जायकवाडी अजूनही मृतसाठ्यातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2016 01:09 IST2016-07-15T00:40:49+5:302016-07-15T01:09:38+5:30

औरंगाबाद : मराठवाड्यात पंधरा दिवसांत झालेल्या दमदार पावसामुळे मोठ्या प्रकल्पांमध्ये बऱ्यापैकी पाण्याची आवक झाली आहे.

Jayakwadi still alive | जायकवाडी अजूनही मृतसाठ्यातच

जायकवाडी अजूनही मृतसाठ्यातच


औरंगाबाद : मराठवाड्यात पंधरा दिवसांत झालेल्या दमदार पावसामुळे मोठ्या प्रकल्पांमध्ये बऱ्यापैकी पाण्याची आवक झाली आहे. विभागातील अकरापैकी सहा प्रकल्पांमध्ये आतापर्यंत ३०३ दलघमी म्हणजे सुमारे १०.७० टीएमसी पाणी आले आहे. मृतसाठ्यात असलेल्या जायकवाडी धरणात सर्वाधिक १४८ दलघमी पाण्याची आवक झाली आहे. तरीसुद्धा जायकवाडी धरण अजूनही मृतसाठ्यातच आहे. जायकवाडी जिवंत साठ्यात येण्यासाठी आणखी १२५ दलघमी म्हणजे ४.४ टीएमसी पाण्याची गरज आहे.
भीषण दुष्काळामुळे यंदा मे महिन्यापूर्वीच मराठवाड्यातील सर्व जलसाठे कोरडे पडले. त्यामुळे हजारो गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागला. मात्र, १ जुलैपासून मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत दमदार पाऊस झाला. त्यामुळे काही प्रमाणात कोरड्या जलसाठ्यांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. पंधरवड्यातील मराठवाड्यात मोठ्या धरणांमध्ये एकूण ३०३ दलघमी पाणी आले आहे. निम्न दुधना धरणात ३१ दलघमी, येलदरी धरणात ३२ दलघमी, सिद्धेश्वर धरणात ४० दलघमी, माजलगाव धरणात ५.५० दलघमी, पेनगंगा धरणात ४७ दलघमी पाणी आले आहे. तर जायकवाडी धरणात सर्वाधिक १४८ दलघमी पाणी आले आहे.
मात्र, जायकवाडी धरण अजूनही मृतसाठ्यातच आहे. यंदा जायकवाडीतील जिवंत साठा मार्च महिन्यातच संपला होता. तेव्हापासून मृतसाठ्यातून पाणी उपसा सुरू आहे. आतापर्यंत मृतसाठ्यातून २७३ दलघमी पाणी उपसा झाला आहे. त्या तुलनेत गेल्या पंधरा दिवसांत धरणात १४८ दलघमीची आवक झाल्यामुळे आता जायकवाडी जिवंत साठ्यात येण्यासाठी आणखी १२५ दलघमीची आवश्यकता आहे. मराठवाड्यात सध्या अकरापैकी केवळ तीन धरणांमध्ये जिवंत साठा आहे. विष्णूपुरी धरण ८८ टक्के भरले आहे. त्यापाठोपाठ निम्न दुधना धरणात १७ टक्के साठा झाला आहे. तर पेनगंगा धरणात ४.६८ टक्के पाणीसाठा आहे. मोठ्या प्रकल्पांप्रमाणेच लघु आणि मध्यम प्रकल्पांमध्येही गेल्या पंधरा दिवसांत पाण्याची बऱ्यापैकी आवक झाल्याचे औरंगाबाद लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Jayakwadi still alive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.