स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा आली बस
By Admin | Updated: December 16, 2014 01:05 IST2014-12-16T00:44:39+5:302014-12-16T01:05:51+5:30
बाळासाहेब जाधव , लातूर प्रवाशांना सुखकर व सुरक्षीत प्रवासाची हमी देणारी एसटीची सेवा ६८ वर्षाच्या पाठपुराव्यानंतर इंदरठाण्यात येत्या दोन दिवसात पोहोचणार

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा आली बस
बाळासाहेब जाधव , लातूर
प्रवाशांना सुखकर व सुरक्षीत प्रवासाची हमी देणारी एसटीची सेवा ६८ वर्षाच्या पाठपुराव्यानंतर इंदरठाण्यात येत्या दोन दिवसात पोहोचणार असल्याने एसटीच्या स्वागतासाठी इंदरठाणा, सांगवी, आरजखेडा, दर्जीबोरगाव या गावातील ग्रामस्थ सज्ज झाले आहेत़
‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ या ब्रीदवाक्याने सेवा देणारी लातूरची एसटी वर्षभरातील उत्पन्नात राज्यात प्रथम क्रमांकावर आली आहे़ तरीही लातूर जिल्ह्यातील बऱ्याच गावात स्वातंत्र्याला ६८ वर्षे पूर्ण झाले असतानाही बऱ्याच गावात अजूनही एसटी जात नाही़ परिणामी जिल्ह्याच्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी या भागातील प्रवाशांना एक ते दीड किलोमीटरचा नागझरी पर्यंतचा प्रवास करावा लागत आहे़ अशी अवस्था रेणापूर तालुक्यातील इंदरठाणा गावाचीही झाली होती. त्यामुळे याबाबत ग्रामस्थांनी गावात एसटी सुरु व्हावी, यासाठी त्यांनी लातूरच्या विभाग नियंत्रक कार्यालयाकडे निवेदनही दिले होते़
परंतु, या गावाकडे जाणारा रस्ताच चांगला नसल्याने बसची सोय करणे शक्य नव्हते़ परिणामी इंद्रठाणा या गावातील नागरिकांना लातूरला ये- जा करण्यासाठी नागझरीपर्यंत एक-दीड किलोमीटरचा प्रवास पायी करावा लागत होता़ परिणामी, शालेय विद्यार्थ्यासह वृध्दांचीही गैरसोय होत होती. ही दूरदृष्टीता लक्षात घेऊन इंदरठाण्याचे सरपंच रौफ पटेल, जफर पटेल, प्रशांत स्वामी, बलभीम घोडके, सांगवीचे सरपंच भीमाशंकर जाधव, डॉ़नितीन भराटे यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर या मार्गावरील मांजरा नदीवरील पुलाचे व रस्त्याचेही काम मार्गी लागले. त्यामुळे गावात आता तरी एसटी सुरू होणार, अशी अपेक्षा गावातील लोकप्रतिनिधीसह ग्रामस्थांनाही वाटत होती़ परंतु, एसटी कधी सुरु होणार हा दिवस माहीत नव्हता. परंतु विभाग नियंत्रक डी़बी़ माने यांच्या दूरदृष्टीतून ६८ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर इंदरठाणेकरांना बुधवारी बसने प्रवास करण्याची संधी उपलब्ध होणार आहे़