जालना जिल्हा परिषदेत आघाडीत पुन्हा बिघाडी

By Admin | Updated: September 22, 2014 00:53 IST2014-09-22T00:40:26+5:302014-09-22T00:53:53+5:30

संजय कुलकर्णी , जालना जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत रविवारी शिवसेना -भाजपाने युती कायम असल्याचे दाखविले

Jalna Zilla Parishad Against the Front Against Jigala | जालना जिल्हा परिषदेत आघाडीत पुन्हा बिघाडी

जालना जिल्हा परिषदेत आघाडीत पुन्हा बिघाडी


संजय कुलकर्णी , जालना
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत रविवारी शिवसेना -भाजपाने युती कायम असल्याचे दाखविले. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस, मनसे यांच्यातील बिघाडी यानिमित्ताने पहावयास मिळाली. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी अध्यक्षपदाचा उमेदवार अखेरपर्यंत खुद्द उमेदवाराला सुद्धा कळू न देता धक्कातंत्राचा वापर केला.
जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना व भाजपाचे प्रत्येकी १५ असे ३० सदस्य आहेत. चार अपक्षांचा त्यांना पाठिंबा आहे. त्यामुळे ३४ संख्येच्या जोरावर अध्यक्ष, उपाध्यक्ष युतीचा होणार, हे निश्चित होते. कारण विरोधी पक्षाकडून गटनेते सतीश टोपे यांनी ‘ आम्ही फोडाफोडीचे राजकारण करणार नाही, मात्र आमच्याकडे युतीतील कुणी नाराज सदस्य आले तर त्यास आम्ही सोबत घेऊ’ असे म्हटले होते. शुक्रवारी जालन्यात एका खाजगी कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी माजी मंत्री अर्जुनराव खोतकरांना अध्यक्ष सेनेचाच करू, असे तीन वेळा सांगितले. एवढेच नव्हे, तर तेथे उपस्थित असलेले अनिरुद्ध खोतकर, ए.जे. बोराडे यांना ‘तुम्हाला अध्यक्ष व्हायचे का’ असा सवाल करून संमतीही दर्शविली. पंडितराव भुतेकर यांच्या सुविद्य पत्नी आशा भुतेकर यांना दुसऱ्यांदा अध्यक्षपद देऊ असे मिश्किलपणे सांगितले होते.
स्वत:कडे लाल दिवा असताना दुसरा लाल दिवा दानवे घेणार नाहीत, असा काही सदस्यांचा समज होता. भाजपामध्ये अगोदरच सहा सदस्य अध्यक्षपदाचे बाशिंग लावून तयार असल्याने या सदस्यांमध्ये एकमत होणार नाही व अध्यक्षपद सेनेकडेच जाईल, असाही काहींचा समज होता. मात्र हे समज खोटे ठरवत दानवे यांनी आपल्या पक्षातील इच्छूक सहापैकी दोघांची समज काढली. उर्वरीत चार जणांना तुमच्यातून एक नाव निश्चित करा, असे सांगितले. परंतु हे नाव निश्चित न झाल्याने शेवटी दानवे यांनी अध्यक्षपदासाठी तुकाराम जाधव यांचे नाव सुचविले, त्यास सर्वसंमतीही मिळाली.
जिल्हा परिषदेच्या सभागृहात काँग्रेसचे तीन, काँग्रेसप्रणित एक, मनसेचा एक आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्याही एक महिला सदस्या गैरहजर होत्या. पक्षातील सदस्या आजारी असल्याने येऊ शकल्या नाहीत, असा दावा काही सदस्यांनी केला. मात्र काँग्रेसचे चारही सदस्य का आले नाहीत, याचे कारण राष्ट्रवादीचे सदस्य देऊ शकले नाहीत. मनसेच्या सदस्यानेही गैरहजेरी का दर्शविली, याचा खुलासा होऊ शकला नाही. संख्याबळ कमी असल्याने पराभव होणार, हे राष्ट्रवादीला माहिती होते. परंतु काँग्रेस व मनसे सदस्य त्यांच्यासमवेत न आल्याने आघाडीत बिघाडी झाली, असे चित्र जिल्हा परिषदेत पाहावयास मिळाले.

Web Title: Jalna Zilla Parishad Against the Front Against Jigala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.