कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीर पहिल्याच निवडणुकीसाठी सज्ज

By | Updated: November 28, 2020 04:15 IST2020-11-28T04:15:51+5:302020-11-28T04:15:51+5:30

श्रीनगर : कलम ३७० रद्द केल्यानंतर व राज्याचे पुनर्गठन केल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये प्रथमच होत असलेल्या निवडणुकीची सज्जता झाली आहे. जिल्हा ...

Jammu and Kashmir ready for first elections after repeal of Section 370 | कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीर पहिल्याच निवडणुकीसाठी सज्ज

कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीर पहिल्याच निवडणुकीसाठी सज्ज

श्रीनगर : कलम ३७० रद्द केल्यानंतर व राज्याचे पुनर्गठन केल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये प्रथमच होत असलेल्या निवडणुकीची सज्जता झाली आहे. जिल्हा विकास परिषद (डीडीसी)च्या निवडणुका शनिवारपासून सुरू होत आहेत.

डीडीसीच्या निवडणुका आठ टप्प्यांत होणार असून, यात २८ नोव्हेंबर ते २२ डिसेंबरपर्यंत २० जिल्ह्यांतील २८० सदस्यांची निवड होईल. केंद्रशासित राज्यात निर्वाचित सरकारच्या अनुपस्थितीत होणाऱ्या या निवडणुकांत परिषद क्षेत्रात प्रशासनाची नवीन फळी तयार करतील. अधिकाऱ्यांनी सांगितले की, डीडीसी बरोबरच १२,१५३ पंचायत क्षेत्रांतील पोटनिवडणुकाही होत आहेत. यात ११,८१४ क्षेत्र काश्मीर खोऱ्यात तर उर्वरित ३३९ जम्मूमध्ये आहेत.

पहिल्या टप्प्यातील प्रचार गुरुवारी संपला व मतदान घेण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनाचा उद्रेक लक्षात घेऊनही काही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे १४७५ उमेदवार मैदानात उतरलेले आहेत. आठ टप्प्यांत होत असलेल्या या निवडणुकांत पीजीएडी, भाजप व माजी वित्तमंत्री अलताफ बुखारी यांच्या पक्षामध्ये त्रिकोणी मुकाबला होण्याची शक्यता आहे.

२०१८मध्ये पंचायत निवडणुकांवर बहिष्कार टाकणारे मोठे प्रादेशिक पक्ष नॅॅशनल काॅन्फरन्स (एनसी), पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी (पीडीपी), गुपकर आघाडीच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरलेले आहेत.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, एकूण २६४४ मतदान केंद्रे तयार करण्यात आली असून, या टप्प्यात ७ लाख ३ हजार ६२० मतदार आपला अधिकार बजावणार आहेत. पहिल्या टप्प्यात मतदान सकाळी ७ वाजता सुरू होऊन दुपारी २ वाजेपर्यंत चालेल. राज्य निवडणूक आयुक्त के. के. शर्मा यांनी काश्मीर प्रवासींसाठी जम्मू व उधमपूरमध्ये विशेष मतदान केंद्रे तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. या निवडणुकीत कोरोनाच्या प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करण्यात येणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

..........

शतकाच्या अखेरीस झाडांची पानझड तीन ते सहा दिवस आधीच सुरू होण्याची शक्यता

शास्त्रज्ञांचे अध्ययन : अनेक घटकांचा अभ्यास केल्यानंतर काढला निष्कर्ष

बर्लिन : पृथ्वीच्या उष्णकटीबंधीय व ध्रुवीय भागांमध्ये २१व्या शतकाच्या अखेरीस झाडांची पानझड नियोजित वेळेपेक्षा तीन ते सहा दिवस आधीच सुरू होण्याची शक्यता आहे. युरोपमधील झाडांचे मोठ्या प्रमाणावर अध्ययन केल्यानंतर शास्त्रज्ञांनी हा निष्कर्ष काढला आहे.

