जालना रोड, बीड बायपास ‘बीओटी’वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2017 01:04 IST2017-07-13T00:54:24+5:302017-07-13T01:04:39+5:30

औरंगाबाद : बहुचर्चित आणि प्रतीक्षेत असलेल्या जालना रोड, बीड बायपास रुंदीकरण प्रकल्पाला घरघर लागण्याची चिन्हे आहेत.

Jalna Road, Beed Bypass 'BOT' | जालना रोड, बीड बायपास ‘बीओटी’वर

जालना रोड, बीड बायपास ‘बीओटी’वर

विकास राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : बहुचर्चित आणि प्रतीक्षेत असलेल्या जालना रोड, बीड बायपास रुंदीकरण प्रकल्पाला घरघर लागण्याची चिन्हे आहेत. ७८९ कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचा ‘स्कोप’ कमी करून ‘बीओटी’वर करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. मंगळवारी नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या (एनएचएआय) दिल्लीतील मुख्यालयात झालेल्या बैठकीत या प्रकल्पावर कुठलीही ठोस अशी चर्चा झाली नाही; मात्र प्रकल्पाचा ‘स्कोप’ कमी करून ‘बीओटी’वर करण्यासाठी चिंतन झाल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळाली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कालच्या बैठकीत मोघम चर्चा झाली. त्या प्रकल्पाचा ‘स्कोप’ कमी करण्याचे चालले आहे. हा एकच प्रकल्प नाही तर देशातील ज्या-ज्या शहरांतील रस्ते प्रकल्प एनएचएआयकडे आले आहेत, त्याबाबत एकत्रितच विचार होण्याचे संकेत आहेत. दोन आठवड्यांत केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी याबाबत निर्णय घेणार आहेत. काही तरी चांगला मार्ग निघणे अपेक्षित आहे. बीओटी (बांधा, वापरा, हस्तांतरण करा) या तत्त्वावर किंवा इतर काही पर्याय शोधण्यात येणार आहे. हे काम थांबणार किंवा रद्द होणार नाही; पण ‘स्कोप’ कमी करण्याचा मुद्दा पुढे आल्यामुळे वरिष्ठ काय निर्णय घेतात, याकडे लक्ष आहे.
२०१५ पासून जालना रोड, बीड बायपास रुंदीकरणाचा प्रस्ताव चर्चेत आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्याचा डीपीआर तयार करून एनएचएआयकडे पाठविला. १० महिन्यांपासून त्या प्रकल्पाच्या निविदा निघू शकल्या नाहीत. या प्रकल्पावर सहा ते आठ बैठका आजवर झाल्या. येथील प्रकल्प विभागाने थ्रीडी डिझाइन तयार करून तेही मुख्यालयाला सादर केले आहे.
‘स्कोप’ कमी करणे म्हणजे प्रस्तावित केलेली कामे कमी
करणे होय.
आहे त्या कामाच्या प्रस्तावामध्ये काही तरी पर्याय काढणे. ‘स्कोप आॅफ वर्क’मध्ये ज्या काही तरतुदी किंवा संकल्पित आराखडा तयार केला आहे, त्यातील काही कामे कमी करून प्रकल्प मार्गी लावण्यासाठी निर्णय घेणे म्हणजे ‘स्कोप’ कमी करणे होय. थोडक्यात कामांचा ‘वाव’ कमी होणे आहे. ७८९ कोटींपैकी कमी खर्चात हा प्रकल्प पूर्ण करण्याबाबत निर्णय होईल,अशी चर्चा आहे. जालना रोड १४ कि़मी., बीड बायपास १४ कि़मी.चे फक्त रुंदीकरण करण्यासाठी विचार होण्याची शक्यता आहे.

Web Title: Jalna Road, Beed Bypass 'BOT'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.