लढतींचे चित्र होणार स्पष्ट !
By Admin | Updated: October 1, 2014 00:46 IST2014-10-01T00:46:21+5:302014-10-01T00:46:21+5:30
उस्मानाबाद : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. छाननीअंती ३५ उमेदवारी अर्ज बाद झाले होते. तर १०८ नामनिर्देशनपत्र वैध ठरले होते.

लढतींचे चित्र होणार स्पष्ट !
उस्मानाबाद : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. छाननीअंती ३५ उमेदवारी अर्ज बाद झाले होते. तर १०८ नामनिर्देशनपत्र वैध ठरले होते. मंगळवारी तुळजापूर मतदार संघातील २ तर उस्मानाबाद मतदार संघातील तिघांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. १ आॅक्टोबर ही उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख असल्याने यानंतर चारही मतदार संघातील प्रमुख लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना आणि भाजप हे चारही पक्ष स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तसेच अपक्षांची संख्याही भरमसाठ आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख १ आॅक्टोबर इतकी आहे. मंगळवार अखेर तुळजापूर आणि उस्मानाबाद या विधानसभा मतदार संघातून अनुक्रमे दोन आणि तीन अशा पाच जणांनी माघार घेतली आहे. यामध्ये तुळजापूर मतदार संघातील अपक्ष उमेदवार सुचीता जीवनराव गोरे आणि अतुल नागनाथ जवान या उमेदवारांनी माघार घेतली आहे.
तसेच उस्मानाबाद मतदार संघातील भीमाशंकर जाधव, केरबा विठ्ठल गाढवे आणि शिवाजी कापसे यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. त्यामुळे आणखी १०३ उमेदवार रिंगणात आहेत. उमेदवारी मागे घेण्यासाठी आणखी एक दिवसाचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे बुधवारी चारही मतदार संघातील प्रमुख लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे.
उमरग्यात बंड नाही
उमरगा विधानसभा मतदारसंघातून गुंजोटी येथील शिवसेनेच्या विलास व्हटकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. उमेदवारी आपल्यालाच मिळावी यासाठी ते आग्रही होते. मात्र एबी फॉर्म विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले यांना गेल्याने व्हटकर यांचा अर्ज सोमवारी बाद ठरला होता.
अशीच स्थिती इतर काही उमेदवारांचीही आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सतीश सरवदे यांची उमेदवारी जाहीर केली होती. मात्र ऐनवेळी प्रा. विजय क्षीरसागर यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एबी फॉर्म देवून त्यांना अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात आले. त्यामुळे सरवदे यांचाही अर्ज एबी फॉर्मअभावी बाद ठरला. त्यामुळे उमरगा मतदारसंघात बंडाचे निशान फडकण्याची शक्यता उरलेली नाही.
(वार्ताहर)
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढण्याचे जाहीर केल्यानंतर तुळजापूर मतदार संघातून उमेदवारीसाठी जिल्हा परिषद सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांचे नाव आघाडीवर होते. निवडणूकीच्या अनुषंगाने धुरगूडे यांनी जोरदार मोर्चेबांधणीही केली होती. ऐनवेळी पक्षाने महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांना निवडणूक रिंगणामध्ये उतरविले. त्यामुळे नाराज झालेल्या धुरगुडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. धुरगुडे माघार घेतील असे, सुरूवातील बोलले जात होते. परंतु, उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी एक दिवस शिल्लक राहिलेला असतानाही त्यांनी उमेदवारी मागे घेतलेली नाही. विशेष म्हणजे त्यांनी उमेदवारी मागे घेवू नये असा आग्रह त्यांच्या समर्थकांचा आहे. दूसरीकडे राष्ट्रवादी पक्षश्रेष्ठींकडून उमेदवारी मागे घेण्यासाठी मनधरणी सुरू आहे. जीवनराव गोरे यांनीही मंगळवारी त्यांच्या घरी जावून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली. मात्र, रात्री उशिरापर्यंत त्यांनी उमेदवारी मागे घेण्यासंदर्भात कुठलाही निर्णय घेतलेला नव्हता. त्यामुळे धुरगुडेंची मनधरणी करण्यात पक्ष श्रेष्ठी यशस्वी होते की नाही, हे बुधवारीच स्पष्ट होेणार आहे.