औरंगाबाद : इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीच्या (आयआयटी) विविध संस्थांमधील प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या जॉर्इंट एंट्रन्स एक्झामिनेशन (जेईई) अॅडव्हान्सड् परीक्षेचा निकाल आज रविवारी आॅनलाईन जाहीर झाला. शहरातील नारायणा आणि गायकवाड क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी भरीव यश संपादन केले आहे. २२ मे रोजी झालेल्या या परीक्षेला १ लाख ४७ हजार विद्यार्थी बसले होते. यातील ३६ हजार ५६६ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. यामध्ये ४ हजार ५७० मुली आहेत. जेईई अॅडव्हान्स परीक्षेत जोधपूरच्या अमान बन्सलने ३७२ गुण मिळवून देशात अव्वल स्थान पटकावले आहे. एकूण सात विभागांपैकी आयआयटी मुंबईसाठी सर्वाधिक ८,८१० विद्यार्थी पात्र झाले असून, त्यापाठोपाठ आयआयटी मद्राससाठी ६,७०२ विद्यार्थी आणि आयआयटी दिल्लीसाठी ५,९४१ विद्यार्थी पात्र झाले आहेत. यंदा पहिल्यांदाच औरंगाबाद शहरास जेईई अॅडव्हान्स परीक्षेसाठी केंद्र मिळाले होते. औरंगाबादेत सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालय, देवगिरी महाविद्यालय आणि जेएनईसी, या तीन केंद्रांवर झालेल्या परीक्षेला बाराशेहून अधिक विद्यार्थी बसले होते. यंदा ही परीक्षा आयआयटी गुवाहाटीद्वारे आयोजित करण्यात आली होती. २० जून ते १९ जुलैदरम्यान आयआयटी प्रवेशासाठीची अर्ज प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. (जेईई सविस्तर वृत्त/पान ५ वर)
जेईई अॅडव्हान्सचा निकाल जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2016 00:48 IST