जवळा ‘तालुका निर्मिती’ला पुन्हा जोर
By Admin | Updated: June 15, 2014 00:37 IST2014-06-15T00:25:31+5:302014-06-15T00:37:16+5:30
अरूण चव्हाण, जवळा बाजार हिंगोली जिल्ह्यातील जवळा बाजार ही सर्वांत मोठी बाजारपेठ आहे. १९८० पासून तालुक्याचा दर्जा देण्याची मागणी वेळोवेळी केली जात असताही अद्याप याकडे शासनाने गांभिर्याने

जवळा ‘तालुका निर्मिती’ला पुन्हा जोर
अरूण चव्हाण, जवळा बाजार
हिंगोली जिल्ह्यातील जवळा बाजार ही सर्वांत मोठी बाजारपेठ आहे. १९८० पासून तालुक्याचा दर्जा देण्याची मागणी वेळोवेळी केली जात असताही अद्याप याकडे शासनाने गांभिर्याने लक्ष दिलेले नाही. दरम्यान, पालघर जिल्हा निर्मितीच्या निर्णयामुळे जवळा बाजार तालुका निर्मितीच्या मागणीने पुन्हा जोर धरला आहे.
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात असलेले आखाडा बाळापूर हे गाव लोकप्रतिनिधींचा सतत पाठपुरावा केल्यामुळे तालुका होण्याच्या मार्गावर आहे. मात्र औंढा नागनाथ तालुक्यातील सर्वांत मोठी बाजारपेठ असलेल्या जवळा बाजारला तालुक्याचा दर्जा देण्याची मागणी वेळोवेळी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. लोकप्रतिनिधींकडून पाठपुराव्याचा अभाव असल्यामुळे शासनाकडून या मागणीकडे साफ दुर्लक्ष करण्यात येत आहे. विशेष म्हणजे हिंगोली जिल्ह्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत आहे. तसेच या ठिकाणची कृषी उत्पन्न बाजार समिती मोठी आहे. तसेच या गावाशी जवळपास ८० ते ९० गावांचा संपर्क येतो. या ठिकाणची बाजारपेठ मोठी असून, कापड, किराणा, हार्डवेअर अशी मोठी दुकाने असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बाजारपेठेत खरेदी-विक्री होत असते. तसेच या ठिकाणी शैक्षणिक संस्था मोठ्या संख्येने आहेत. यामध्ये महाविद्यालय, शाळांची संख्या वाढत आहे. जवळा बाजार तालुक्याची निर्मित्ती झाल्यास या ठिकाणी ग्रामीण रूग्णालय, पोलिस ठाणे व इतर महत्वाची शासकीय कार्यालये झाल्यास या परिसरातील जवळपास १०० गावांना याचा फायदा होणार आहे. तसेच लोकांना सहन करावा लागत असलेला आर्थिक भूर्दंड वाचेल.
वसमत विधानसभा मतदारसंघातील ६५ गावे, औंढा तालुक्यातील ६५ गावे तसेच वसमत तालुक्यातील हट्टा व करंजाळा सर्कलमधील २५ ते ३० गावे मिळून ११० गावांचा जवळा बाजार तालुका निर्माण होऊ शकतो. तसेच वसमत विधानसभा मतदारसंघ हा वसमत व जवळा बाजार या दोन तालुक्यांचा होऊ शकतो. कारण हिंगोली विधानसभेमध्ये हिंगोली व सेनगाव तर कळमनुरीमध्ये कळमनुरी व औंढा हे दोन तालुके आहेत. तर वसमत विधानसभा मतदारसंघात वसमत व जवळा बाजार हे दोन तालुके झाल्यास प्रशासनाच्या दृष्टीने चांगले होईल.
सन २०१० मध्ये जवळा बाजार येथील सर्व पक्षीय शिष्टमंडळाचे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मुनीर पटेल, अंकुश आहेर, मुरलीधर मुळे, बालाप्रसाद सोनी, गोपाल अग्रवाल, धोंडीराम अंभोरे, विठ्ठल सातपुते यांच्यासह पालकमंत्री, आमदार, जिल्हाधिकारी यांना जवळा बाजार तालुका निर्मितीसाठी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे.
जवळा बाजार हे तालुक्याच्या दृष्टीने या परिसरातील गावांच्या मध्यवर्ती ठिकाण आहे. तसेच भौगोलिकदृष्ट्या या परिसरातील तालुक्यासाठी योग्य ठिकाण आहे. औंढा तालुक्यातील ६५ गावे व वसमत तालुक्यातील हट्टा व करंजाळा या गावातील नागरिकांनी जवळा बाजार तालुका निर्मितीबाबत ठराव दिले आहेत. तसेच तालुका निर्मितीसाठी जवळा बाजार येथे १० ते १५ एकर शासकीय जागाही शासकीय कार्यालयांसाठी उपलब्ध असल्याचे मुनीर पटेल यांनी सांगितले.
वेळोवेळी मागणी करूनही तालुका होत नसल्याची त्यांनी खंत व्यक्त केली. हिंगोली-परभणी राज्यमार्गावरील जवळा बाजार हे मध्यवर्ती ठिकाण असून, या ठिकाणाचा ७० ते ८० गावांशी संपर्क येतो. तसेच शैक्षणिक केंद्रही बनत आहे. जवळा बाजार तालुका झाल्यास या परिसराचा कायापालट होईल, अशी प्रतिक्रिया मुरलीधर मुळे यांनी दिली.