जायकवाडीतील ओघ मंदावला
By Admin | Updated: September 8, 2014 00:35 IST2014-09-08T00:08:56+5:302014-09-08T00:35:43+5:30
पैठण : जायकवाडी धरणावरील धरणातून मोठ्या प्रमाणात करण्यात आलेल्या विसर्गामुळे जायकवाडीत ३१८५० क्युसेक्स क्षमतेने पाणी दाखल होत आहे.

जायकवाडीतील ओघ मंदावला
पैठण : जायकवाडी धरणावरील धरणातून मोठ्या प्रमाणात करण्यात आलेल्या विसर्गामुळे जायकवाडीत ३१८५० क्युसेक्स क्षमतेने पाणी दाखल होत आहे. भंडारदरा धरणाचे पाणी रविवारी पहाटे जायकवाडीत दाखल झाल्याने २२०५० वरून आवक ३१८५० पर्यंत पोहोचली आहे. दरम्यान रविवारी सकाळपासून वरील धरणातून विसर्ग घटविण्यात आला आहे. धरणात ३५ टक्के जलसाठा झाला आहे.
१५२२ फूट जलक्षमता असलेल्या धरणाची रविवारी सायंकाळी पाणी पातळी १५०७.२८ इतकी झाली होती. धरणात एकूण जलसाठा १४८९.८२८ द.ल.घ.मी. झाला असून, यापैकी ७२१.७२२ द.ल.घ.मी. उपयुक्त (जिवंत जलसाठा) आहे.
जायकवाडी धरणाच्या बंदिस्त पाणलोट क्षेत्रात गेल्या आठवड्यात जोरदार पाऊस सुरू होता. या पावसाचे पाणी साठविण्यासाठी तेथील धरणात पॉकेट शिल्लक नसल्याने गेल्या दोन दिवसांपासून या धरणातून विसर्ग वाढविण्यात येत होता शनिवारी नांदूर मधमेश्वर प्रकल्पातून तब्बल ३१२५४ व ओझर वेअरमधून ७६४९ क्युसेक्स विसर्ग करण्यात येत होता. त्यामुळे आवक चांगलीच वाढली होती.
गेल्या २४ तासांत पाणलोट क्षेत्रात कोठेही दखलपात्र पाऊस झाला नाही यामुळे वरील धरणातून रविवारी पहाटेपासून विसर्ग घटविण्यात येत होता. नांदूर मधमेश्वर प्रकल्पातून शनिवार ६ रोजी ३१२५४ विसर्ग सुरू होता तो रविवारी सकाळी ६३१० क्यसेक्सपर्यंत घटविण्यात आला, तर ओझर वेअरमधून ७६४९ क्युसेक्स विसर्ग होत होता तो ३८८३ पर्यंत घटविण्यात आला. निळवंडीतून ओझर, वेअरमध्ये ६२१९ क्युसेक्स विसर्ग होत होता तो ३७९९ पर्यंत घटविण्यात आला.
भंडारदराचे पाणी प्रथमच दाखल
अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा व निळवंडे ही दोन्ही धरणे या मोसमात अनेकवेळा पूर्ण क्षमतेने भरली; परंतु या धरणातून जायकवाडीसाठी पाणी न सोडता दोन्ही धरणाच्या लाभक्षेत्रातील जलसाठे भरून घेण्यास प्राधान्य देण्यात आले यामुळे या धरणातून जायकवाडीस पाणी मिळते का नाही याकडे मराठवाड्याचे लक्ष लागले होते.
दरम्यान ६ रोजी दोन्ही धरणे १००% भरलेली असताना दोन्ही धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू झाला व धरणातून पाणी सोडण्याशिवाय पर्यायच न राहिल्याने भंडारदरातून ८१२ क्युसेक्स, निळवंडेतून ६२१९ व ओझर वेअरमधून ७६४९ क्युसेक्स पाणी सोडण्यात आले.
ओझर वेअर ते जायकवाडी धरण हे १२९ कि.मी. अंतर असून ओझर वेअरमधून सुटलेले पाणी जायकवाडीत पोहोचण्यासाठी २४ तासांचा कालावधी लागतो. हे पाणी रविवारी पहाटे जायकवाडीत दाखल झाले व आवक वाढली.