यापूर्वी जर्मनीच्या म्युनिच विद्यापीठातील शास्त्रज्ञांसह अनेक शास्त्रज्ञांनी म्हटले होते की, सध्याच्या जलवायू संकटामुळे समशीतोष्ण भागातील झाडांची पाने गळतील व नंतर उगवतील. प्राथमिक अभ्यासानुसार, तापमानातील वाढीमुळे अलीकडील काही दशकांमध्ये झाडांवर पाने पुन्हाही उगवत आहेत. हवामानाच्या समयावधीमध्ये वृद्धी झाली आहे व जलवायू परिवर्तनाचे प्रमाण कमी करण्यास मदत मिळू शकते.

तथापि, सायन्स पत्रिकेमध्ये प्रकाशित झालेल्या नवीन अध्ययनात म्हटले आहे की, यात बदल होऊ शकतो. कारण वाढत्या प्रकाश संश्लेषी उत्पादकतेमुळे झाडांची पानझड लवकर सुरू होऊ शकते. या अध्ययनात शास्त्रज्ञांनी १९४८ ते २०१५ पर्यंत मध्य युरोपातील प्रमुख झाडांचा दीर्घकालीन अभ्यास केला. झाडांच्या पानझडीला प्रभावित करणाऱ्या घटनांबरोबरच झाडे उत्सर्जित करीत असलेल्या कार्बनमध्ये होत असलेल्या बदलावरही प्रयोग केले.

शास्त्रज्ञांनी म्हटले आहे की, या अभ्यासातून पानझडीच्या भविष्यवाणीमध्ये अचूकता २७ ते ४२ टक्क्यांपर्यंत सुधारणा होऊ शकते. यापूर्वी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, पानझड २ ते ३ आठवडे उशिरा येण्याची शक्यता होती. परंतु आता त्याच्या उलट पानझड तीन ते सहा दिवस आधी सुरू होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

.........

मानवी तस्करीच्या आरोपात दोन महिलांसह पाच अटकेत

छत्तीसगढ : महिलेची हरियाणात विक्री : आरोपींत भाजपची कार्यकर्ती : पक्षातून लगेच हकालपट्टी

राजनांदगाव (छत्तीसगढ) : मानवी तस्करीच्या आरोपात दोन महिलांसह पाच जणांना गजाआड करण्यात आले.

पोलिसांनी शुक्रवारी सांगितले की, डोंगरगड शहरात २३ वर्षीय महिलेचे अपहरण करून बलात्कार करण्याच्या तसेच तिची विक्री करण्याच्या आरोपात डोंगरगड येथील चार जण व रायपूर येथील एका महिलेला अटक केली आहे. यातील चार जणांना २३ नोव्हेंबर रोजी तर रायपूरमधील आरोपीस २५ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली. आरोपींमधील एका महिला भाजपची कार्यकर्ती असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकारानंतर पक्षाने तिची हकालपट्टी केली आहे. प्रदेश भाजपने एका निवेदनात म्हटले आहे की, प्रदेशाध्यक्ष विष्णूदेव साय यांनी तिची प्राथमिक सदस्यता रद्द केली आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, महिलेच्या पतीने यावर्षी सप्टेंबरमध्ये आपली पत्नी व चार वर्षीय मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. याच कालावधीत २२ नोव्हेंबर रोजी ही महिला डोंगरगडमध्ये दाखल झाली व पोलीस ठाण्यात जाऊन तिने आपल्याबरोबर घडलेला प्रकार सांगितला. तिने सांगितले की, सकाळी फिरायला जाताना तिची ओळख एका महिलेशी झाली होती. तिने ११ सप्टेंबर रोजी मला पिण्याच्या पाण्यात गुंगीचे औषध टाकून दिले. त्यानंतर मी जागी झाले तेव्हा रायपूरस्थित स्वामी विवेकानंद विमानतळावर होते. माझ्याबरोबर माझा मुलगाही होता. त्यावेळी संबंधित महिलेबरोबर इतरही लोक होते. रात्री मला दिल्लीत आणले व मला मुलासह एका घरात ठेवले. या काळात एकाने माझ्यावर अत्याचार केला.

