बचत गटाच्या महिलांची थट्टा

By Admin | Updated: June 25, 2014 01:05 IST2014-06-25T00:21:50+5:302014-06-25T01:05:19+5:30

उस्मानाबाद : कळंब तालुक्यातील शिराढोण येथील शहाजमानी महिला बचत गटाला वीजबिल वितरण आणि रीडिंंग घेण्याचे काम देण्यात आले होते.

Jokes of the Savings Group | बचत गटाच्या महिलांची थट्टा

बचत गटाच्या महिलांची थट्टा

उस्मानाबाद : कळंब तालुक्यातील शिराढोण येथील शहाजमानी महिला बचत गटाला वीजबिल वितरण आणि रीडिंंग घेण्याचे काम देण्यात आले होते. मात्र मागील तीन महिन्यांपासून संबंधित बचत गटाला त्यांच्या कामाचा मोबदला मिळालेला नाही. वारंवार मागणी करुनही वीज कंपनीकडून दखल घेतली गेली नसल्याने अखेर २४ जून रोजी संबंधित महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे.
शिराढोण येथील शहाजमानी महिला बचत गटाला मागील तीन वर्षापूर्वी वीजबिल वितरण आणि रीडिंगचे काम सोपविण्यात आले होते. सध्याही फोटो मीटर रीडिंगचे काम कंपनीच्या वेळापत्रकानुसार सुरु आहे. मात्र जून २०१३ पासून कळंबच्या वीज कार्यालयाकडून महिला बचत गटाला सहकार्य केले जात नसल्याचे महिलांचे म्हणणे आहे. केलेल्या कामाच्या आॅर्डरही अधिकाऱ्यांकडून अडवून धरल्या जात आहेत. वर्क आॅर्डर देण्यासाठी अधिकाऱ्यांकडून पैशाची मागणी केली जात आहे. त्यामुळे संबंधित महिला बचत गटाची कोंडी झाली आहे.
परिणामी सदस्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. या प्रकरणामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून महिला बचत गटाला त्यांच्या कामाचा मोबदला मिळवून द्यावा, असेही बचत गटाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु करण्यात आलेल्या उपोषणात बचत गटाच्या अध्यक्षा मलेका फेरोज पठाण, सचिव हलीमा मुन्शी कुरेशी यांच्यासह आदींची उपस्थिती होती. या आंदोलनाला यशस्विनी अभियानच्या जिल्हा समन्वयक मनीषा राखुंडे, नेहरु युवती व साई सखी महिला मंडळाच्या अध्यक्षा मंजुषा खळदकर, यशस्विनी महिला बचत गटाच्या अंजली पाटील, गरुडझेप महिला बचत गटाच्या सदस्या आशा राखुंडे, साक्षी माने, सुरैय्या शेख, सुशीला साठे, शेषाबाई कोळी, शहनशिल फेरोज पठाण, अजीजाबी शब्बीर शेख, आरेफा आतीक शेख आदींनी पाठिंबा दिला. याउपरही मोबदला न मिळाल्यास आंदोलन आणखी तीव्र करु, असा इशाराही देण्यात आला. (प्रतिनिधी)

Web Title: Jokes of the Savings Group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.