गंधा है पर यह पानी का धंदा है
By Admin | Updated: July 8, 2014 01:06 IST2014-07-08T00:54:02+5:302014-07-08T01:06:38+5:30
विनोद काकडे , औरंगाबाद तुम्ही पिण्यासाठी किंवा वापरण्यासाठी खाजगी टँकरचे पाणी विकत घेत असाल तर सावधान! त्या पाण्यापासून तुम्हाला गंभीर आजार उद्भवू शकतात.

गंधा है पर यह पानी का धंदा है
विनोद काकडे , औरंगाबाद
तुम्ही पिण्यासाठी किंवा वापरण्यासाठी खाजगी टँकरचे पाणी विकत घेत असाल तर सावधान! त्या पाण्यापासून तुम्हाला गंभीर आजार उद्भवू शकतात. ते पाणी तुमच्या जीवावरही बेतू शकते. कारण बहुतांश खाजगी टँकरवाले चक्क विमानतळाच्या भिंतीजवळ असलेल्या मुकुंदवाडी, संघर्षनगरच्या नाल्यातील घाण पाणी टँकरमध्ये भरून ते ‘पिण्याचे पाणी’ म्हणून लोकांना विकत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
आधीच मनपाच्या ढिसाळ नियोजनामुळे शहरवासीयांना पुरेसे पाणी मिळत नाही. त्यातच यंदा पावसाने दगा दिल्याने पाणीसाठे आटत चालले आहेत. परिणामी, नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मनपाच्या हद्दीबाहेर असलेल्या सातारा, देवळाई, बीड बायपास या परिसरातील नागरिकांना तर तहान भागविण्यासाठी टँकरशिवाय पर्यायच नाही. अशा या परिस्थितीमुळे खाजगी टँकरवाल्यांचा पाणी विक्रीचा धंदा चांगलाच फोफावलेला आहे. नागरिकांच्या मागणीइतके पाणी आणि पाण्याचे स्रोत या टँकरवाल्यांकडे उपलब्ध नाहीत.
अशा परिस्थितीत पैसे कमविण्यासाठी काही टँकरवाल्यांनी चक्क नाल्यातील मलमिश्रित पाणी नागरिकांना पाजण्यास सुरुवात केली आहे.
विमानतळ भिंतीजवळ ‘उद्योग’
1चिकलठाणा विमानतळाच्या भिंतीलगतच एका इसमाने पाणी विक्रीचा असाच जीवघेणा उद्योग सुरू केलेला आहे. या भिंतीलगत त्या इसमाची जमीन आहे. त्याच्या जमिनीच्या बाजूनेच मुकुंदवाडी, प्रकाशनगर, संघर्षनगर या परिसरातून नाला जातो. या नाल्यातील पाणी उपसून ते खाजगी टँकरवाल्यांना विकण्याचा उद्योग हा इसम बिनधास्त करीत आहे.
अशी लढविली शक्कल
2आपण नाल्यातील पाणी उपसा करून टँकरमध्ये भरतो, हे सहज कुणाच्या लक्षात येऊ नये म्हणून या इसमाने एक शक्कल लढविली आहे. नाल्याच्या बाजूला असलेल्या आपल्या शेताला त्याने पत्र्याचे कम्पाऊंड ठोकले आहे. कम्पाऊंडच्या आत विहिरीसारखा एक मोठा खोल खड्डा खोदलेला आहे. नाल्यामध्ये पाईप सोडून इंजिनच्या साह्याने ते घाण पाणी कम्पाऊंडच्या आत खोदलेल्या खड्ड्यात घेतल्या जाते. मग त्या खड्ड्यातील पाणी उपसण्यासाठी दुसरा एक पाईप आणि इंजिन बसविण्यात आलेले आहे. खड्ड्यातील पाणी या पाईपाच्या साह्याने बाहेर रोडवर उभ्या केलेल्या टँकरमध्ये भरण्यात येते. नाल्यातून उपसलेले पाणी काही वेळ खड्ड्यात साठविण्यात येते. त्यामुळे पाण्यातील गाळ व घाण खाली जाऊन बसते आणि पाणी थोड्या वेळाने स्वच्छ दिसते.
दिवसाकाठी भरले जातात शंभर टँकर
3याठिकाणाहून दिवसाकाठी शंभरच्या आसपास टँकर भरले जातात, असे आसपासच्या नागरिकांनी सांगितले. सदर प्रतिनिधीने पाणी विक्री करणाऱ्या या इसमाला हे पाणी कशासाठी विकता, अशी विचारणा केली. तेव्हा ‘हे पाणी बांधकामासाठी किंवा वापरण्यासाठी विकले जाते’ असे तो म्हणाला. त्यानंतर सदर प्रतिनिधीने येथे भरलेल्या एका टँकरचा पाठलाग केला असता तेव्हा हे टँकर गारखेडा परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये गेले आणि तेथे हे टँकर रिकामे करण्यात आले. यावरून हे पाणी नागरिकांना पिण्यासाठी किंवा वापरण्यासाठी विक्री होत असल्याचे स्पष्ट झाले.
अनेक ठिकाणी सुरू आहे हा ‘गंधा धंदा’
4विहीर किंवा बोअरमधील पाणी असल्याने सांगून नागरिकांना नाल्यातील पाणी पाजण्याचा ‘उद्योग’ केवळ विमानतळाच्या भिंतीजवळच सुरूआहे, असे नाही. शहरातील सातारा परिसर, जटवाडा परिसर, देवळाई, गारखेडा, पैठण रोड या परिसरातही ‘गंधे पानी का’ धंदा जोरदार सुरू आहे. नाल्याच्या बाजूला शेतजमीन असलेल्या अनेकांनी बोअर घेतलेले आहेत. या बोअरचे पाणी ते टँकरवाल्यांना विक्री करतात. प्रत्यक्षात या बोअरमध्येही नाल्याचेच पाणी सोडण्यात येते. अशा घाण पाण्यांचे शेकडो टँकर दररोज शहरात विक्री होत आहेत.
1विमानतळाच्या भिंतीजवळून वाहणाऱ्या नाल्यातून इंजिनच्या साह्याने पाणी उपसले जाते.
2हे पाणी या कम्पाऊंडच्या आत असलेल्या खड्ड्यात घेऊन तेथून दुसऱ्या पाईपाच्या साह्याने रोडवर उभ्या केलेल्या टँकरमध्ये भरले जाते. कुठले पाणी टँकरमध्ये भरले जाते हे यावरून स्पष्ट होते.
3टँकरमाफिया नागरिकांच्या जीवाशी कसा खेळ करीत आहेत, याची ही छायाचित्रे.