आरोपींनी नंतर मला हरियाणामध्ये नेले. तेथे माझी एकाला एक लाख रुपयांत विक्री केली. मी त्याच्या तावडीतून पळण्याचा प्रयत्न केला. परंतु पकडले गेले. त्यानंतर त्या व्यक्तीने मला महिलेच्या स्वाधीन केले, असे महिलेने सांगितले.

पोलिसांनी सांगितले की, त्यानंतर आरोपींनी महिलेला हरियाणाच्या एकाला दीड लाख रुपयांना विकले. तिने त्याला या सर्व प्रकाराची माहिती दिली तेव्हा तोच तिला पोलीस ठाण्यात घेऊन गेला. त्यानंतर ही महिला हरियाणा पोलिसांच्या सहकार्याने २२ नोव्हेंबर रोजी डोंगरगड येथे पोहोचली. आता या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

या प्रकरणात पीडितेचा गुंगीचे औषध देणारी महिला मुख्य आरोपी आहे. दिल्ली व हरियाणामधील काही लोकांच्या ती संपर्कात असते. तसेच रायपूरमधील महिलाही दिल्ली-हरियाणातील लोकांच्या संपर्कात आहे, अशी माहिती समजली आहे. त्याबाबत तपास सुरू आहे. पोलिसांनी तपासासाठी विशेष पथके स्थापन केली आहेत. या प्रकरणात इतरही अनेक लोकांना अटक केली जाऊ शकते.

...........

महेबूबा मुफ्ती यांना निवासस्थानी पत्रपरिषद घेण्यास मनाई : नजरकैद केल्याचा पोलिसांचा इन्कार

काश्मीर खुले जेल असल्याचा केला आरोप : मुलीवरही निर्बंध

श्रीनगर : आपली मते व्यक्त करण्याचा अधिकार काढून घेण्यात आला असून, काश्मीर हे खुले जेल झाले आहे, असा आरोप पीडीपी नेत्या महेबूबा मुफ्ती यांनी केला आहे. त्यांना प्रशासनाने पत्रपरिषद घेण्यास मनाई केली आहे. मात्र, त्यांना नजरकैद केल्याचा पोलिसांनी इन्कार केला आहे.

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री असलेल्या महेबूबा यांना शुक्रवारी त्यांच्या पक्षाचे नेते वाहीद पारा यांच्या निवासस्थानी भेट देण्यास मनाई करण्यात आली. त्यांना एनआयएने या आठवड्याच्या प्रारंभी अटक केली होती. त्यानंतर महेबूबा यांनी दुपारी ३ वाजता पत्रपरिषद बोलावली होती. तथापि, पोलिसांनी पत्रकारांना महेबूबा यांच्या घरापासून १०० मीटरवर अडविले व वरून आलेल्या आदेशानुसार त्यांना पत्रपरिषद घेता येणार नाही, असे सांगितले.

याबाबत मुफ्ती यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, माझ्या घरात प्रवेश करण्यापासून पत्रकारांना रोखण्यात आले. याबाबत काहीही लेखी आदेश नाहीत. काश्मीर हे खुले जेल झाले आहे. येथे तुम्ही तुमची मते व्यक्त करू शकत नाहीत.

दरम्यान, पोलिसांनी म्हटले आहे की, मुफ्ती यांना नजरकैद करण्यात आलेले नाही. त्यांना सुरक्षेच्या कारणास्तव पुलवामा दौरा पुढे ढकलण्यास सांगण्यात आले आहे.

