इटोलीत बिबट्या जेरबंद
By Admin | Updated: July 28, 2014 00:53 IST2014-07-27T23:45:31+5:302014-07-28T00:53:13+5:30
संतोष दाभेकर, इटोली जिंतूर तालुक्यातील इटोली परिसरात २७ जुलै रोजी दुपारी बिबट्यास वन कर्मचाऱ्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने जेरबंद केले. मागील काही दिवसांपासून या भागात बिबट्या असल्याची चर्चा होती.
इटोलीत बिबट्या जेरबंद
संतोष दाभेकर, इटोली
जिंतूर तालुक्यातील इटोली परिसरात २७ जुलै रोजी दुपारी बिबट्यास वन कर्मचाऱ्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने जेरबंद केले. मागील काही दिवसांपासून या भागात बिबट्या असल्याची चर्चा होती.
इटोली हा परिसर डोंगराळ आणि जंगल असलेला भाग आहे. पूर्णा नदीकडेला मोठी वनराई आहे. याच भागात अनेकांची शेतीही आहे. या भागात एक बिबट्या असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांत होती. काही शेतकऱ्यांनी बिबट्याला पाहिले असल्याचेही सांगितले. याच दरम्यानच्या काळात एका शेतकऱ्याच्या गायीचे तीन वासरे आणि दोन दिवसांपूर्वी डिग्रस येथील शेतकऱ्याच्या वासरु बिबट्याने फस्त केले होते.
२७ जुलै रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास येथील शेतकरी कलंदर भाई यांच्या शेतातील आखाड्यावर बिबट्या असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
कलंदर भाई यांनी लगेच वन विभागाला ही माहिती दिली. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास वन विभागाचे शेख महेबूब, एफ.ए. अन्सारी, एस.जे. हाश्मी, जी.एल. घुगे हे इटोली येथे दाखल झाले. दुपारी १२ वाजेपासून पकडण्यासाठी प्रयत्न सुरू होते. दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास वन विभागाच्या अधिकाऱ्यांना बछड्याला पकडण्यात यश आले.
गावकऱ्यांच्या मदतीने बिबट्याला जेरबंद करण्यात आले. दरम्यान, सायंकाळच्या सुमारास वन विभागाचे शेख महेबूब, एफ.ए. अन्सारी, एस.जे. हाश्मी, जी.एल. घुगे आणि एच.यु. वाळके यांनी बिबट्याला परभणीकडे नेले.
दरम्यान बिबट्याला पकडण्यासाठी गजानन टाले, देवीदास हजारे, बळवंते, उत्तम आढे यांच्यासह गावकऱ्यांनी सहकार्य केले.
वर्षभरापूर्वी सापडला होता बिबट्या
इटोली परिसरातील निलज भागात एक वर्षापूर्वी पूर्णा नदीच्या कडेला एक बिबट्या मृतावस्थेत आढळला होता. त्यामुळे या भागात बिबट्या असल्याची भीती शेतकऱ्यांमध्ये तेव्हापासून आहे. अजूनही एक बिबट्या जंगलात असावा, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
बिबट्याचे वय
इटोली परिसरात जेरबंद केलेला हा बिबट्या सहा महिने ते एक वर्षे वयाचा असावा, अशी माहिती वन विभागाच्या वतीने देण्यात आली.