अपहरण प्रकरणी जालना एलसीबीने एकास उचलले
By Admin | Updated: November 17, 2015 00:32 IST2015-11-16T23:46:00+5:302015-11-17T00:32:35+5:30
बीड : व्यापाऱ्यास लुटमार करून त्याचे अपहरण व खंडणी उकळण्याचा कट रचणाऱ्या पाच आरोपीस ९ नोव्हेंबर जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले होते.

अपहरण प्रकरणी जालना एलसीबीने एकास उचलले
बीड : व्यापाऱ्यास लुटमार करून त्याचे अपहरण व खंडणी उकळण्याचा कट रचणाऱ्या पाच आरोपीस ९ नोव्हेंबर जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले होते. या पाच गुन्हेगारांच्या सहाव्या साथीदारास गुन्हे शाखेने बीड येथून सोमवारी अटक केली आहे.
दरम्यान त्या पाचही आरोपींच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी दिली.
जालना येथील नवीन मोढ्यातील आडत व्यापारी आशिष आनंद सेठिया यांच्या जवळील मोठी रक्कम लुटून त्यांचे अपहरण करण्याचा बेत बीड येथील पाच अट्टल गुन्हेगारांनी रचला होता. ते ९ नोव्हेंबर रोजी रात्री ७ वाजेच्या सुमारास नवीन मोढा ते भोकरदन नाका रस्त्यावर टाटासुमो वाहनात दबा धरून बसलेल्या या आरोपींना वरकड हॉस्पीटल समोरील मोकळ्या जागेत सापळा लावून जेरबंद करण्यात आले होते.
त्यात अन्वर खान मिर्झा खान उर्फ गुजर (३२ रा. इंद्रप्रस्थ कॉलनी बीड), शेख वसीम शेख वजीर (२६ रा. ढगे कॉलनी,अशोकनगर बीड), सय्यद नासेर सय्यद महेबूब (२४ रा.बालेपीर भरतभूषण क्षीरसागर नगर,बीड), सय्यद अहमद सय्यद महेबुब (२५ रा. संजयनगर गॅस गोडावून समोर जालना), व शेख उबेद शेख बाबु (२५ बागल नाक्या जवळ बीड) या पाच जणांना समावेश होता. त्यांच्या ताब्यातून टाटासुमो, एक तलवार, एक चाकु, दोरी असे साहित्य जप्त करण्यात आले होते.
याप्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करून आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १४ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. दरम्यान पोलिस कोठडीची मुदत संपल्याने पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आणखी दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती.
त्याची मुदत संपल्याने या आरोपींना सोमवारी पून्हा न्यायालयात हजर केले असता त्याना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान याप्रकरणी बीड येथून आणखी एका आरोपीस अटक करण्यात आले आहे. अलिम अहेमद जलील अहेमद असे त्याचे नाव आहे. (प्रतिनिधी)