बोगस नामनिर्देशनपत्राद्वारे तलाठ्याने मिळवली नोकरी
By Admin | Updated: June 29, 2014 00:22 IST2014-06-29T00:15:02+5:302014-06-29T00:22:33+5:30
वसमत : येथील एका तलाठ्याने स्वातंत्र्यसैनिकाच्या बनावट नामनिर्देशनपत्राद्वारे नोकरी मिळवली. स्वातंत्र्य सैनिकाशी कोणतेही रक्ताचे नाते नसतानाही १९८४ पासून तलाठी पदावर नोकरी करत आहे.

बोगस नामनिर्देशनपत्राद्वारे तलाठ्याने मिळवली नोकरी
वसमत : येथील एका तलाठ्याने स्वातंत्र्यसैनिकाच्या बनावट नामनिर्देशनपत्राद्वारे नोकरी मिळवली. स्वातंत्र्य सैनिकाशी कोणतेही रक्ताचे नाते नसतानाही १९८४ पासून तलाठी पदावर नोकरी करत आहे. या प्रकाराच्या चौकशीची मागणी मयत स्वातंत्र्यसैनिकाच्या विधवा पत्नीने केली होती. या तक्रारीवरून आता प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे.
वसमत येथील दिवंगत स्वातंत्र्य सैनिक हनमंतू बोचकरी यांच्या पत्नी सैनाबाई बोचकरी यांनी वसमत येथील तलाठी दत्तात्रय नाकोड यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. यात सदर तलाठ्याने स्वा.सै.हनमंतू बोचकरी यांचे बोगस नामनिर्देशनपत्र देवून नोकरी मिळवली व स्वातंत्र्य सैनिकांच्या खऱ्या वारसास लाभापासून वंचित ठेवले असल्याचा आरोप केला आहे. या आरोपाने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
या तक्रारीवरून जिल्हाधिकारी कार्यालयाने चौकशी सुरू केली आहे. स्वातंत्र्य सैनिकाच्या विधवा पत्नीचा जबाब नायब तहसीलदारांनी नोंदवला आहे. यात तलाठी नाकोड हे नातेवाईकच नसल्याचे सांगून स्वातंत्र्य सैनिकाची वारस मुलगी व नातू जिवंत असून त्यांनाच लाभ मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. सदर बनावट नामनिर्देशनपत्र रद्द करून संबंधितावर कठोर कारवाईची मागणीही करण्यात आली आहे. तलाठ्याने नोकरी मिळवताना जोडलेल्या नामनिर्देशनपत्रात स्वातंत्र्यसैनिकाने कोणताही वारस नसल्याचे नमूद आहे. वास्तविक स्वातंत्र्य सैनिकाची पत्नी, मुलगी, नातू असे रक्ताचे नातेवाईक वारस आहेत. यावरून हे नामनिर्देशन पत्र बनावट असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होते.
स्वातंत्र्यसैनिकाचा जवळचा व रक्ताचा नातेवाईक कोण? यासंबंधी शासनाने १० जानेवारी १९८५ रोजी जो शासन निर्णय जाहीर केला आहे. यात ते निकष आहेत. त्यातही सदर तलाठी बसत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशीनंतर सदर तलाठ्याच्या नोकरीवर गंडांतर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
स्वातंत्र्यसैनिकाचा नातू नामनिर्देशन अभावी नोकरीला लागू शकत नाही व त्याच स्वातंत्र्य सैनिकाच्या नावावर तब्बल ३० वर्षांपासून तिसराच व्यक्ती नोकरी करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष बाब अशी की, सदर तलाठ्याने ज्या स्वातंत्र्य सैनिकाचे नामनिर्देशनपत्र वापरले त्या स्वातंत्र्यसैनिकाची विधवा पत्नी हलाखीचे जीवन जगत असताना त्याकडे लक्षही दिले नाही हे विशेष. स्वातंत्र्यसैनिकाचे रक्ताचे नाते दाखवून अनेकांनी शासकीय नोकरीचा लाभ घेतला आहे, अशा लाभार्थ्यांची चौकशी केली तर अनेक बनावट वारसदार समोर येण्याची शक्यता एका अधिकाऱ्याने व्यक्त केली. (वार्ताहर)