जालन्यात महायुतीने केला हिशेब चुकता

By Admin | Updated: May 18, 2014 00:50 IST2014-05-18T00:41:17+5:302014-05-18T00:50:49+5:30

जालना विधानसभा मतदारसंघात प्रकर्षाने नाराजीचा सूर असतानाही खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी यावेळी काँग्रेस आघाडीचे उमेदवार विलास औताडे यांच्यापेक्षा २९२९९ मतांची आघाडी मिळविली.

In Jalna, the accounts of the corporation can be paid | जालन्यात महायुतीने केला हिशेब चुकता

जालन्यात महायुतीने केला हिशेब चुकता

जालना विधानसभा मतदारसंघात प्रकर्षाने नाराजीचा सूर असतानाही केवळ मोदी लाटेच्या जोरावर खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी यावेळी काँग्रेस आघाडीचे उमेदवार विलास औताडे यांच्यापेक्षा २९२९९ मतांची आघाडी मिळविली. २००९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीचे उमेदवार कल्याण काळे यांनी दानवेंना अटीतटीची लढत देऊन या मतदारसंघातून १५ हजारांचे मताधिक्य मिळविले होते. त्यानंतरही गेल्या पाच वर्षांत प्रभाव पडेल, अशी कामगिरी न झाल्याने दानवे यांच्याविषयी या मतदारसंघात नाराजीचा सूर व्यक्त होत होता. यंदाच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री हरिभाऊ बागडे हेही लोकसभेसाठी इच्छूक असल्याने त्यांचे समर्थक त्यांच्या पाठिशी होते. त्यामुळे काही काळ दानवेंना अडचणीचा गेला. मात्र नंतर पक्षश्रेष्ठींनी बागडे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी वर्णी लावून त्यांची नाराजी दूर केल्यानंतर बागडे हे मतदारसंघात एक-दोन प्रचार फेर्‍यांमध्ये दिसून आले. दुसरीकडे काँग्रेस आघाडीचे उमेदवार विलास औताडे यांच्या प्रचारासाठी या मतदारसंघात अ.भा. काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची जाहीर सभा झाली. आ. कैलास गोरंट्याल, जिल्हाध्यक्ष भीमराव डोंगरे यांच्यासह काँग्रेस आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दिवस-रात्र मेहनत घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अंकुशराव टोपे यांनीही जोर लावला. तर दानवेंच्या प्रचारासाठी माजी मंत्री अर्जुन खोतकर, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, भाजपाचे शहराध्यक्ष विरेंद्र धोका यांच्यासह महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शहरातील वार्ड व गावोगाव पिंजून काढले. जालना नगरपालिका व पंचायत समिती काँग्रेस आघाडीच्या ताब्यात असल्याने त्याचाही फायदा औताडे यांना होईल, अशी अपेक्षा होती. परंतु या मतदारसंघात स्वत: औताडे यांचा संपर्क कमी पडला. वास्तविक दानवे हेही प्रचाराच्या शेवटच्या दिवशीच या मतदारसंघात आले. त्यामुळे मतदार कोणाला पसंती दर्शवितात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर मतांचे पारडे दानवेंच्या बाजूने पडले. जालना शहरात काँग्रेस आघाडी व भाजपा-सेना युतीसाठी मतदानाचे गणित पूर्वीपासूनच ‘फिप्टी-फिप्टी’ असेच समजले जाते. मात्र या निवडणुकीत हा अंदाजही सपशेल खोटा ठरला. सर्वजातीय युवकवर्ग मोदी लाटेकडे आकर्षित झाल्याने महायुतीला शहरातूनही मताधिक्य मिळाले.गेल्या निवडणुकीत जालना विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस आघाडीचे उमेदवार कल्याण काळे यांनी रावसाहेब दानवेंपेक्षा सुमारे १५ हजारांचे मताधिक्य मिळविले होते. काळे यांना या मतदारसंघातून ५३ हजार १६३ तर दानवे यांना ३८ हजार १६६ मते मिळाली होती. या निवडणुकीत काँग्रेस आघाडीचे औताडे यांना ५४४५८ तर महायुतीचे दानवे यांना ८३७५७ मते मिळाली. २९२९९ मतांची आघाडी दानवे यांनी मिळविली. जालना विधानसभेत कॉंग्रसचे आ. कैलास गोरंट्याल यांनी औताडेंसाठी मोठी खिंड लढविली. मात्र मोदी लाट व युवा वर्गाची मोदींना असलेली पसंतीमुळे खा. रावसाहेब दानवे यांचा विजय सुकर झाला. काँग्रेसने मतदारांना काँग्रेस आघाडीने राबविलेल्या विविध योजनांची माहिती दिली. केलेल्या विकास कामांचे दाखले दिले. मात्र मोदींच्या जादूपुढे विलास औताडे यांचा निभाव लागला नाही. यंदाच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री हरिभाऊ बागडे हेही लोकसभेसाठी इच्छूक असल्याने त्यांचे समर्थक त्यांच्या पाठिशी होते. त्यामुळे काही काळ दानवेंना अडचणीचा गेला. यामुळे दानवे व समर्थक चांगलेच कोंडित सापडले होते.

Web Title: In Jalna, the accounts of the corporation can be paid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.