‘जय जिजाऊ- जय शिवराय’

By Admin | Updated: January 13, 2017 00:32 IST2017-01-13T00:31:26+5:302017-01-13T00:32:35+5:30

बीड : जय जिजाऊ- जय शिवराय अशा गगनभेदी घोषणांसह सळसळत्या वातावरणात निघालेल्या मिरवणुकीने शहरवासियांच्या डोळ्याचे गुरुवारी अक्षरश: पारणे फेडले.

'Jai Jijau - Jai Shivrai' | ‘जय जिजाऊ- जय शिवराय’

‘जय जिजाऊ- जय शिवराय’

बीड : कंदिलाची आकर्षक विद्युत रोषणाई... ढोलताशांचा निनाद... डौलाने फडकणारे भगवे झेंडे... जय जिजाऊ- जय शिवराय अशा गगनभेदी घोषणांसह सळसळत्या वातावरणात निघालेल्या मिरवणुकीने शहरवासियांच्या डोळ्याचे गुरुवारी अक्षरश: पारणे फेडले. उंट- घोडे, झांज, तलवार, दांडपट्टा पथकांनी सादर केलेल्या कलांतून शिवकालीन इतिहासाचा पटही उलगडला. छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या वेशभूषेतील बालके... फुलांनी सजवलेल्या रथातील राजमाता जिजाऊ यांची प्रतिमा... हे मिरवणुकीचे आकर्षण ठरले.
राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त महिनाभरापासून संयोजन समितीतर्फे जय्यत तयारी सुरु होती. गुरुवारी सकाळी प्रियदर्शनी गार्डनमधील पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी नागरिकांची गर्दी होती. तेथे दिवसभर विविध कार्यक्रमांची रेलचेल होती. सायंकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलापासून मुख्य मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर ध्वजपूजन झाले. भगवा झेंडा डौलाने झळकावून मिरवणूक मार्गस्थ झाली.
यावेळी मिरवणुकीत सहभागी महिला- मुलींच्या डोक्यावर भगवे फेटे होते. ठिकठिकाणी या मिरवणुकीचे शहरवासियांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले. ठिकठिकाणी रस्त्यांवर व घरांच्या छतावर मिरवणूक पाहण्यासाठी गर्दी दिसून आली. महिलांच्या सुरक्षिततेसाठी स्वयंसेवकांनी रस्त्याच्या दुतर्फा हाताची साखळी केली होती.
अग्रभागी पोलीस व स्वयंसेवक मिरवणुकीसाठी रस्ता मोकळा करत होते. सुभाष रोड, माळीवेस, धोंडीपुरा, बलभीम चौक, कारंजा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून नगररोड मार्गे मिरवणूक राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याजवळ पोहोचली. तेथे जिजाऊ वंदना घेण्यात आली. त्यानंतर शाहीर संतोष साळुंके यांच्या पोवाड्याच्या कार्यक्रमाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: 'Jai Jijau - Jai Shivrai'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.