जानेवारीतही ट्रूजेटचे विमान आठवड्यातून तीनच दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 00:58 IST2018-01-02T00:58:32+5:302018-01-02T00:58:35+5:30
चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ट्रूजेटचे विमान जानेवारीमध्ये आठवड्यातून तीन दिवस उड्डाण करणार आहे. डिसेंबरमध्ये आठवड्यातून तीन दिवस उड्डाण केल्यानंतर या विमानोचे वेळापत्रक नियमित होईल, असे सांगण्यात आले; परंतु प्रत्यक्षात आठवड्यातील चार दिवस हे विमान उड्डाण करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

जानेवारीतही ट्रूजेटचे विमान आठवड्यातून तीनच दिवस
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ट्रूजेटचे विमान जानेवारीमध्ये आठवड्यातून तीन दिवस उड्डाण करणार आहे. डिसेंबरमध्ये आठवड्यातून तीन दिवस उड्डाण केल्यानंतर या विमानोचे वेळापत्रक नियमित होईल, असे सांगण्यात आले; परंतु प्रत्यक्षात आठवड्यातील चार दिवस हे विमान उड्डाण करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
ट्रूजेट कंपनीतर्फे २५ जुलै २०१५ पासून औरंगाबाद-हैदराबाद-तिरुपती विमानसेवा सुरू करण्यात आली. औरंगाबादहून तिरुपतीला जाणाºया बालाजी भक्तांना आणि हैदराबादहून शिर्डीला साई दर्शनासाठी येणाºया भाविकांची या विमानसेवेने मोठी सुविधा झाली. ट्रूजेट कंपनीतर्फे अचानक डिसेंबरमध्ये आठवड्यातील बुधवार, गुरुवार आणि रविवार या तीन दिवशीच विमानाचे उड्डाण करण्याचे नियोजन करण्यात आले. हैदराबाद येथून सायंकाळी ७.३० वाजता विमान चिक लठाणा विमानतळावर येईल आणि रात्री ८ वाजेच्या सुमारास हे विमान हैदराबादसाठी उड्डाण घेते. डिसेंबरमध्ये मर्यादित सेवेमुळे प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. महिनाभराचे हे वेळापत्रक जानेवारीत बदलून या विमानाचे दररोज उड्डाण होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती; परंतु जानेवारीत हे वेळापत्रक कायम असल्याचे दिसते. विमान कंपन्यांकडूनही औरंगाबादऐवजी शिर्डी विमानतळाला प्राधान्य वाढत असल्याचे दिसते. डिसेंबरनंतर आता जानेवारीतही आठवड्यातून तीनच दिवस औरंगाबादेत विमानसेवा देऊन शिर्डीला प्राधान्य देण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
फेब्रुवारीपासून नियमित
यासंदर्भात ट्रूजेट कंपनीच्या वाणिज्य विभागाचे अधिकारी सेंथील राजा म्हणाले, चिकलठाणा विमानतळावर धावपट्टीच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे सायंकाळीच उड्डाण करावे लागते; परंतु या वेळेत नियोजन अशक्य होत असल्याने जानेवारीतही आठवड्यातून तीन दिवस उड्डाणाचे नियोजन केले आहे. फेब्रुवारीपासून विमान नियमित होईल. चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे यांनीही आठवड्यातून तीन दिवस उड्डाणाच्या नियोजनास दुजोरा दिला.