झनझन यांनी घातला वय घटविण्याचा ‘घाट’

By Admin | Published: June 8, 2014 12:59 AM2014-06-08T00:59:49+5:302014-06-08T01:13:50+5:30

औरंगाबाद : शासकीय सेवेत नोकरी लागल्यानंतर जन्मतारखेत काही चूक असल्यास प्रारंभीच्या पाच वर्षांतच बदल करण्याची मुभा आहे.

Jhunjhun turns down the 'Ghat' | झनझन यांनी घातला वय घटविण्याचा ‘घाट’

झनझन यांनी घातला वय घटविण्याचा ‘घाट’

googlenewsNext

औरंगाबाद : शासकीय सेवेत नोकरी लागल्यानंतर जन्मतारखेत काही चूक असल्यास प्रारंभीच्या पाच वर्षांतच बदल करण्याची मुभा आहे. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले महापालिकेतील अग्निशमन अधिकारी शिवाजी झनझन यांना आपले वय जास्त असल्याचा ‘दृष्टांत’ झाला. लगेचच त्यांनी प्रशासनाला अर्ज दिला. प्रशासनानेही त्यांचे वय तब्बल पाच वर्षे कमी करण्याच्या दृष्टीने ‘धोरण’ लावले आहे. झनझन यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी निवृत्तीला आले असून, त्यांना मनपाने वय कमी करून देण्याचे धोरण स्वीकारले नाही.
अग्निशमन अधिकारी झनझन मनपात १९८७ मध्ये रुजू झाले. तेव्हापासून २०१३ पर्यंत त्यांना आपल्या सेवापुस्तिकेत चुकीची जन्मतारीख नोंदवल्याचा दृष्टांत झाला नाही. २०१३ मध्ये तत्कालीन आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांची बदली होणार असे लक्षात येताच झनझन यांना आपले वय जास्त असल्याचे वाटू लागले. त्यांनी लगेच एक अर्ज भापकर यांच्याकडे दिला. १३ आॅगस्ट २०१३ रोजी झनझन यांनी आपल्या अर्जावर भापकर यांच्याकडून सोयीचा शेरा लिहून घेतला. हा अर्ज त्यांनी प्रशासनाला सादर न करता खिशातच ठेवला. अलीकडे आयुक्तपदाचा पदभार गोकुळ मवारे यांच्याकडे होता. झनझन यांनी मागील अर्जाचा संदर्भ देत मवारे यांच्याकडून एक फाईल चालवली. त्यात वय कमी करून देण्याचा उल्लेख होता.
या फाईलवर अनेक अधिकाऱ्यांनी वय कमी करून देता येत नाही, हे नियमबाह्य आहे, कोणत्याही अधिकाऱ्याला निवृत्तीच्या उंबरठ्यावर मेडिकल बोर्डाकडे तपासणीसाठी पाठवता येत नाही, असे निगेटिव्ह ताशेरे ओढले आहेत. या सर्व ताशेऱ्यांची पर्वा न करता मनपातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी झनझन यांना मेडिकल बोर्डाकडे पाठविले. बोर्डानेही अनपेक्षितपणे त्यांचे वय चक्क ४ वर्षे कमी करून दिले. मेडिकल बोर्डाच्या अहवालावर त्यांची फाईल मनपात या टेबलवरून त्या टेबलवर अत्यंत दिमाखाने उड्या मारत आहे. यासाठी काही विधिज्ञांचा सल्लाही घेण्यात येत आहे. मनपाच्या दप्तरी आज झनझन यांची जन्मतारीख ३ जून १९५९ आहे. त्यांनी बीड जिल्ह्यातील साखरे बोरगाव येथील ग्रामपंचायतीकडून एक प्रमाणपत्रही मिळविले. त्यात जन्मतारीख ५९ नसून २२ जून १९६३ असल्याचे म्हटले आहे. असे प्रमाणपत्र कोर्टात एक शपथपत्र दिल्यास नगर परिषद, ग्रामपंचायतीकडून आपोआप मिळते. झनझन यांनी ज्या पद्धतीने आपले वय कमी करून घेण्यासाठी प्रशासनाला वेठीस धरले आहे, त्या आधारावर प्रशासन काय निर्णय घेते याकडे पालिकेचे लक्ष लागले आहे. कारण झनझन यांना वय कमी करून दिल्यास इतर अनेक अधिकारी व कर्मचारी न्यायालयात धाव घेतील. दरम्यान, या प्रकाराबाबत आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्याशी वारंवार संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.
नियमाच्या विरुद्ध काम
महाराष्ट्र नागरी सेवा सुधारणा नियम २००८ नुसार सेवेत दाखल झाल्यानंतर पाच वर्षांपर्यंतच जन्मतारखेत बदल करता येऊ शकतो. त्यासाठीही शासनाने त्याचे निकष, नियमावली ठरवून दिलेली आहे. झनझन यांचे वय कमी करून देण्याची प्रक्रिया म्हणजे शासनाच्या नियमाच्या अत्यंत विरुद्ध आहे.
खोटारडेपणा उघड तरीही
झनझन यांनी १३ आॅगस्ट २०१३ रोजी दिलेल्या अर्जात म्हटले आहे की, आपण २४ सप्टेंबर १९८७ पासून आजपर्यंत २१ अर्ज दिले आहेत. त्याची दखल प्रशासनाने घेतलेली नाही. प्रत्येक अर्जाची तारीख त्यांनी नमूद केली आहे. या तारखांचा बारकाईने अभ्यास केल्यास सुटीच्या दिवशीही त्यांनी मनपाला अर्ज दिल्याचे म्हटले आहे. या सर्व तारखा खोट्या आणि त्यांनी अर्ज दिल्याचे नाट्यही खोटे असल्याचे दिसून येते. प्रशासनाला दिलेल्या २१ अर्जांची दुसरी प्रतही झनझन यांच्याकडे नाही. मनपाच्या कोणत्याच विभागात झनझन यांचे जुने अर्ज नाहीत, हे विशेष.

Web Title: Jhunjhun turns down the 'Ghat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.