पत्रकारांनी समाजामध्ये मिसळण्याची गरज

By Admin | Updated: January 6, 2015 01:07 IST2015-01-06T01:03:31+5:302015-01-06T01:07:24+5:30

कळंब : सर्वच क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहेत. तसाच बदल पत्रकारितेमध्ये झाला आहे. या बदलाबरोबर पत्रकारांनी स्वत:मध्येही काळानुरूप बदल करण्याची आवश्यकता असून,

Journalists need to mix in society | पत्रकारांनी समाजामध्ये मिसळण्याची गरज

पत्रकारांनी समाजामध्ये मिसळण्याची गरज


कळंब : सर्वच क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहेत. तसाच बदल पत्रकारितेमध्ये झाला आहे. या बदलाबरोबर पत्रकारांनी स्वत:मध्येही काळानुरूप बदल करण्याची आवश्यकता असून, नेमके प्रश्न, स्थित्यंतरे समजून घेण्यासाठी पत्रकारांनी समाजामध्ये मिसळण्याची गरज असल्याचा सूर सोमवारी कळंब तालुका पत्रकार संघाच्या वतीने पार पडलेल्या पुरस्कार वितरण समारंभातून उमटला.
ज्येष्ठ पत्रकार यमाजी मालकर, राजेंद्र हुंजे, रवींद्र तहकीक, संतोष देशपांडे, प्राचार्य अशोक मोहेकर, नगराध्यक्षा मिराताई चोंदे यांच्या उपस्थितीत कळंब तालुका पत्रकार संघाच्यावतीने विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी मालकर यांनी मार्गदर्शन केले. पत्रकारिता या क्षेत्रात आता पूर्वीप्रमाणे अजाणतेपणी कोणी येऊ नये. तर या क्षेत्रात करिअर करायचा ठाम निश्चय करून उतरावे. त्यासाठी पत्रकारांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करतानाच पत्रकारितेचा शास्त्रशुध्द अभ्यास करण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. बातमीदारी करताना नेमकेपणा ओळखता आला पाहिजे. त्यासाठी बातमीमध्ये आकडेवारीला महत्त्व दिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. माध्यमात बदल घडत असला तरी चिंतनाआधारित ठाम भूमिका घेऊन या क्षेत्रात उतरल्यास भविष्य उज्वल असल्याचे ते म्हणाले.
राजेंद्र हुंजे यांचेही यावेळी भाषण झाले. समाज बदलताना माध्यमांची त्याअनुरूप भाषा बदलत असते. अशा वेळी कोणत्या चौकटीत जावे, असा प्रश्न पत्रकाराला पडतो. समाजातील अनेक घटक पत्रकारांकडे केवळ कामापुरते पाहतात, याबाबत खंत व्यक्त करीत तंत्रज्ञान प्रगत होत असताना आपल्याकडे आलेल्या माहितीची सत्यता पत्रकारांनी पडताळावी, असे ते म्हणाले. माध्यमाच्या परिपक्वतेबाबत अनेकदा चर्चा होते. मात्र, समाजामध्ये ज्या घटना-घडामोडी घडतात, त्याचेच प्रतिबिंब माध्यमात उमटते, असेही त्यांनी सांगितले. ज्येष्ठ पत्रकार रवींद्र तहकीक यांनी माध्यमे बदलत आहेत. मात्र, पत्रकारांनी ठोस भूमिका घेऊन या क्षेत्रात कार्यरत राहिल्यास त्याच्या झळा पत्रकारांना सोसाव्या लागणार नाहीत, असे सांगितले. यावेळी संतोष देशपांडे, प्राचार्य अशोक मोहेकर, मीराताई चोंदे यांचीही भाषणे झाली. ज्येष्ठ पत्रकार रणजीत खंदारे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी प्रास्ताविकात सतीश टोणगे यांनी पत्रकार संघाची भूमिका विषद करीत संघातर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. सूत्रसंचालन प्राचार्य जगदिश गवळी यांनी तर आभार रमेश अंबीरकर यांनी मानले. कार्यक्रमास कळंब तालुक्यासह जिल्ह्यातून पत्रकारांची उपस्थिती होती. (वार्ताहर)४
कळंब तालुका पत्रकार संघाच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार रणजीत खंदारे (औरंगाबाद) यांना कै. ज्ञानदेव मोहेकर गुरूजी राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने गौरविण्यात आले तर कै. शिवशंकर धोंगडे जिल्हास्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने ‘लोकमत’चे जिल्हा प्रतिनिधी विशाल सोनटक्के (उस्मानाबाद) यांचा सन्मान करण्यात आला. संतोष जाधव (उस्मानाबाद), यांना विधायक वृत्त वाहिनी पुरस्कार तर कै. राई काकडे उत्कृष्ट पुरस्काराने श्रीकृष्ण कोल्हे (पुणे), आणि कै. गणेश घोगरे पत्रकारिता पुरस्काराने विकास गाढवे (लातूर) यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष शिवाजी कापसे, अजीत पिंगळे, लक्ष्मण आडसूळ, बाळकृष्ण तांबारे, संजय पाटील दुधगावकर, आप्पासाहेब शेळके, रामलिंग आवाड, संजय घुले, मुश्ताक कुरेशी, पांडुरंग कुंभार, प्रा. श्रीधर भवर, प्रा. बाळकृष्ण भवर, प्रा. डॉ. संजय कांबळे, अतुल कवडे, सुरेश टेकाळे, डॉ. रामकृष्ण लोंढे आदींची उपस्थिती होती. याच कार्यक्रमात सतीश टोणगे यांच्या ‘प्रेम हे असंच असतं’ या पुस्तकाचे, पुणे येथील संतोष देशपांडे यांच्या ‘पत्रकार मित्र’ तर कसबे गुरूजी यांच्या ‘एकुलता’ या आत्मचरित्राचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

Web Title: Journalists need to mix in society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.