औरंगाबाद : घरंदाज, संपन्न गायकी आणि मुग्ध करणाऱ्या सतार-तबल्याच्या जुगलबंदीचा मंतरलेला माहोल शनिवारी रसिकांनी अनुभवला.

उत्कट, मधुर गायकीसह झंकारला सतारस्वर!
औरंगाबाद : घरंदाज, संपन्न गायकी आणि मुग्ध करणाऱ्या सतार-तबल्याच्या जुगलबंदीचा मंतरलेला माहोल शनिवारी रसिकांनी अनुभवला. वाराणसीचे युवा कलावंत पं. नरेंद्र मिश्र यांचे सतारवादन आणि ख्यातनाम शास्त्रीय गायिका कल्पना झोकरकर यांच्या गायनाने कलेच्या अस्पर्शित क्षितिजांचे दर्शन श्रोत्यांना घडविले.
दूरदर्शन व आकाशवाणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आकाशवाणी संगीत संमेलनाच्या ६१ व्या वर्षाच्या या कार्यक्रमात या दोन कलावंतांनी रंग भरला. पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह, सुशीला नेरळकर, आकाशवाणीचे सहायक संचालक सिद्धार्थ मेश्राम, कार्यक्रमाधिकारी उन्मेष वाळिंबे, वृत्तसंपादक रमेश जायभाये उपस्थित होते.
मैफलीच्या पूर्वार्धात पं. मिश्र यांच्या बोलक्या सतारस्वरांनी वातावरणात रंग भरला. तबल्यावर पुंडलिक कृष्ण भागवत यांची जाणती साथसंगत होती. यावेळी राग जोग व मालकंस हे दोन रात्रकालीन राग त्यांनी सादर केले. पिलू रागातील ठुमरीने त्यांनी सांगता केली तेव्हा रसिकांची दाद आसमंतात घुमत होती. उत्तरार्धात कल्पना झोकरकर यांच्या संयत गायकीने श्रोत्यांना खिळवून ठेवले. त्यांनी सुरुवातीस राग बागेश्री व कलावती सादर केला. चमत्कृतीपूर्ण लयकारी आणि तानांच्या लडीची विलक्षण नजाकत उलगडत थाटात गायलेल्या टप्पा प्रकाराने सांगता केली.
ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. नाथ नेरळकर यांचा यावेळी गौरव करण्यात आला. या हृद्य सत्काराने भारावून जात आकाशवाणीशी असलेले जुने ऋणानुबंध नेरळकर यांनी जागविले. संगीत संमेलनासाठी आकाशवाणी व दूरदर्शनने एकत्र येणे ही कोजागरी आहे अशी भावना व्यक्त करीत ते म्हणाले की, औरंगाबाद आकाशवाणीच्या उद्घाटनाच्या दिवशीच गाण्याचा बहुमान मला मिळाला होता. आता कुठे ऐंशी वर्षांचा झालोय! असेच सन्मान मिळत राहिले तर त्या ऊर्जेवर अजूनही दीर्घकाळ गात राहीन, अशी टिप्पणीही त्यांनी केली. नितीन देशपांडे व प्रियंवदा सावंत यांनी मैफलीचे नेटके निवेदन केले.