चुटकुले, व्यंगचित्रांसह संदेशांची देवाणघेवाण
By Admin | Updated: October 11, 2014 00:40 IST2014-10-11T00:32:32+5:302014-10-11T00:40:27+5:30
औरंगाबाद : सोशल मीडिया या माध्यमाचा वापर करून तरुण पिढी निवडणुकीच्या दिवसांत मतदानासंदर्भात जनजागृती करण्यास पुढे सरसावली आहे.

चुटकुले, व्यंगचित्रांसह संदेशांची देवाणघेवाण
औरंगाबाद : सोशल मीडिया या माध्यमाचा वापर करून तरुण पिढी निवडणुकीच्या दिवसांत मतदानासंदर्भात जनजागृती करण्यास पुढे सरसावली आहे. वेगवेगळे क्रिएटिव्ह जोक्स, कार्टून्सची निवड करून त्यांचे मित्र परिवारात शेअरिंग करून कॉमेंट आणि लाईक्स मिळवण्याची त्यांच्यात जणू शर्यतच लागली असल्याचे चित्र सोशल मीडियावर दिसत आहे.
यात फेसबुक, टिष्ट्वटर, व्हॉट्सअपचा वापर करून आपापल्या परीने जनजागृतीसारखे महान कार्य करण्यास हातभार लावत आहे. नेत्यांच्या चेहऱ्यांची कार्टून्स काढून त्यावर मतदानाचा हक्क बजावणे किती महत्त्वाचे असते यासारख्या संदेशांचे लिखाण करून त्याला टॅग करून शेअर केले जाते, तसेच नोटा या नवीन पर्यायाबद्दलची माहितीही उत्सुकतेने चर्चिली जात आहे. कोणता नेता चांगला, आपला विकास म्हणजे काय? तो कसा करता येईल? यासारखी प्रश्न आणि उत्तरे असलेला मजकूर सर्वात जास्त लाईक्स मिळवत आहे.
क्षणाधार्थ नवीन माहिती अपलोड कोण करतो, यासाठी सर्वच आतुर आहेत. निवडणुकीच्या दिवसांतील किंवा मतदानाच्या वेळी आलेल्या अनुभवाचे कथन करणारे ‘नेट’करी ही कमी नाहीत, तसेच आपले सरकार निवडून आणूया, देशाचा विकास आपण घडवूया, चला निवडूया सरकारला - लावूया विकासाला हातभार, अशी घोषवाक्ये असणारी आणि कार्टून्सचा वापर करून तयार करण्यात आलेल्या पोस्टरचीदेखील सोशल मीडियावर चलती आहे. सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचाही सहभाग आहे. ज्येष्ठ नागरिक तर आपल्या आयुष्यातील स्मरणीय निवडणूक कोणती, मतदान केंद्रावर आलेले अनुभव सांगण्यात रस घेत आहेत.
मनोरंजनाचे माध्यम म्हणून सोशल मीडियाकडे पाहिले जाते, तसेच कामाचा ताण विसरून जाऊन विरंगुळा म्हणून सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. यातच मनोरंजन आणि मतदानाचे दिवस जवळ येत असल्याने प्रत्येकाने मतदान करावे हा उद्देश मनात धरून शेअरिंग करून आनंद मिळवण्याचा प्रयत्न ‘नेटिझन्स’ करीत आहेत.