महेबूबा यांच्या कन्या इल्तिजा यांनी एक व्हिडिओ शेअर करून म्हटले आहे की, मला पोलीस हा परिसर सोडून जाऊ देत नाहीत. मी याबाबत गेटबाहेरील पोलिसांना कारण विचारले असता, त्यांनी दुसऱ्या गेटकडे जाण्यास सांगितले. तेथे पोलीस अधीक्षक साहेब व जिल्हाधिकारी आहेत, असे त्यांचे म्हणणे होते.

पारा यांच्या कुटुंबियांना भेटायला जाण्याची त्यांची इच्छा होती. त्यांना पोलिसांनी परवानगी दिली नाही. पारा यांना निराधार आरोपांच्या आधारावर अटक करण्यात आली आहे, असा त्यांचा आरोप आहे.

मला पुन्हा एकदा दोन दिवसांपासून बेकायदेशीररीत्या घरात कैद करण्यात आली आहे. मला पुलवामात जाऊ देत नाहीत. भाजपचे मंत्री व त्यांचे समर्थक काश्मीरच्या कानाकोपऱ्यात फिरत आहेत; परंतु माझ्याच सुरक्षेची समस्या निर्माण झाली आहे. माझ्या मुलीलाही घरात कैद केले आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

...........

भारत-बांगलादेश सीमेवरील गुन्हे रोखण्याच्या उपाययोजना करण्यावर सहमती

महानिरीक्षक स्तरावरील बैठक : बीएसएफ-बीजीबी चर्चा

अगरतळा : भारताचे सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) व बांगलादेश सीमा गार्ड (बीजीबी) यांच्यात शुक्रवारी चर्चेत सीमेवरील गुन्हेगारी रोखण्यासाठी व शांतता प्रस्थापित करण्यासाठी उपाययोजना करण्यावर सहमती झाली. बीएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

बीएसएफ त्रिपुरा फ्रंटियरचे महानिरीक्षक सुशांतकुमार नाथ यांनी सांगितले की, महानिरीक्षक स्तरावरील दोन दिवसीय सीमा समन्वय संमेलनात भारत-बांगलादेश सीमेला लागून असलेल्या अनेक स्थानांवर कुंपण घालण्यासारख्या अनेक द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. शुक्रवारी अगरतळा येथील बीएसएफच्या विभागीय मुख्यालयात ही चर्चा संपली.

नाथ यांनी सांगितले की, दोन्ही देशांत आधीच मजबूत असलेले संबंध आणखी दृढ करण्याच्या उद्देशाने अनुकूल वातावरण बनविण्यासह सीमासंबंधी विचारांचे आदानप्रदान करण्यात आले. आम्ही अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. त्यात सीमेवरील सर्व प्रकारचे गुन्हे रोखण्यासाठी कारवाई करण्यावर सहमती झाली.

दरम्यान, बीजीबीचे अतिरिक्त महासंचालक फरीद हसन यांनी सांगितले की, दोन्ही बाजूंनी अंमली पदार्थांची तस्करी, स्फोटके व मानवी तस्करीसारखे गुन्हे कोणत्याही स्थितीत खपवून न घेण्यावर सहमती झाली.

...........

वीस कोटींच्या दरोड्याप्रकरणी व्यवस्थापक ताब्यात

कटक : वीस कोटींच्या दरोड्याप्रकरणी मणप्पुरम फायनान्स लिमिटेडच्या शाखा व्यवस्थापकाला ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी त्यांची कसून चौकशी केली जात आहे, असे पोलीस उपायुक्त प्रतीक सिंह यांनी सांगितले. मागच्या आठवड्यात आयआयएफएलच्या नयासडक शाखेतून रोकड आणि सोन्यासह २० कोटी रुपयांच्या ऐवजाची जबरी चोरी झाली होती. मंगळवारी आयआयएफएलच्या सोने मूल्यांकन कर्मचारी लाला अमृत रे यांच्यासह सात जणांना अटक करण्यात आली आहे.

