‘जाम’ने काढला शहरवासीयांचा घाम
By Admin | Updated: May 12, 2015 00:56 IST2015-05-12T00:47:41+5:302015-05-12T00:56:27+5:30
औरंगाबाद : जालना रोडवर सोमवारी दिवसभर झालेल्या ट्रॅफिक जाममुळे वाहनचालकांबरोबरच पोलिसांचाही चांगलाच घाम निघाला

‘जाम’ने काढला शहरवासीयांचा घाम
औरंगाबाद : जालना रोडवर सोमवारी दिवसभर झालेल्या ट्रॅफिक जाममुळे वाहनचालकांबरोबरच पोलिसांचाही चांगलाच घाम निघाला. निमित्त ठरला तो पुन्हा मोंढा नाका येथील उड्डाणपूल अन् महानगरपालिका व रस्ते विकास महामंडळाचा हलगर्र्जीपणा! अंगाची लाहीलाही करणाऱ्या कडाक्याच्या उन्हातच ट्रॅफिक जाममध्ये कित्येक तास अडकावे लागल्याने वैतागलेले हजारो वाहनचालक पुलाचा ठेकेदार, मनपा आणि रस्ते विकास महामंडळाला अक्षरश: शिव्यांची लाखोली वाहताना दिसून आले...
समन्वयाचा अभाव
फुटणाऱ्या जलवाहिनी दुरुस्तीचे काम सोमवारी सकाळी महानगरपालिकेने हाती घेतल्याने रोकडा हनुमान कॉलनी ते मोंढा नाकादरम्यानचा रस्ता बंद केला. तशाच प्रकारचा निर्णय रस्ते विकास महामंडळाने घेतला. मोंढा नाका उड्डाणपुलाशेजारी असलेला साईड रोडच्या डांबरीकरणाचे काम अचानक सुरू केले. हे काम हाती घेतल्याने आकाशवाणीकडून अमरप्रीत चौकाकडे जाणारा मार्ग बंद केला. हे करताना महामंडळाने मोंढा नाका येथे पुलाखालून रस्ता मोकळा करून वाहनांकरिता लक्ष्मण चावडीमार्गे तार भवन हा मार्ग दाखविला. मात्र, दोन्ही रस्ते एकाच वेळी बंद करण्यात आल्याने लक्ष्मण चावडीकडून सिल्लेखाना चौकाकडे जाणारी वाहने, सिल्लेखाना चौकाकडून येणारी लक्ष्मण चावडीकडे जाणारी वाहने, रोकडिया हनुमान कॉलनीकडून या पर्यायी मार्गाकडे येणारी वाहने तार भवन चौकात आमनेसामने आली आणि तेथूनच वाहनांची कोंडी होण्यास सुरुवात झाली.
फुटपाथचा वापर
वाहतुकीमध्ये अडकलेल्या अनेक दुचाकीचालकांनी राँगसाईडचा वापर करीत मार्गक्रमण केले तर काही जणांनी फुटपाथवरुन आपली दुचाकी नेली. एक वाहनचालक गेला की, अन्य दुचाकीचालकही त्यांच्यामागे जाऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करीत. मात्र पुढे जाण्यासाठी रस्ताच सापडत नसल्याने त्यांनाही चारचाकी वाहने, आॅटोरिक्षा, मालवाहू ट्रक, एस.टी. महामंडळाच्या बसेस आणि लक्झरी बसेससोबतच संथ गतीने मार्गक्रमण करावे लागले.
साईड रोड सात मीटर असून त्यानुसार तो केला आहे. एखादा अथवा अर्धा मीटर रस्ता कमी असू शकतो. साईड रोड तयार करण्यासाठी अतिक्रमण काढून देण्याचा अधिकार मनपाचा आहे. त्यांनी अतिक्रमण काढून दिल्यास रस्ता रुंद करण्यासह फू टपाथ, पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक ती कामे करता येतील.
