जालन्याच्या कारागृहाचा ‘अ’ वर्गात समावेश
By Admin | Updated: November 12, 2014 00:24 IST2014-11-12T00:06:46+5:302014-11-12T00:24:33+5:30
केवल चौधरी , जालना येथे उभारण्यात आलेले जिल्हा कारागृह हे ‘अ’ वर्गात समाविष्ट करण्यात आले आहे. त्याच्या विकास कामांची पाहणी नाशिक कारागृहाचे विभागीय महानिदेशक जयंत नाईक यांनी केले.

जालन्याच्या कारागृहाचा ‘अ’ वर्गात समावेश
केवल चौधरी , जालना
येथे उभारण्यात आलेले जिल्हा कारागृह हे ‘अ’ वर्गात समाविष्ट करण्यात आले आहे. त्याच्या विकास कामांची पाहणी नाशिक कारागृहाचे विभागीय महानिदेशक जयंत नाईक यांनी केले. उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारा निधी शासनाकडून उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मीरा बोरवणकर यांनी १५ सप्टेंबरच्या भेटीत दिले होते. हे कारागृह एखादा ‘पीकनिक पॉर्इंट’ वाटावा असे आहे.
जिल्हा कारागृहात सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता डी.एन. तुपेकर, उपअभियंता शेख सलिम पटेल, कंत्राटदार फेरोजभाई, पर्यवेक्षक अकील, शौकत अली यांच्यासह औरंगाबाद येथील मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक विनोद शेकवार, निरीक्षक पाटील यांचीही उपस्थिती होती.
या जिल्हा कारागृहाची कैदी क्षमता ४८० असल्याने त्याचा समावेश ‘अ’ वर्गात करण्यात आला. या जेलमध्ये बॅरेकसह संपूर्ण बांधकामाचा दर्जा पाहून नाईक यांनी समाधान व्यक्त केले. वीज व पाणी जोडणीचे महत्वाचे काम शिल्लक राहिले आहे. शासनाकडून निधी उपलब्ध झाल्यानंतर अवघ्या १५ दिवसांत गृह (कारागृह) विभागाला संपूर्ण परिसर वर्ग करण्यात येणार आहे. कैद्यांना ठेवण्यासाठी बांधण्यात आलेली बॅरेक अतिशय हवेशीर असून स्वच्छ सूर्यप्रकाश आत येऊ शकेल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक बॅरेकमध्ये शौचालय व पाण्याची व्यवस्था असून पंखे व दिवेही लावण्यात आले आहेत. मुख्य कारागृहाच्या इमारतीमध्ये बसून कैदी शहराचा काही भाग सहज पाहू शकतील. त्यासाठी बॅरेकच्या बाहेर जाण्याचीही गरज नाही. मात्र त्यासाठी पहिल्या मजल्यावर कैदी ठेवला तर हा आनंद लुटता येईल. कारागृहाच्या मध्यवर्ती अंघोळीसाठी तीन हौद बांधण्यात आलेले आहेत. त्याच भागात शौचालयही आहेत. ही सुविधा तळ मजल्यावरच आहे. शिवाय सर्वसुविधांयुक्त दवाखाना व स्वयंपाकगृहही उभारण्यात आले आहे. ही सर्वच कामांची नाईक यांनी पाहणी केली. भूमिगत गटार योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे.
विद्युत जोडणी पूर्ण झाली आहे. केवळ कनेक्शन बाकी आहे. पाणी जोडणी शिल्लक राहिली आहे. उर्वरित कामे पूर्ण झाली आहेत. या सर्वच कामांचा आढावा नाईक यांनी घेतला.
अंतर्गत रस्त्यांचे मजबूतीकरण व डांबरीकरणाच्या कामालाही सुरूवात झाली नाही. हे काम उद्घाटनापूर्वी पूर्ण होणार आहे. या कारागृहाच्या बाहेर पाझर तलाव, कर्मचारी निवासस्थान व इतर सुविधा आहे. कारागृहाच्या परिसरात वृक्ष लागवड करून तपमान नियंत्रित करण्याचा बांधकाम खात्याचे मत आहे. या कारागृहाचा परिसर निसर्गरम्य ठेवण्यासाठी वृक्ष लागवडीची गरज आहे.