हर्सूल तलावाच्या बॅकवॉटरला होणार ‘जांभूळवन’
By Admin | Updated: June 29, 2016 01:09 IST2016-06-29T00:35:26+5:302016-06-29T01:09:02+5:30
औरंगाबाद : मराठवाड्यात जांभळाचे क्षेत्र वाढविण्यासाठी यावर्षी १ जुलै रोजी होणाऱ्या वृक्ष लागवड उपक्रमात हर्सूल तलावाच्या बॅकवॉटरला खाम नदीच्या काठावर जांभळाची लागवड करण्यात येणार आहे.

हर्सूल तलावाच्या बॅकवॉटरला होणार ‘जांभूळवन’
औरंगाबाद : मराठवाड्यात जांभळाचे क्षेत्र वाढविण्यासाठी यावर्षी १ जुलै रोजी होणाऱ्या वृक्ष लागवड उपक्रमात हर्सूल तलावाच्या बॅकवॉटरला खाम नदीच्या काठावर जांभळाची लागवड करण्यात येणार आहे.
सोबतच विभागात बीडमधील बिंदुसरा, कळंब येथील मांजरा नदीकाठी जांभळाची झाडे लावली जाणार आहे. विभागात ३ जांभूळवन विकसित करण्याचा मनोदय विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी मंगळवारी व्यक्त केला.
वनविभागातर्फे १ जुलै रोजी एकच लक्ष्य दोन कोटी वृक्ष लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या उपक्रमात मराठवाड्यात ४८ लाख झाडे लावली जाणार आहेत.
विविध विभागांना झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. वन आणि सामाजिक वनीकरण विभागामार्फत ३० लाख झाडे लावण्यात येणार आहे. रोपवाटिकांमध्ये रोपे तयार करण्यात आली असून वड, पिंपळ, लिंब, चिंच, जांभूळ, सीताफळ, पेरू, निलगिरी, सुबाभूळ, चिकू, आंबा यासह विविध फुलांच्या रोपांचा समावेश आहे.
प्रत्येक जिल्ह्याला वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जलयुक्त शिवार अभियानात मांजरा, बिंदुसरा, खाम नदीचे पुनर्जीवन करण्यात आले आहे. त्यामुळे बीडमधील बिंदुसरा नदीपात्राच्या काठावर, कळंब येथील मांजरा आणि औरंगाबादमधील हर्सूल तलावाच्या खाम नदीपात्रासह तलावाच्या परिसरात जांभूळवन विकसित केले जाणार आहे.
या तिन्ही ठिकाणी जांभळाची २ ते ५ हजार झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात येणार आहे.