- उदय भरडे,
उपअभियंता, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ
जालना रोडवर मोंढा नाका उड्डाणपुलाच्या बाजूने अतिक्रमणे झाली आहेत, रस्ता रुंद करण्यासाठी ती काढून द्यावीत, अशी मागणीच आजपर्यंत रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी केलेली नाही. तिन्ही पुलांच्या उभारणीसाठी मनपाने लाईट, जलवाहिन्या बाजूला करण्यासाठी सहकार्य केले. मोंढा नाका येथे भूसंपादनाची गरज होती, तर ते कोणी करावे हा सर्वांत मोठा प्रश्न आहे. ४५ मीटरचा हा रोड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतो. रस्ता रुंद करायची गरज होती, तर कामाचे टेंडरच का काढले?
-एस.डी. पानझडे, शहर अभियंता, मनपा
सोमवारी शहरात झालेल्या वाहतूक कोंडीविषयी बोलताना पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, उड्डाणपुलाच्या कामामुळे आणि जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासंदर्भात पोलिसांना संबंधित विभागाने पूर्वसूचना दिली नव्हती. त्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. त्यानंतर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, त्याकरिता बराच वेळ लागला. उद्यापासून शहरातील कोणत्याही रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होणार नाही, याबाबतच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
-अमितेश कुमार, पोलीस आयुक्त१
जालना रोडला पर्याय म्हणून वाहनचालक सिल्लेखाना ते कैलासनगरमार्गे एमजीएम या रस्त्याचा आणि गजानन महाराज मंदिर, जवाहरनगर पोलीस ठाण्यासमोरून वाहनचालक डॉ.रोपळेकर रुग्णालयमार्गे अमरप्रीत चौक असा रस्ता वापरतात.
मोंढा नाका उड्डाणपुलाला लागूनच असलेली मनपाची मुख्य जलवाहिनी गेल्या महिन्याभरापासून सतत फुटत आहे. रविवारीही ती फुटली. मनपाने सोमवारी सकाळीच या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. त्यासाठी क्रांतीचौकाकडून आकाशवाणीकडे जाणाऱ्या रोडवर कोटक बँकेपासून मोंढा नाक्यापर्यंत रस्ता बंद केला.
४दुसरीकडे रस्ते विकास महामंडळानेही मोंढा नाका पुलाच्या आकाशवाणीकडून क्रांतीचौकाकडे जाणाऱ्या बाजूच्या साईड रोडचे काम सोमवारी सुरू केले. त्यासाठी त्यांनी मोंढा चौकातून पुढे जाणारा रस्ता बंद केला.
४एक तर सोमवार होता. त्यातच मनपा आणि रस्ते विकास महामंडळाने कामासाठी आपण रस्ते बंद करीत आहोत, हे जाहीरच केले नाही. त्यामुळे नागरिक नित्याप्रमाणे या रस्त्यावर आले. अचानक रस्ता बंद दिसल्याने वाटेल त्या गल्लीबोळांतून मार्ग काढून मार्गाला लागल्याचा जो तो वाहनचालक प्रयत्न करू लागला. त्यातच सकाळीच वाहतूक जाम झाली. जालना रोडचे पर्यायी रोडही वाहतूक तिकडे वळाल्याने जाम झाले आणि पाहता पाहता अभूतपूर्व असा वाहतुकीचा खोळंबा झाला.
मनपा आणि रस्ते विकास महामंडळाने कामासाठी रस्ता बंद करणार आहोत, हे आधीच जाहीर केले असते तर नागरिकांचे असे हाल झाले नसते. वास्तविक पाहता कोणताही रस्ता वाहतुकीसाठी बंद करायचा असेल तर संबंधित विभागाने त्याची माहिती वाहतूक शाखा पोलिसांना देणे बंधनकारक असते. नंतर पोलीस त्याची सूचना काढतात. मनपा आणि रस्ते विकास महामंडळाने ही तसदी घेतली नाही.