नोकरीच्या आमिषाने २३ लाखांना फसविले
By Admin | Updated: July 1, 2016 00:33 IST2016-07-01T00:23:20+5:302016-07-01T00:33:15+5:30
औरंगाबाद : शासनाच्या विविध खात्यांत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका शिक्षकाला तब्बल २३ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला.

नोकरीच्या आमिषाने २३ लाखांना फसविले
औरंगाबाद : शासनाच्या विविध खात्यांत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका शिक्षकाला तब्बल २३ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेश सोनटक्के (४२, रा. शिवाजीनगर) आणि दत्तात्रय अंभोरे (रा. रांजणी, ता. घनसावंगी, जि.जालना) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, उत्तम झिने हे शिक्षक आहेत. दत्तात्रयसोबत त्यांची दोन वर्षांपूर्वी ओळख झाली होती. त्यावेळी अंभोरे यांनी औरंगाबादेतील सोनटक्के हे सुशिक्षित बेरोजगारांना शासकीय नोकरी लावण्याचे काम करतात, असे सांगितले. त्यामुळे ते अंभोरे यांच्यासह सोनटक्के यांच्या शिवाजीनगर येथील घरी भेटले. अंभोरे यांनी शिपाईपदासाठी ७ लाख रुपये तर लिपिकपदासाठी ९ लाख रुपये लागतील, असे सांगितले. झिने यांनी त्यांची मुलगी व अन्य नातलगांसाठी २३ लाख रुपये जमा केले. आरोपींनी मुलाखतीपूर्वी दोन लाख रुपये घेतले. मुलाखतीनंतर एक महिन्याने आरोपींनी व्हॉटस् अॅपवर अंभोरे यांना नियुक्तीपत्र पाठविले. झिने यांनी अंभोरे आणि सोनटक्के यांना उर्वरित २१ लाख रुपये दिले.
या नियुक्तीपत्राआधारे झिने यांची मुलगी आणि अन्य नातेवाईक संबंधित कार्यालयात रुजू होण्यासाठी गेले, तेव्हा ते बोगस असल्याचे समजले.