जायकवाडीची पातळी आणखी घटली!
By Admin | Updated: May 5, 2016 01:22 IST2016-05-05T00:34:55+5:302016-05-05T01:22:30+5:30
औरंगाबाद : जायकवाडी जलाशयातील पाणीपातळी झपाट्याने खालावत आहे. मृत जलसाठ्याची पाणीपातळी ४५५.५२० दशलक्ष घनमीटरपर्यंत पोहोचली आहे.

जायकवाडीची पातळी आणखी घटली!
औरंगाबाद : जायकवाडी जलाशयातील पाणीपातळी झपाट्याने खालावत आहे. मृत जलसाठ्याची पाणीपातळी ४५५.५२० दशलक्ष घनमीटरपर्यंत पोहोचली आहे. औरंगाबाद शहराची तहान भागविण्यासाठी मृत पाणीसाठ्यातून अॅप्रोच चॅनलच्या मदतीने पाणी पम्पिंग स्टेशनपर्यंत आणावे लागत आहे. आॅक्टोबरपर्यंत हे पाणी पुरणार आहे. पाऊस लांबल्यास शहराच्या पाणीपुरवठ्याचे टेन्शन वाढू शकते.
मनपाकडे ४५२ मीटरपर्यंत पाणी उपसा करण्याची यंत्रणा आहे. जलसंपदा विभागाने मात्र कालव्यातून पाणी सोडू नये; अन्यथा शहराला तीव्र पाणीटंचाईला समोरे जावे लागेल. महापौर त्र्यंबक तुपे यांनी मंगळवारी पाणीपुरवठा योजनची पाहणी केली. धरणातील पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होत आहे.
धरणाची पाणीपातळी झपाट्याने खालावत असल्यामुळे मागील दीड महिन्यापासून मनपाला मृत जलसाठ्यातून पाणीपुरवठा करावा लागत आहे. धरणात ३२२ दशलक्ष घनमीटर एवढी मृत जलसाठ्याची क्षमता आहे. त्यापैकी वापरण्यायोग्य १०९ दलघमी एवढे पाणी आहे.
हे पाणी १०५ दिवस पुरेल, असा अंदाज जलसंपदा विभागाने अहवालाद्वारे व्यक्त केला आहे. दररोज २.५० दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याने धरणातील पाणीपातळी झपाट्याने खालावत आहे. शासनाकडून मिळालेल्या विशेष निधीतून ३ वर्षांपूर्वी मनपाने कालवा खोदला आहे. त्यामुळे ४५२ घनमीटरपर्यंत पाणीसाठा असेपर्यंत मनपाला पाणी उपलब्ध होऊ शकते, असे मनपाचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी नमूद केले.