जगतुंग समुद्र इतिहासजमा होण्याच्या उंबरठ्यावर
By Admin | Updated: January 16, 2016 23:51 IST2016-01-16T23:49:52+5:302016-01-16T23:51:54+5:30
गंगाधर तोगरे, कंधार राष्ट्रकुटकालीन जलव्यवस्थापनाचा उत्तम नमुना असलेल्या जगतुंग समुद्राची वाट खडतर बनत चालली आहे़

जगतुंग समुद्र इतिहासजमा होण्याच्या उंबरठ्यावर
गंगाधर तोगरे, कंधार
राष्ट्रकुटकालीन जलव्यवस्थापनाचा उत्तम नमुना असलेल्या जगतुंग समुद्राची वाट खडतर बनत चालली आहे़ शासनाचे व प्रशासनाचे याकडे होणारे दुर्लक्ष, लोकप्रतिनिधींचा अपुरा पाठपुरावा, विकासाच्या श्रेयावरून होणारे अंतर्गत राजकारण आदी कारणांनी हा ऐतिहासिक ठेवा इतिहासजमा होण्याच्या उंबरठ्यावर असल्याचे विदारक चित्र आहे़
1कंधार शहराची निर्मिती करताना राष्ट्रकुटकालीन राजांनी सर्वांगीण विकासाचा दृष्टेपणाचा आदर्श घालून दिला़ बांधकाम, भुईकोट किल्ला आदींनी शहराचे वैभव वाढविण्याचा जसा प्रयत्न केला, तसाच शहराच्या सोयी-सुविधा वाढविणे व त्यात सतत भर घालणे यावर सातत्याने भर दिला़ बालाघाट डोंगर, दक्षिणेला मानार नदी व उत्तरेला जगतुंग समुद्र असून त्यात शहर वसले आहे़ ही सौंदर्याची खाण आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही़ म्हणूनच पर्यटक, इतिहासप्रेमी व नागरिकांना शहर भूरळ घालते़
2शहरालगतचा जगतुंग समुद्र म्हणजे जलव्यवस्थापन व स्थापत्यशास्त्राचा अजब नमुना मानला जातो़ समुद्रात पाण्याच्या प्रवाहावरील मंदिर म्हणजे तत्कालीन स्थापत्यशास्त्र पराकोटीचे विकसित होते़ असेच म्हणणे क्रमप्राप्त ठरते़
3जगतुंग समुद्राची बांधणी ही राष्ट्रकुट राजा कृष्ण (पहिला) यांनी केली़ राजा कृष्ण (तिसरा) यांनी त्याची पुनर्बांधणी केली़ समुद्राचा बांध ९०० मीटर दक्षिण-उत्तर तर त्याची रुंदी पाच मीटरची आहे़ व्यास ४४९ मैल असा आहे़ समुद्राला कोणतीही नदी-उपनदी मिळत नसतानाही समुद्र सतत भरलेला असायचा़ समुद्राचे क्षेत्रफळ ८८़३४ हे़आर असे आहे़ शहर व शेतीला पाणीपुरवठा करण्याची शाश्वत हमी असावी़ अशा पद्धतीच्या नियंत्रण आणि स्वच्छ करण्यासाठी निरगडी असावी़ असे एकंदरीत येथे व्यवस्था असावी़ काळाच्या ओघात वरील येणारे पाणी कमी झाले, पर्जन्यमान घटले आणि जगतुंग समुद्रातील जलसाठा आटला आणि अनेकदा जगतुंग समुद्र कोरडाठाक पडला़ त्यामुळे कंधार, नवरंगपुरा, कोटबाजार, मानसपुरी आदी गावांना, शेतींना याचा फटका बसला़ कोट्यवधींच्या पाणीपुरवठा योजना जलस्त्रोताअभावी कोरड्याठाक झाल्या़
4जगतुंग समुद्र कोरडाठाक पडत असल्याने दुष्काळात अडकलेल्या शेतकऱ्यांनी त्यात शेतीचा प्रयोग चालविला़ गत काही वर्षांपासून हा प्रयोग केला जातो़ जगतुंग समुद्राच्या काठावर सुशोभिकरणासाठी मोठा निधी खर्च केला जात आहे़ परंतु जलदगतीने यात पाणी आणण्यासाठीचे प्रयत्न झाले नसल्याचे सद्यस्थितीचे चित्र आहे़ अप्पर मानार प्रकल्पाचा कालवा नवघरवाडीपासून गेला आहे़ तेथून उपकालव्याद्वारे पाणी जगतुंग समुद्रात आणले असते तर सर्व भाग तलावाचा पाण्यांनी व्यापला असता़ शहरासह लगतच्या गावांचा पाणी व सिंचनाचा प्रश्न निकाली निघाला असता़ त्यासाठी माजी खा़ व माजी आ़भाई डॉक़ेशवराव धोंडगे सतत पाठपुरावा करतात़ अॅड़मुक्तेश्वर धोंडगे, जि़प़ सदस्य प्रा़डॉ़पुरुषोत्तम धोंडगे यांनी आंदोलने केली़ अनेक गावच्या सरपंच, ग्रा़पं़ सदस्यांनी पाठिंबा दिला़ परंतु अद्याप हा प्रश्न मार्गी लागला नाही़
5शासन व प्रशासनाने जगतुंग समुद्र सतत पाण्याने भरलेला असावा यासाठी तत्काळ त्यासाठी कार्यवाही करण्याची गरज आहे़ सर्वच लोकप्रतिनिधींनी यासाठी प्रयत्न व पाठपुरावा करण्याची गरज आहे़ विकास कोणामुळे झाला हे जनता ओळखते़ त्यासाठी श्रेयावरून या भागातील रंगणारे राजकारण बाजूला करत विकास करावा, अशी जनतेची भावना आहे़ अन्यथा ऐतिहासिक जगतुंग समुद्र हा शेती व खेळाच्या मैदानापुरता राहील आणि काळाच्या ओघात इतिहासजमा होईल, अशी भीती सुज्ञ नागरिक, इतिहासप्रेमी व पर्यटकांतून व्यक्त केली जात आहे़ इतिहासजमा होण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या जगतुंग समुद्राची काळजी घेण्याची गरज आहे़