जीपची टेम्पोला धडक; दोन ठार, चार जखमी

By Admin | Updated: August 1, 2014 01:07 IST2014-08-01T00:51:57+5:302014-08-01T01:07:52+5:30

सिल्लोड : शहरातील स्वामी विवेकानंद व लिटल वंडर्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांना शाळा सुटल्यानंतर घरी परत घेऊन जाणारी जीप रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टाटा टेम्पोला धडकून

Jeep's tempo hit; Two killed, four injured | जीपची टेम्पोला धडक; दोन ठार, चार जखमी

जीपची टेम्पोला धडक; दोन ठार, चार जखमी

सिल्लोड : शहरातील स्वामी विवेकानंद व लिटल वंडर्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांना शाळा सुटल्यानंतर घरी परत घेऊन जाणारी जीप रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टाटा टेम्पोला धडकून झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले, तर दोन विद्यार्थ्यांसह चार जण गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास सिल्लोड येथील औरंगाबाद नाक्याजवळ घडली.
अप्पा बाजीराव जीवरग (३५), गणेश नामदेव जीवरग (४०, दोघे रा.जीवरग टाकळी) असे या अपघातात ठार झालेल्या इसमांची नावे आहेत.
निल्लोड परिसरातील स्वामी विवेकानंद व लिटल वंडर्स इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांना शाळा सुटल्यानंतर घरी परत घेऊन जाणारी जीप (क्र.एम.एच.२१ सी २३०) रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टाटा टेम्पोवर (क्र .एम.एच.२० सी.टी५५२४) मागून धडकली. टेम्पोला धडक बसताच टेम्पोच्या पाठीमागे बसलेले अप्पा बाजीराव जीवरग, गणेश नामदेव जीवरग हे दोघे खाली पडले. टेम्पोतील डिझेलची टाकी अप्पा जीवरग यांच्या अंगावर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर गणेश जीवरग गंभीर जखमी झाले. गणेश जीवरग यांचा औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या सर्व जखमी विद्यार्थ्यांवर सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात असून चार गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे पाठविण्यात आले आहे.
अपघातात जखमी झालेले सर्व विद्यार्थी निल्लोड परिसरातील आहे. दरम्यान, जीपमध्ये जवळपास २५ विद्यार्थी कोंबलेले होते. शिवाय चालक दारूच्या नशेत होता अशी माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली. अपघात घडताच जीपमधील विद्यार्थी घाबरले होते.
शेजारील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन विद्यार्थ्यांना जीपमधून बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यास मदत केली. या अपघाताची शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
शहरवासियांचे मदतकार्य
अपघाताची माहिती मिळताच भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष इद्रिस मुलतानी, जि.प.गटनेता ज्ञानेश्वर मोटे, जालना लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अब्दुल समीर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेशराव दौड, शिवसेना तालुकाप्रमुख किशोर अग्रवाल, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष सुनील मिरकर, नगरसेवक सुदर्शन अग्रवाल, अशोक साळवे, रईस पठाण, राजू गौर, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष कमलेश कटारिया, रुग्ण कल्याण समिती सदस्य मोहंमद हनिफ आदींनी रुग्णालयात धाव घेऊन जखमींना मदत केली. (वार्ताहर)
भंगार गाड्यातून विद्यार्थ्यांची ने-आण
सिल्लोड तालुक्यात १८ इंग्लिश स्कूल असून ८ शहरात, तर १० ग्रामीण भागात आहे. आपल्या पाल्याला शिकविण्यासाठी पालक मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करतात. तालुक्यातील काही मोजक्या इंग्लिश स्कूल वगळता बहुतांश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांची नेआण जुन्या व भंगार गाड्यातून केली जाते. शिवाय जीपमध्ये विद्यार्थी क्षमतेपेक्षा जास्त कोंबल्या जातात. याकडे संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
जखमी विद्यार्थ्यांची नावे
आदित्य ज्ञानेश्वर जीवरग (१०), तुषार रवींद्र मगर (४) दोघे रा. निल्लोड व गजानन फकीरबा दगडघाटे(३५) जीपचालक रा. निल्लोड, टेम्पोमधील पुंडलिक त्रिंबक उबाळे (४५)रा.गेवराई गुंगी हे चौघे गंभीर जखमी, तर सागर सूर्यभान गोराडे (८), वैभव कैलास गोराडे (८), पवन रावसाहेब गोराडे (११), सावित्री सुरेश उबाळे(१३), निकिता कैलास गोराडे (११), दिव्या सचिन मगर(४), विशाल अंकुश गोराडे(१०), चैतन्य नाना जाधव, रवींद्र रावसाहेब गोराडे (१४), निकिता रवींद्र मगर (९), यश साळवे (१०) रा. तलवाडा, गौरव मगर (१०) रा. निल्लोड, सागर सुरेश बलांडे (६) हे किरकोळ जखमी झाले.

Web Title: Jeep's tempo hit; Two killed, four injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.