जालना मतदारसंघ सभांविना सुनासुनाच!
By Admin | Updated: October 8, 2014 00:48 IST2014-10-08T00:25:00+5:302014-10-08T00:48:19+5:30
संजय कुलकर्णी , जालना निवडणूक रिंंगणातील प्रमुख राजकीय पक्षांच्या तसेच अपक्ष उमेदवारांनी सुद्धा प्रचाराच्या अंतिम टप्प्यात शहरात पदयात्रा व रॅलींवर भर दिला आहे.

जालना मतदारसंघ सभांविना सुनासुनाच!
संजय कुलकर्णी , जालना
निवडणूक रिंंगणातील प्रमुख राजकीय पक्षांच्या तसेच अपक्ष उमेदवारांनी सुद्धा प्रचाराच्या अंतिम टप्प्यात शहरात पदयात्रा व रॅलींवर भर दिला आहे. मात्र शहरात एखादा अपवाद वगळता एकाही बड्या नेत्याची सभा आतापर्यंत झालेली नाही.
या निवडणुकीत युती आणि आघाडी संपुष्टात आल्याने काँग्रेस, भाजपा, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षातील प्रमुख मंडळींची बरीच धावपळ झाली. घटस्थापनेच्या दिवशी हे चारही पक्ष स्वबळावर लढणार, हे स्पष्ट झाले. त्यामुळे या पक्षांमधील प्रमुख नेत्यांच्या सभा घेण्यासाठी राज्यात अनेक मतदारसंघातील उमेदवारांना बरीच कसरत करावी लागली.
परिणामी ऐन प्रचाराच्या काळातही प्रचार सभांसाठी प्रमुख नेत्यांची वेळ मिळणे कठीण झाले. जालना शहरात काँग्रेसचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी माजी केंद्रीय मंत्री मुकूल वासनिक यांची सभा झाली. शिवसेनेचे उमेदवार अर्जुन खोतकर यांच्या प्रचारार्थ संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर यांची सभा झाली. परंतु या दोन्ही व अन्य उमेदवारांच्या प्रचारार्थ शहरात एकाही बड्या नेत्याची सभा अद्याप झालेली नाही. ८ आॅक्टोबर रोजी बसपाचे उमेदवार रशीद पहेलवान यांच्या प्रचारार्थ नेत्या मायावती यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीयमंत्री शरद पवार, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, खा. सुप्रिया सुळे, छगन भूजबळ या नेत्यांच्या सभा जिल्ह्यात काही मतदारसंघात झाल्या. मात्र जालना विधानसभा मतदारसंघात एकाही बड्या नेत्याची सभा मंगळवारपर्यंत झालेली नाही. सहा दिवसांचाच कालावधी राहिल्याने या कालावधीत कोणत्या नेत्यांच्या सभा होतात, याकडे येथील लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)