जायकवाडीत जेमतेम; मात्र वरील धरणांत मुबलक साठा
By Admin | Updated: November 5, 2014 01:00 IST2014-11-05T00:54:01+5:302014-11-05T01:00:12+5:30
औरंगाबाद : सध्या जायकवाडी धरणात जेमतेम पाणीसाठा असला, तरी जायकवाडीच्या वरील भागात नगर, नाशिक जिल्ह्यांतील धरणे मात्र काठोकाठ भरलेली आहेत.

जायकवाडीत जेमतेम; मात्र वरील धरणांत मुबलक साठा
औरंगाबाद : सध्या जायकवाडी धरणात जेमतेम पाणीसाठा असला, तरी जायकवाडीच्या वरील भागात नगर, नाशिक जिल्ह्यांतील धरणे मात्र काठोकाठ भरलेली आहेत. भंडारदरा, दारणा, पालखेडसह बहुतेक धरणांमधील साठा ९५ टक्क्यांच्या जवळ आहे. सर्व धरणांचा एकत्रित विचार केल्यास दोन्ही जिल्ह्यांतील मोठ्या प्रकल्पांमध्ये सरासरी ८२ टक्के जलसाठा उपलब्ध आहे.
जायकवाडीत येणारे मराठवाड्याचे हक्काचे पाणी गेल्या अनेक वर्षांपासून नगर, नाशिक जिल्ह्यांत अडविले जात आहे. त्यामुळे जायकवाडीत पाण्याची आवक घटली आहे. या पार्श्वभूमीवर गोदावरी खोऱ्यातील पाण्याच्या समन्यायी वाटपाच्या मागणीसाठी अनेक संघटनांचा लढा सुरू आहे. त्यावर जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने महामंडळाला नुकतेच कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. अपरिहार्य वापर काढून उर्वरित पाणी जायकवाडीत सोडावे, असे आदेशात म्हटले आहे. सद्य:स्थितीत वरच्या भागातील धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा आहे. नगर आणि नाशिक जिल्ह्यांतील १४ मोठ्या प्रकल्पांमध्ये सरासरी ८२ टक्के पाणी आहे.
यातील १० मोठे प्रकल्प हे ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यात म्हणजे जायकवाडीच्या वर आहेत. त्यापैकी दारणा, करंजवन, भंडारदरा, कडवा ही धरणे शंभर टक्के भरलेली आहेत, तर दारणा, गंगापूर, भावली, पालखेड, मुळा या धरणांमध्येही ९१ टक्क्यांपेक्षा जास्त साठा आहे.