बालिकेच्या हत्येच्या चौकशीसाठी एसआयटी

भुवनेश्वर : अपहरण करून पाच वर्षांच्या बालिकेची हत्या करण्यात आल्याच्या घटनेच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. १४ जुलै रोजी ही घटना घडली होती. चार दिवसांपूर्वी बालिकेच्या आई-वडिलांनी विधानसभेबाहेर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला होता.

माजी मंत्री प्रजापतीविरुद्ध एफआयआर दाखल

लखनौ : बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी उत्तरप्रदेशच्या दक्षता विभागाने माजी मंत्री गायत्री प्रजापती यांच्याविरुद्ध गुरुवारी एफआयआर दाखल केला आहे. समाजवादी पार्टीच्या सरकारमध्ये ते खननमंत्री होते. त्यांच्यावर बलात्कार, फसवणूक आणि धमकावण्याचा आरोप असून, २०१७ मध्ये त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडे मूळ उत्पन्नापेक्षा सहापट अधिक संपत्ती असल्याचे चौकशीत आढळले आहे.

लालू प्रसाद यांच्या जामिनावरील सुनावणी तहकूब

रांची : राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी झारखंड उच्च न्यायालयाने ११ डिसेंबरपर्यंत स्थगित केली आहे. चारा घोटाळ्यात त्यांना १४ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. सध्या त्यांच्यावर इस्पितळात उपचार सुरू आहेत. दुमका कोषगारातील अपहार प्रकरणाशी संबंधित प्रकरणात त्यांनी जामीन अर्ज दाखल केला आहे.

उपचारासाठी पेरारीवलनचा पॅरोल वाढवला

नवी दिल्ली : राजीव गांधी हत्याकांड खटल्यात जन्मठेप सुनावण्यात आलेल्या एजी पेरारीवलनचा पॅरोल सर्वोच्च न्यायालयाने एक आठवड्याने वाढविला. यापूर्वी २३ नोव्हेंबर पॅरोलचा अवधी वाढविण्यासोबत न्यायालयाने त्याला सुरक्षा देण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले होते. आजारावर उपचार करण्यासाठी पॅरोलचा अवधी वाढविण्यासाठी त्याने अर्ज दाखल केला होता.

बिहारचे माजी मंत्री महातो यांचे निधन

बोकारो (झारखंड) : संयुक्त बिहारचे मंत्री राहिलेले बोकारोचे माजी आमदार अकलू राम महातो (८०) यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. तब्येत बिघडल्याने शुक्रवारी पहाटे त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले होते. झारखंड राज्य स्थापन करण्याच्या आंदोलनात आणि बोकारोच्या विकासात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. ते समाजवादी होते. संयुक्त बिहारमध्ये ते १९९५ ते २००५ दरम्यान मंत्री होते.

पीएमओ अधिकाऱ्यांच्या नावे ईमेल, डॉक्टरला अटक

अहमदाबाद : पंतप्रधान कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या नावे ईमेल तयार केल्याच्या आरोपावरून अहमदाबादच्या सायबर गुन्हे शाखेने डॉ. विजय पारीखला अम्रेलीमधील घरातून अटक केली. गुजरात सरकारच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना पीएमओ अधिकाऱ्यांच्या नावे ईमेल आले होते.

हलगर्जीपणा केल्याने नऊ अधिकारी निलंबित

जम्मू : कर्तव्यात हलगर्जीपणा केल्यावरून जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याने नऊ सरकारी अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. निवडणुकीच्या कामाबाबत गांभीर्य न दाखविता हेतुत: गैरहजर राहिल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे, असे सरकारी प्रवक्त्याने सांगितले. याप्रकरणी अतिरिक्त विकास आयुक्तांना सखोल चौकशी करून एक आठवड्याच्या आत अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

