जायकवाडी @ ४१ टक्के
By Admin | Updated: August 8, 2016 00:27 IST2016-08-08T00:25:13+5:302016-08-08T00:27:47+5:30
पैठण : नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर मंदावल्याने या जिल्ह्यातील धरण समूहातून विसर्ग घटविण्यात आला.

जायकवाडी @ ४१ टक्के
पैठण : नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर मंदावल्याने या जिल्ह्यातील धरण समूहातून विसर्ग घटविण्यात आला. मात्र, शनिवारी या धरणांतून झालेल्या मोठ्या विसर्गामुळे गोदावरी भरभरून वाहत असून, रविवारी (दि.७) सायंकाळी जायकवाडी धरणात ७३,४९९ क्युसेक्सने आवक सुरू होती. वरील धरणांतून घटविलेला विसर्ग लक्षात घेता मध्यरात्रीनंतर धरणातील आवक घटण्याची शक्यता आहे. सध्या जायकवाडी धरणात ४१% जलसाठा झाला आहे.
जायकवाडी धरणात रविवारी दुपारी १ वा. ४४,०९९ क्युसेक्स क्षमतेने होणारी आवक दुपारनंतर ७३,४९९ क्युसेक्सपर्यंत वाढली होती. वरून येणारे पाणी लक्षात घेता धरणात आवक होतच राहणार असून, जायकवाडीच्या जलसाठ्यात सोमवारी (दि.८) सायंकाळपर्यंत ४५% पर्यंत वाढ होण्याची अपेक्षा धरण अभियंता अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली.
जायकवाडी धरणाची पाणीपातळी १४ मार्च रोजी मृतसाठ्यात गेली होती. यादरम्यान धरणातून पिण्यासाठी २६७.०१२ दलघमी (९.४२ टीएमसी) पाणी उपसा करण्यात आला होता. हा मृतसाठा भरून उपयुक्त जलसाठा ४१% झाला आहे. रविवारी सायंकाळी ६ वा. धरणाची पाणीपातळी १,५०८.८१ फूट झाली होती. धरणात एकूण जलसाठा १,६०४.४६५ दलघमी (५६.६५ टीएमसी) झाला असून, यापैकी उपयुक्त जलसाठा ८६६.३५९ दलघमी (३०.५९ टीएमसी) एवढा आहे.