३५ वर्षांपासून फरार आरोपी जेरबंद
By Admin | Updated: January 14, 2017 00:27 IST2017-01-14T00:24:39+5:302017-01-14T00:27:22+5:30
लातूर : १९८१ साली रेणापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घर जाळल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या रेकॉर्डवरील फरार आरोपींच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल ३५ वर्षांनंतर आवळल्या आहेत.

३५ वर्षांपासून फरार आरोपी जेरबंद
लातूर : १९८१ साली रेणापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घर जाळल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या रेकॉर्डवरील फरार आरोपींच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल ३५ वर्षांनंतर आवळल्या आहेत. ३५ वर्षांपासून फरार असलेल्या बबऱ्या शितोळ्या भोसले (५७) याला घाटशिळ (तुळजापूर) येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.
चाकूर तालुक्यातील मुळचा कारेवाडी येथील असलेला बबऱ्या शितोळ्या भोसले याच्याविरुद्ध १९८१ साली रेणापूर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ०९/१९८१ कलम ४३६ भादंविनुसार गुन्हा दाखल होता. त्याच्या विरोधात झोपडपट्टीतील घर जाळल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल असून, तो घटनेपासून आजपर्यंत फरारच होता. दर महिना-दोन महिन्यांनी बबऱ्या भोसलेचे कुटुंब हे रोजगारानिमित्त स्थलांतर होत असे. सातत्याने त्याचे होणारे स्थलांतर यामुळे तो गेल्या ३५ वर्षांपासून रेकॉर्डवरील फरार गुन्हेगार होता. बबऱ्या शितोळ्या भोसले याच्यावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. गेल्या ३५ वर्षांपासून पोलिसांना तो गुंगारा देत होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला बबऱ्या शितोळ्या भोसले हा वेताळ झोपडपट्टी घाटशिळ (तुळजापूर) येथे राहत असल्याची माहिती मिळाली. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी खातरजमा करून त्याला जेरबंद करण्याचे नियोजन केले. गुरुवारी रात्री त्याच्या राहत्या घरातून त्याला जेरबंद केले. या पथकात बालासाहेब मस्के, सदानंद योगी, रणवीर देशमुख, भिष्मानंद साखरे, थडकर यांचा समावेश आहे.