छत्तीसगडमध्ये दोन महिला नक्षलवादी शरण

कोंडागाव : नक्षलवादी दोन महिलांनी पोलिसांसमक्ष शरणागती पत्करली आहे. यापैकी एका महिलेवर एक लाखाचा इनाम होता. माओवाद्यांची विचारधारा पोकळ असून, संघटनेचे वरिष्ठ नेते खालच्या स्तरावरील नक्षलवाद्यांची पिळवणूक करीत असल्याने नाराज होऊन शरणागती पत्करत आहोत, असे त्यांनी निवेदनात नमूद केले, असे पोलीस अधीक्षक सिद्धार्थ तिवारी यांनी सांगितले. सुरक्षेच्या दृष्टीने दोघींची ओळख जाहीर करण्यात आलेली नाही, असेही तिवारी यांनी सांगितले.

४.७ तीव्रतेच्या भूकंपाने तुर्की हादरली, हानी नाही

अंकारा : पूर्व तुर्कीतील माल्ट्या प्रांत शुक्रवारी ४.७ तीव्रतेच्या भूकंपाने हादरला. लोकांनी जीवाच्या भीतीने घराबाहेर धूम ठोकली. भूकंपाचा केंद्रबिंदू पुटूरगे शहरात होता. स्थानिक वेळेनुसार सकाळी ११.३७ वाजता भूकंप झाला. कोठूनही जीवित वा वित्तीय हानीचे वृत्त नाही, असे आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले. १९९९ मध्ये तुर्कीत झालेल्या शक्तिशाली भूकंपात १७ हजार लोकांचा मृत्यू झाला होता.

केजरीवाल, सिसोदिया यांना कोर्टात हजर राहण्याचे निर्देश

नवी दिल्ली : मानहानी प्रकरणात अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी कोर्टाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि योगेंद्र यादव यांना ३ डिसेंबर रोजी न चुकता हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. आमच्या वकिलांना कोरोना झाल्याचे केजरीवाल, सिसोदिया यांनी सांगितल्याने कोर्टाने पुढील सुनावणी ३ डिसेंबर रोजी ठेवली आहे.

.........

हैदराबादेत भाजपची मोठी योजना, एआयएमआयएमचा गड जमीनदोस्त करून अनेक लक्ष्ये गाठण्याचे प्रयत्न

--------------------

नितीन अग्रवाल

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : भाजपने हैदराबादेत स्‍थानिक निवडणुकीत पूर्ण शक्ती लावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यापासून पक्षाचे अध्‍यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह उत्तरप्रदेशचे मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील प्रचार करताना दिसत आहेत.

राजकीय तज्ज्ञ मानतात की, भाजप या निवडणुकीत ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादूल मुस्लिमीनचे असदुद्दीन ओवेसी यांना त्यांच्याच घरात पराभूत करून देशात मोठा संदेश देऊ इच्छितो. यामुळे कर्नाटकनंतर दक्षिण भारतात पाय बळकट करण्याचा मार्ग मिळेल. या निवडणुकीतील विजयाने विधानसभा निवडणुकीत पक्ष संघटना बळकट करण्याचा हेतू आहे. भाजप असे मानतो की, जर लोकसभा निवडणुकीत भाजपने याच प्रकारे जोर लावला असता तर त्याच्याकडे तेलंगणमध्ये चार नाही जास्त जागा असत्या.

भाजपच्या एका केंद्रीय पदाधिकाऱ्यानुसार आंध्रप्रदेश आणि तेलंगणामध्ये काँग्रेस हतबल आहे, तर तेलगुदेसम पक्षाची (टीडीपी) पकडही जास्त बळकट नाही. या परिस्थितीत भाजपचा थेट संघर्ष एआयएमआयएमशी आहे. जर स्‍थानिक निवडणुकीत सकारात्मक निकाल लागले तर त्याचा लाभ निश्चितपणे आगामी विधानसभा निवडणुकीत मिळेल.

