डागडुजी ठरली औटघटकेची!
By Admin | Updated: December 28, 2015 23:21 IST2015-12-28T23:02:57+5:302015-12-28T23:21:44+5:30
जालना: शहरात केंद्रीय मंत्री येणार असल्यामुळे रस्त्यांची डागडुजी करण्यात आली खरी.. ती सुमार दर्जाची.. यामुळे दोन दिवसांतच या रस्त्यांच्या डागडुजीचे पितळ उघडे पडले आहे.

डागडुजी ठरली औटघटकेची!
जालना: शहरात केंद्रीय मंत्री येणार असल्यामुळे रस्त्यांची डागडुजी करण्यात आली खरी.. ती सुमार दर्जाची.. यामुळे दोन दिवसांतच या रस्त्यांच्या डागडुजीचे पितळ उघडे पडले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यांचे काम केल्याचे माहिती आहे. प्रत्यक्षात हे रस्ते पालिका हद्दीत येत असल्याने बांधकाम विभागाने ही दुरूस्ती का केली हा संशोधनाचा मुद्दा आहे.
जालना शहरात ड्रायपोर्ट तसेच रस्ते कामांच्या भूमिपूजनासाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आले होते. त्यांच्यासाठी रस्त्यांची दिवस- रात्र एक करून खड्डे बुजविण्यात आले. अगदी सुमार दर्जाच्या डागडुजीमुळे खड्डे तसेच रस्ते पुन्हा जैसेथेच झाले आहे. खड्ड्यांमध्ये डांबराचा पत्ताच नाही. रस्ते दुरूस्त करताना ते जाणीवपूर्वक टाकण्यात आले नसल्याचे दिसून येते. कदाचित रस्त्याची पुन्हा दुरूस्ती करण्याची संबंधितांना इच्छा असावी, असा सूर वाहनचालकांतून व्यक्त होत आहे. बसस्थानक रस्त्याची थातूरमातूर दुरूस्ती झाली. विशाल कॉर्नर ते बसस्थानक रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग उरकणार आहे. नगर पालिकेच्या निधीतून लक्कडकोट रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. रस्त्यावर मोठ मोठी खडी अपघाताला निमंत्रदण देत आहे. दोन दिवसांत अनेक दुचाकी चालक खडीवरून घसरले आहेत. काहींना दुखापतही झाली आहे. दुखापतीपेक्षा डांबरीचे किंमत जात असल्याने ती टाकले नाही किंवा त्याची योग्य ती दबाई केल्या नसल्याचा संतप्त सवाल वाहनचालक उपस्थित करीत आहेत. बसस्थानक रस्त्यावर नुसती खडी सर्वांचेच लक्ष वेधून घेते. विना डांबराच्या रस्त्याचे बिल मात्र घसघसशीत निघले असणार यात शंकाच नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग अथवा पालिकेने सर्वच रस्त्यांची दर्जेदार दुरूस्ती करावी, एवढी रास्त अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे.
नगर पालिकेचे मुख्याधिकारी दीपक पुजारी म्हणाले, विशाल कॉर्नर ते बसस्थानक रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. लक्कडकोट रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे काही खड्डे तात्काळ बुजविण्यात आले. पालिका फंडातील हा रस्ता असून हे काम मंजूर झाले आहे. सध्या तात्पुरती दुरूस्ती करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत या रस्त्याचे काम पूर्ण होणार आहे. इतर रस्त्यांच्या कामांनाही मंजुरी मिळाली असून ती कामेही सुरू करण्यात येणार आहेत. नगर पालिकेच्या कामांत दर्जा राखण्यात येणार असल्याचा दावा मुख्याधिकारी पुजारी यांनी केला.