जालना नगरीत अवतरली पंढरी...
By Admin | Updated: July 10, 2014 01:04 IST2014-07-10T00:41:34+5:302014-07-10T01:04:02+5:30
जालना : आषाढी एकादशीनिमित्त शहरवासियांचे दैवत समजले जाणाऱ्या आनंदी स्वामी महाराज यांची पालखी मिरवणूक बुधवारी काढण्यात आली.

जालना नगरीत अवतरली पंढरी...
जालना : आषाढी एकादशीनिमित्त शहरवासियांचे दैवत समजले जाणाऱ्या आनंदी स्वामी महाराज यांची पालखी मिरवणूक बुधवारी काढण्यात आली. या मिरवणुकीमुळे जुना जालना भाग ‘भज गोविंदम् भज गोपाल’ च्या घोषाने दुमदुमला होता. जालन्यात पंढरीच अवतरली होती.
सकाळी ८ वाजता आनंदी स्वामी महाराज यांची पालखी मिरवणूक निघाली. मिरवणुकीसमोर औरंगाबाद येथील धर्मसंग्राम क्रीडा मंडळाने विशेष ढोल-ताशाची मोफत व्यवस्था केली होती. दादाराव उस्ताद व देवराव उस्ताद यांच्या आखाड्यातील मल्लांनी वेगवेगळी प्रात्यक्षिके सादर करून लोकांचे लक्ष वेधले.
तुळजापूर येथील संस्कार भारती मंडळाचे पारंपरिक गोंधळ नृत्य हेही सर्वांचे आकर्षण ठरले. जय बजरंग व्यायाम शाळेच्या मल्लांनीही आपली प्रात्यक्षिके सादर केली. लाड गवळी समाजाच्या महिला भजनी मंडळाने विविध भजने सादर केली. तर आनंदीस्वामी भक्त मंडळाचे सेवेकरी टाळ-मृदंगाच्या गजरात ‘भज गोविंदम् भज गोपाल’ चा गजर करीत होते. पालखी ज्या मार्गावरून जात होती, तेथे सुवासिनींकडून ओवाळण्यात येत होते. महिला-पुरूष, युवक-युवती चौकाचौकात दर्शनासाठी प्रतीक्षा करीत होते. मिरवणुकीत सहभागी झालेल्या सेवेकऱ्यांसाठी तसेच उपस्थित भाविकांसाठी ठिकठिकाणी वैयक्तिकरित्या, विविध मंडळे, संस्था, संघटनांच्या वतीने मोफत चहा, पाणी, फराळाची व्यवस्था केली होती.
ही पालखी शनिमंदिर, कचेरी रोड, गणपती गल्ली, शास्त्री मोहल्ला, मार्गे बाजार चौकी येथे आली. या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या वतीने परंपरेप्रमाणे मंदिराचे पुजारी रमेश महाराज ढोले यांच्यासह आखाडेप्रमुख व प्रतिष्ठित नागरिकांचे स्वागत करण्यात आले.
मोरंडी मोहल्ला, कसबा, माळीपुरा, गांधी चमन, टाऊनहॉल मार्गे रात्री ९.३० वाजता परत मंदिरात पोहोचली. आनंदीस्वामी यात्रा महोत्सवानिमित्त शनिमंदिर ते गांधीचमन तसेच आनंदीस्वामी रोड परिसरात विविध स्टॉलवर आबालवृद्धांनी खरेदीसाठी गर्दी केली होती.
वाहतूक पोलिसांनी मिरवणुकीच्या मार्गावर दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहतूक बंद केली होती. (प्रतिनिधी)
‘भज गोविंदम् भज गोपाल’ चा गजर
या पालखी मिरवणुकीचे मुस्लिम समाजाच्या वतीने बाजार चौकी येथे स्वागत करण्यात आले. अतिरिक्त पोलिस अधीक्षक वसंत परदेशी, एकबाल पाशा, शाह आलमखान, शेख अख्तर, अय्यूबखान, पो.नि. अनिल विभूते, सतीश बदादे, विष्णूअप्पा सतकर, गणेश सुपारकर आदी उपस्थित होते.