‘मराठी’साठी इंग्रजी शाळा बंद करणे चुकीचे
By Admin | Updated: November 30, 2014 00:56 IST2014-11-30T00:52:09+5:302014-11-30T00:56:07+5:30
लातूर : मराठी भाषा टिकविण्यासाठी इंग्रजी शाळा बंद करायला हव्यात. ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांचे हे वक्तव्य साहित्यकांचा वादविवाद आहे़

‘मराठी’साठी इंग्रजी शाळा बंद करणे चुकीचे
लातूर : मराठी भाषा टिकविण्यासाठी इंग्रजी शाळा बंद करायला हव्यात. ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांचे हे वक्तव्य साहित्यकांचा वादविवाद आहे़ इंग्रजी शाळा बंद करून मराठी टिकेल हे म्हणणे चुकीचे आहे़ मुलांचे करिअर आणि रोजगाराच्या संधी पाहता मराठीसह इंग्रजीशिवाय गत्यंतर नाही, असे ‘लोकमत’ने केलेल्या सर्व्हेक्षणातून पुढे आले आहे़
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी आपल्या भाषणात इंग्रजी माध्यमांच्या शाळा बंद करा, मुलांना मातृभाषेतच स्वप्न पडायला हवीत, असे रोखठोक मत व्यक्त करून नव्या वादाला तोंड फोडले आहे़ या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने शहरातील नागरिकांचे सर्व्हेक्षणातून मत जाणून घेतले आहे़ आजच्या युगात इंग्रजी शिक्षण महत्वाचे असून इंग्रजी माध्यमांच्या शाळा बंद करण्याची मागणी करणे चुकीचे आहे़ मराठी भाषा टिकली पाहिजे़ परंतू इंग्रजीच्या शाळा बंद करून हे शक्य होणार नाही़ स्पर्धेच्या युगात मराठी शाळांनी आपली गुणवत्ता जोपासली पाहिजे़ शिवाय, इंग्रजी शाळांच्या बरोबरीने मराठीबरोबरच इंग्रजी शिक्षणावर भर द्यायला हवा, असे मत व्यक्त करण्यात आले आहे़
मराठीसाठी इंग्रजी शाळा बंद करणे या निर्णयाने मराठी वाढेल काय यावर शंभर नागरिकांची मते जाणून घेण्यात आली़ यापैकी ७३ नागरिकांनी इंग्रजी शाळा बंद करण्याचा निर्णय घेणे चुकीचे असल्याचे मत नोंदविले़ तर २७ नागरिकांनी मराठी टिकविण्यासाठी शासनाने हा निर्णय घ्यायला हवी, असे सांगितले़ इंग्रजी शाळांच्या अतिक्रमणामुळे मराठी व मराठी शाळा नामशेष होत आहेत का? या प्रश्नावर ५४ टक्के नागरिकांनी होकार दर्शविला तर २३ टक्के लोकांनी नकार दर्शविला असून २३ टक्के नागरिकांनी काही प्रमाणात म्हणून उत्तर नोंदविले आहे़
आपला मुलगा कोणत्या शाळेत शिकतो वा शिकावा असे आपणास वाटते? या प्रश्नावर ५१ टक्के नागरिकांनी मराठीला पसंती दिली असली तरी ४९ टक््के लोक आता इंग्रजीची कास धरल्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगत आहेत़
कोणत्या शाळेतून मुलांचे करिअर व्यवस्थित होईल, असे वाटते ? या प्रश्नावर ४९ टक्के पालक इंग्रजीतून करिअर करता येते़ विविध बँका, शासकीय कार्यालये, खाजगी व निमशासकीय कार्यालयात इंग्रजीतच सर्वप्रकारचे अर्ज व नवीन जीआर निघत असल्याने इंग्रजीचा अभ्यास गरजेचा आहे़ एकीकडे मराठी टिकविण्यासाठी चर्चा होत असताना दुसरीकडे मात्र राज्य शासनाचा बहुतांश कारभारच इंग्रजीतून चालत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे़ ५१ टक्के पालक मराठीतूनही करिअर होते, त्यासाठी मराठी गरजेची आहे, मत व्यक्त करीत आहेत़ मराठी वाचवा ही हाक कशासाठी वाटते? यावर ४५ टक्के पालक म्हणतात मराठी जगविण्यासाठी हा निर्णय योग्य आहे़ राजकीय खुर्च्या टिकविण्यासाठी मराठी भाषेचा कांगावा केला जात असल्याचे ३९ टक्के नागरिकांचे मत आहे़ तर १६ टक्के पालकांनी हा साहित्यकांचा वादविवाद असल्याचे मत नोंदविले आहे़