‘जनता जनार्दन हाच माझा पक्ष, म्हणून मी अपक्ष’

By Admin | Updated: August 1, 2014 01:08 IST2014-08-01T00:53:39+5:302014-08-01T01:08:21+5:30

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीत मतदारांनी अपक्षांना सपशेल नाकारले असले तरीही विधानसभेच्या निमित्ताने अनेक राजकारण्यांनी आपली ‘पत’ पणाला लावायचे ठरविले आहे.

'Janata Janardhan is my party, so I am independent' | ‘जनता जनार्दन हाच माझा पक्ष, म्हणून मी अपक्ष’

‘जनता जनार्दन हाच माझा पक्ष, म्हणून मी अपक्ष’

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीत मतदारांनी अपक्षांना सपशेल नाकारले असले तरीही विधानसभेच्या निमित्ताने अनेक राजकारण्यांनी आपली ‘पत’ पणाला लावायचे ठरविले आहे. अपक्षांचा प्रचार सुरूही झाला असून, लहान-मोठ्या सुखदु:खाच्या समारंभांमधून त्यांची हटकून दिसणारी उपस्थिती यंदा निवडणुकीतील अपक्षांचे पीक वाढविणारी ठरणार आहे, असे
दिसते.
महायुती होणार की आघाडी तुटणार, अशी चर्चा मोठ्या राजकीय पक्षांबद्दल सुरू आहे. त्यांचे जागा वाटपाचे घोळ, त्यानंतर उमेदवार निवडीचे गुऱ्हाळ संपून उमेदवारी जेव्हा जाहीर होईल, तेव्हा उमेदवारांना प्रचारासाठी पुरेसा वेळही मिळणार नाही, अशी परिस्थिती असताना काही राजकीय कार्यकर्त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे.
पक्षांची अधिकृत उमेदवारी मिळावी म्हणून एका बाजूला स्पर्धा व दुसऱ्या बाजूला प्रचाराची आघाडीही अनेकांनी उघडली आहे.
पाठिंबे आणि पत्रपरिषदा
अमुक एका राजकीय पक्षाची उमेदवारी तमुक कार्यकर्त्याला मिळावी, अशी मागणी करणाऱ्या पत्रकार परिषदांचे आयोजन शहरात होत आहे. त्यातून उमेदवारांची सामाजिक पार्श्वभूमी सांगण्याची स्पर्धा लागत आहे. हा उमेदवार दिल्यास त्यांना २७, ३० संघटनांचा पाठिंबा असल्याचे सांगितले जात आहे, तर काही इच्छुकांनी रेडिओवरून जाहिराती करून मिस कॉल द्या अन् पसंती कळवा, अशा आवाहनाची तयारी सुरू केली आहे. भोजनावळीही सुरू झाल्या आहेत.
शहर व जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघांतून या वेळेस अपक्ष उमेदवारांची संख्या वाढण्याची शक्यता दिसत आहे. निवडणुका दोन महिन्यांवर येऊन ठेपल्यामुळे अपक्षांनी प्रचाराचे वेगवेगळे तंत्र अवलंबिले आहे.
व्हॉटस्अप, फेसबुक व एसएमएसचा त्यासाठी मोठ्या प्रमाणात वापर सुरू झाला आहे. व्हॉटस्अपवर विधानसभा मतदारसंघाच्या नावांनी ग्रुपही सुरू करण्यात आले आहेत. कधीही मॅसेज न टाकणाऱ्या व्यक्ती आता न चुकता एक-दोन दिवसांआड मोबाईलवर सुविचार, विनोद व मतदार जागृती अभियानातील साहित्य टाकत आहेत.
‘अब की बार... आमदार...’
शहरातील किमान ५ नगरसेवक यंदाच्या निवडणुकीच्या मैदानात दिसू शकतात. त्यातील तिघांनी पक्षांचे तिकीट मिळो न मिळो प्रचाराची आघाडी उघडली आहे. नगरसेवकपदाची हॅट्ट्रिक करणाऱ्या एका नगरसेवकाने अनेक रिक्षांवर प्रचाराचे फलक लावून ‘जनता जनार्दन हाच माझा पक्ष, म्हणून मी अपक्ष’, ‘नगरसेवक तीन बार- अब की बार आमदार’ म्हणवून घेणे सुरू केले आहे. लहान मुलांना टी-शर्ट देऊन त्यावरूनही असा प्रचार केला जात आहे.

Web Title: 'Janata Janardhan is my party, so I am independent'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.