एआयएमआयएमने ज्याप्रकारे बिहार आणि त्याआधी महाराष्ट्र व दुसऱ्या राज्‍यांत पाय पसरले ते पाहता ते रोखणे भाजपसाठी आवश्यक बनले आहे. भाजपचे नेते मानतात की, जर ओवेसींना वेळीच थांबवले नाही तर भविष्यात ते मोठे आव्हान बनतील. म्हणून त्यांच्याच गडावर त्यांना हरवणे महत्त्वाचे आहे. याच कारणामुळे बिहारमधील विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारे भूपेंद्र यादव यांनाच या निवडणुकीचे प्रभारी बनवले गेले आहे.

तेलंगणा नेहमीच १९२७ मध्ये अस्तित्वात आलेल्या एआयएमआयएमचा गड आहे. १९८४ नंतर हैदराबाद लोकसभा जागेवर त्याचा दबदबा कायम आहे. २०१४ मध्येही पक्षाने तेलंगणाच्या विधानसभा निवडणुकीत सात जागा जिंकल्या. याचबरोबर राज्याबाहेर महाराष्ट्रातही पहिल्यांदा दोन विधानसभा जागा त्याने जिंकल्या. नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत पक्षाने पाच जागा जिंकल्या. आता ओवेसी यांची नजर पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीवर आहे.

१५० जागा असलेल्या ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेसाठी एक डिसेंबर रोजी निवडणूक होईल. गेल्या निवडणुकीत ९९ जागा जिंकून टीआरएसने विजय मिळवला होता. तेव्हा एआयएमआयएमला ४४ व भाजपला फक्त चार जागा जिंकता आल्या होत्या.

-----------------

लग्नासाठी धमक्या, त्रासामुळे

पेटवून घेतलेल्या मुलीचा मृत्यू

अमेठी (उत्तर प्रदेश) : ‘माझ्याशी लग्न कर’ म्हणून एकाकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून पेटवून घेतलेल्या मुलीचा (१७) शुक्रवारी मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले.

झमीन ऊर्फ बबलू हा सध्या मुंबईत काम करीत असून तो त्या मुलीवर लग्नासाठी सतत दबाब आणत होता. जियापूर खेड्यात राहत असलेल्या त्याच्या तीन भावांनीही तिला धमकावले होते, असे अधिकारी म्हणाला. यामुळे मुलीने २० नोव्हेंबर रोजी अमेठी जिल्ह्यातील खेड्यात स्वत:च्या घरात पेट्रोल ओतून पेटवून घेतले होते. तिला लखनौतील बलरामपूर रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेथेच तिचा मृत्यू झाला.

गुन्हा दाखल झाला असून दोन संशयितांना अटक झाली असून इतरांचा शोध घेतला जात आहे, असे अधिकारी म्हणाला.

---------------

बस पेटल्यामुळे तीन

प्रवासी ठार, ६ जखमी

जयपूर (राजस्थान) : शुक्रवारी दिल्लीहून जयपूरला जात असलेली खासगी बस विजेच्या हाय टेन्शन तारांना स्पर्श होऊन पेटल्यामुळे तीन प्रवाशांचा मृत्यू, तर इतर सहा जण जखमी झाले, असे पोलिसांनी सांगितले.

लुबाना खेड्याजवळ ट्रक उलटल्यामुळे जयपूर-दिल्ली राष्ट्रीय महामार्ग बंद पडला होता. त्यामुळे या खासगी बसच्या चालकाने चुकीच्या दिशेने वाहन नेण्याचा प्रयत्न केला. बसचा वीजवाहक तारांना स्पर्श झाला व तिने पेट घेतला, असे चांदवाजी पोलीस ठाण्याच्या प्रभारी अनिता मीना यांनी सांगितले. बसमधील इतर प्रवाशांना सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले. आगीत बस पूर्णपणे जळाली.

----------------

Web Title: Jammu and Kashmir ready for first elections after repeal of Section 370

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.