महिनाभरापूर्वीच झालो होतो प्रदेशाध्यक्ष : रावसाहेब दानवे
By Admin | Updated: February 5, 2015 00:53 IST2015-02-05T00:51:29+5:302015-02-05T00:53:51+5:30
उस्मानाबाद : प्रदेशाध्यक्ष म्हणून आज मी तुमच्यासमोर येत असलो तरी निवड जाहीर व्हायच्या एक महिना अगोदरच प्रदेशाध्यक्ष म्हणून माझे नाव निश्चित झाले होते

महिनाभरापूर्वीच झालो होतो प्रदेशाध्यक्ष : रावसाहेब दानवे
उस्मानाबाद : प्रदेशाध्यक्ष म्हणून आज मी तुमच्यासमोर येत असलो तरी निवड जाहीर व्हायच्या एक महिना अगोदरच प्रदेशाध्यक्ष म्हणून माझे नाव निश्चित झाले होते, असा गौप्यस्फोट भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला. विधानसभा निवडणुकीत तुम्ही हिंमतीने मते घेतली आहेत. हिंमत दाखविणाऱ्यांच्या पाठिशी राहण्याचा माझा स्वभाव आहे. त्यामुळे या जिल्ह्याला वेगळ्या पालकमंत्र्याची गरज नाही. यापुढे या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे पालकत्व मी स्वत: स्वीकारणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
प्रदेशाध्यक्ष निवडीसंदर्भात चर्चा सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मला बोलावून घेतले. केंद्रात गरज होती म्हणून तुम्हाला बोलावले. पण, महाराष्ट्र भाजपासाठी आता तुमची गरज आहे. त्यामुळे पुन्हा महाराष्ट्रात जायचे की केंद्रात राहण्याची तुमची इच्छा आहे, असे त्यांनी विचारले. यावर एवढा मोठा निर्णय मी कसा घेऊ? तुम्ही सांगाल ती जबाबदारी स्वीकारेन, असे मी त्यांना सांगितले. त्याच वेळी प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी माझ्या खांद्यावर आली होती. मात्र, निवड जाहीर होईपर्यंत मी याबाबत एक शब्दही कोणाशी बोललो नसल्याचे सांगत एखादी गोष्ट पोटात ठेवताही आली पाहिजे, असे ते म्हणाले. आयुष्यात २३ निवडणुका लढविल्या. त्यातील २२ निवडणुका जिंकल्याचे सांगत कामानेच माणूस मोठा होतो. कसलाही राजकीय वारसा नसताना ग्रामपंचायत सदस्य ते केंद्रीय मंत्री या सर्व जबाबदाऱ्या मी प्रामाणिकपणे सांभाळल्या. त्यामुळेच मागणी केलेली नसतानाही प्रत्यके पद माझ्याकडे चालून आल्याचे ते म्हणाले. येणाऱ्या निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व जागा जिंकण्याची खुणगाठ बांधा, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
प्रदेश सरचिटणीस सुजीतसिंह ठाकूर यांनी पक्ष नोंदणीवर लक्ष केंद्रीत करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. कालपर्यंत ४१ लाख सदस्य नोंदणी झाली असून, ३१ मार्चपर्यंत १ कोटी सदस्य नोंदणी करण्यात भाजपाला यश येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बैठकीला रोहन देशमुख, अविनाश कोळी, अॅड. अनिल काळे, संताजी चालुक्य, रामभाऊ पडवळ, धनंजय शिंगाडे, लक्ष्मण माने, सत्यवान सुरवसे, रामदास कोळगे, तालुकाध्यक्ष शिंगाडे, बंटी मंजुळे, रेवण भोसले आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)