उशीर होतोय, आता सत्कार कशाला...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:05 IST2021-06-29T04:05:41+5:302021-06-29T04:05:41+5:30
औरंगाबाद : शाहगंज चमन येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी सोमवारी पालकमंत्री सुभाष देसाई हे शिवसेना नेते ...

उशीर होतोय, आता सत्कार कशाला...!
औरंगाबाद : शाहगंज चमन येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी सोमवारी पालकमंत्री सुभाष देसाई हे शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले.
त्याचे झाले असे की, पुतळा अनावरण कार्यक्रम सुरू होण्यास आधीच उशीर झाला होता. देसाई यांच्यासह प्रमुख अतिथींचा मनपातर्फे सत्कार कार्यक्रमही यावेळी झाला. यामुळे कार्यक्रमास आणखी उशीर होऊ लागला. मनपा प्रशासक यांचे प्रास्ताविकही झाले. त्यानंतर अचानक खैरे यांनी पालकमंत्र्यांचा सत्कार करण्याचा निर्णय घेतला. खैरेंच्या एका कार्यकर्त्याने सूत्रसंचालिकेकडे जाऊन तसे सांगितले. तिनेही तशी घोषणा केली. खैरे उभे राहून पालकमंत्र्यांच्या दिशेने वळाले. मनपातर्फे पुष्पगुच्छ देण्यात आला. मात्र तो नाकारत खैरे आपल्या माणसाची वाट पाहू लागले. खैरे यांचा माणूस भगवी शाल आणि स्पेशल बुके घेऊन येऊ लागला. कार्यक्रमाला उशीर होत असल्याचे पाहून देसाई यांची सहनशक्ती संपत चालली होती. चिडलेल्या देसाई यांनी व्यासपीठावरच आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. ‘उशीर होतोय, आता सत्कार कशाला’ अशा शब्दात त्यांनी सेना नेत्याला सुनावले. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. खैरे यांनी त्यांचा सत्कार केलाच.