अवकाळी नाही, पण नुकसान टाळता येते
By Admin | Updated: March 13, 2015 00:42 IST2015-03-13T00:33:04+5:302015-03-13T00:42:37+5:30
लातूर : हवामान बदलामुळे वातावरणातील अतिरेकी लहरी सक्रिय झाल्या आहेत. त्यातून ‘अवकाळी’ जन्मतो. याला रोखणे शक्य नाही. पण प्रभावी विज्ञान आणि तंत्रज्ञान वापरुन

अवकाळी नाही, पण नुकसान टाळता येते
लातूर : हवामान बदलामुळे वातावरणातील अतिरेकी लहरी सक्रिय झाल्या आहेत. त्यातून ‘अवकाळी’ जन्मतो. याला रोखणे शक्य नाही. पण प्रभावी विज्ञान आणि तंत्रज्ञान वापरुन अचूक अंदाजाने अवकाळीमुळे होणारे शेतीचे नुकसान टाळणे शक्य आहे, असे मत पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनी येथे व्यक्त केले.
‘लोकमत’ कार्यालयात ‘डिस्कस् फोरम्’ वर ‘हवामान बदलाविषयी चिंतन’ व्यक्त करताना ते गुरुवारी बोलत होते. मराठवाड्यातच सध्या गारा व अवकाळी पाऊस पडत आहे. कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन हवा उष्ण होत आहे. त्यामुळे आपल्याकडे गारांचा पाऊस पडत आहे. याला मानवांनी केलेले प्रदूषण कारणीभूत आहे. त्यातल्या त्यात कार्बन वायूचे उत्सर्जन. त्याला शोषणारी झाडे नाहीत. समुद्रही कमी पडतोय. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून फेब्रुवारी-मार्च महिन्यात अवकाळी व गारांचा पाऊस पडत आहे. आपणच नव्हे तर १९९५ पासून आख्खे जग वातावरणीय बदलामुळे अणुबॉम्बच्या संकटाइतके संकटात आहे. आपल्यासारख्या विकसनशील देशातील शेतकऱ्यांची तर यामुळे माती होतेय. गेल्या तीन-चार वर्षांत या लहरींची सक्रियता अधिक तीव्र आहेत. त्यासाठी हवामान खाते सक्षम हवे. परदेशात ‘२ वाजून ४० मिनिटांनी तीन मिली पाऊस पडणार’ असे खात्रीने सांगितले जाते आणि तसेच होते. आपण हवामानशास्त्रात खूप मागे आहोत. वीज पडणार असेल तर सहा तासांपूर्वी ती पडणार असल्याची माहिती प्रगत विज्ञानातून मिळते, असे संशोधन आपल्याकडे विकसीत नाही. त्यामुळे आपल्याला नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
हवामान खात्याने अंदाज वर्तविला नाही तर तो कायदेशीर गुन्हा ठरवायला हवा. याची त्यांना शिक्षा मिळायला हवी. तर अचुकता येईल.
४प्रदूषणामुळे अवकाळी येतो. शेतकरी प्रदूषण करीत नाही. फक्त शहरी श्रीमंतांच्या प्रदूषणाचा फुकट अतोनात फटका सहन करतो आहे.
हवामान बदलाच्या दृष्टीने भारतीय संशोधन जुनाट पद्धतीचे आहे. ते कालबाह्य झाले आहे. कालबाह्य पद्धतीच्या संशोधनावर देशाच्या हवामानाचे व्यवस्थापन आहे. भारताशेजारील चीनमध्ये हवामानाचा अंदाज दिला जात आहे. रसायनांच्या तोफा ढगांवर उडवून किंवा विमानाने रसायने फवारुन बरोबर तळ्यावर पाऊस तिथे पाडला जातो. परंतु, आपल्याकडे ही सोय नाही. त्यांच्यासारखे गारांचे पावसात रुपांतर करण्याचे विज्ञानही आपल्याकडे नाही.
विलासराव मुख्यमंत्री असताना राज्यात पाच ठिकाणी ‘डॉपलर रडार’ बसविण्याची योजना होती. ती बासनात आहे. यामुळे ढग कुठे आहेत ?, त्यांचा वेग किती आहे ? त्यांना गाठून कुठे कृत्रिम पाऊस पाडता येईल, हे ठरु शकते.
४प्रत्येक गावात पर्जन्यमापक, तापमापक आणि आर्द्रतामापक यंत्र हवे. आपल्याकडे औसा येथे गेल्या वर्षी १०० वर्षातील सर्वाधिक पाऊस एका दिवशी पडला. याची दप्तरी इत्यंभूत नोंद नसल्याने विमा शक्य झाला नाही.
४हवामान खात्याने दिलेले अंदाज लोकांपर्यंत तातडीने पोहोचविण्याची शासनाकडे सक्षम यंत्रणा हवी. जेणेकरुन उपाययोजनांने पिके वाचतील.
४हवामान खाते केंद्राचे असल्याने कर्मचारी राज्याला जुमानत नाहीत. राज्यानेही पर्यायी यंत्रणा उभी करायला हवी. अनेक कायदे केंद्र-राज्याचेही आहेत. यासाठी स्वतंत्र खातेही हवे. केरळ, ओरिसा करते महाराष्ट्र का करीत नाही ?
४पाऊस कमी होतो आहे. त्याचे तास कमी होताहेत. शंभर तासांचा पाऊस चाळीस तासांवर आला आहे. हवामान खाते विकसित झाल्यासच त्याचा थेंबन् थेंब साठविता येणे शक्य आहे.
४भारतामध्ये दरवर्षी दहा अब्ज डॉलर्सचे नुकसान हवामान बदलामुळे होते. आता एक लाख खर्च केले तर आपत्तीतले १५ लाख वाचविता येतात. या आपत्ती टाळता येतात टाळायलाच हव्यात.