कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची थट्टा

By Admin | Updated: June 27, 2017 00:26 IST2017-06-27T00:19:00+5:302017-06-27T00:26:17+5:30

नांदेड : शेतकऱ्यांना सरसकट दीड लाखाच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार नसून त्यांना प्रोत्साहन अनुदानावर समाधान मानावे लागणार आहे़ ही एकप्रकारे या शेतकऱ्यांची थट्टाच आहे़

Joke of farmers who repay loans | कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची थट्टा

कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची थट्टा

श्रीनिवास भोसले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : जिल्ह्यात आजघडीला अडीच लाख शेतकऱ्यांवर दीड हजार कोटींचे कर्ज आहे़ त्यात ६६ हजार ८१० चालू बाकीदार, कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरसकट दीड लाखाच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार नसून त्यांना प्रोत्साहन अनुदानावर समाधान मानावे लागणार आहे़ ही एकप्रकारे या शेतकऱ्यांची थट्टाच आहे़
अस्मानी आणि सुलतानी संकटात सापडलेला बळीराजा मागील चार वर्षांतील दुष्काळामुळे होरपळून निघाला़ त्यातच पेरणी आणि शेतीशी संबंधी उद्योगांसाठी घेतलेल्या कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढू लागल्याने हतबल झालेल्या हजारो शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली़ दरम्यान, वाढत्या शेतकरी आत्महत्या आणि शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी होत असलेली होरपळ पाहून विरोधी पक्षांसह शेतकरी आणि सामाजिक संघटनांनी कर्जमाफीचा मुद्दा रेटून धरला़ यातच तत्त्वत: कर्जमाफी आणि आता सरसकट दीड लाखांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे़
शासनाच्या सरसकट कर्जमाफी, तत्त्वत: आणि प्रोत्साहन अनुदान यामुळे बहुतांश शेतकरी गोंधळून गेले आहेत़ घोषणा होऊन चार दिवस उलटले असले तरी नियम आणि अटी यासंदर्भात बँका अथवा संबंधित यंत्रणेकडे कुठलीही माहिती उपलब्ध नाही़
जिल्ह्यात अडीच लाखांवर शेतकरी कर्जबाजारी आहेत़ जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने काढलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यातील ५० हजार ६५९ शेतकऱ्यांना सरसकट दीड लाख रूपये कर्जमाफीचा फायदा होईल़ तर कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या ६६ हजार ८१० शेतकऱ्यांना कर्जाच्या २५ टक्के वा २५ हजार रूपये यापैकी जी रक्कम जास्त असेल ती प्रोत्साहन अनुदान म्हणून देण्यात येणार आहे़ दरम्यान, आपण नियमितपणे कर्ज परतफेड करून घाई केल्याची भावना या शेतकऱ्यांमध्ये आता निर्माण झाली आहे़ गावपातळीवर राष्ट्रीयीकृत बँका असो वा जिल्हा मध्यवर्ती बँका येथील अधिकारी - कर्मचारी आणि गावातील विविध सेवा सहकारी सोसायटीचे सचिव शेतकऱ्यांना थेट ओळखतात़ बँकांचे कर्जवसुलीचे उद्दिष्ट तसेच सचिवांच्या पगारी यासाठी संबंधितांकडून शेतकऱ्यांकडे तगादा लावण्यात येतो़ त्यामुळे बहुतांश शेतकरी उसनवारी करून कर्जाचे हप्ते भरतात़ परत कर्ज घेवून उसने घेतलेल्या पैशाची परतफेड करतात़ बँक अधिकारी, सेवा सहकारी सोसायटीचे सचिव यांचे संबंध बिघडू नये म्हणून शेतकऱ्यांनी केलेला खटाटोप असतो़ परंतु, शासनाने प्रामाणिकपणे नियमित परतफेड करणाऱ्या चालू बाकीदारांना सरसकट कर्जमाफीपासून दूर ठेवल्याने त्यांच्यात नाराजीचा सूर उमटत आहे़
मराठवाड्यात शेतकरी संपाची सुरूवात अर्धापूर तालुक्यातून झाली होती़ सरसकट कर्जमाफीतून चालू बाकीदारांना न्याय मिळत नसल्याची भावना ठेवून पुन्हा अर्धापूर येथील शेतकरी आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत़

Web Title: Joke of farmers who repay loans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.