संस्कारित होते, आता सुसंस्कारित झाले
By Admin | Updated: May 25, 2016 00:02 IST2016-05-24T23:59:01+5:302016-05-25T00:02:02+5:30
औरंगाबाद : ‘आम्ही संस्कारित होतो, पण शिबिरातील मार्गदर्शनामुळे आम्ही सुसंस्कारित झालो... रागीट स्वभाव कमी होऊन आता आदर करण्यास शिकलो.

संस्कारित होते, आता सुसंस्कारित झाले
औरंगाबाद : ‘आम्ही संस्कारित होतो, पण शिबिरातील मार्गदर्शनामुळे आम्ही सुसंस्कारित झालो... रागीट स्वभाव कमी होऊन आता आदर करण्यास शिकलो... आई-बाबा, आमच्या हातून भविष्यात असे कोणतेही कार्य घडणार नाही, ज्याने तुम्हाला मान खाली घालावी लागेल’, अशा भावना युवती व्यक्त करत असताना साऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते... आपल्या मुलीच्या स्वभावातील बदल पाहून आई-वडिलांचे हृदयही भरून आले.
प्रसंग होता...चंद्रसागर दिगंबर जैन धर्मशाळा व भारतीय जैन संघटनेच्या वतीने आयोजित युवती सक्षमीकरण शिबिराच्या समारोपाचा. शहागंज येथील जैन धर्मशाळेत तीनदिवसीय शिबिराच्या समारोप सोहळ्यात युवतींनी आपले अनुभव मांडण्यास सुरुवात केली, तेव्हा संपूर्ण वातावरण भावनिक झाले होते. लोकमतचे संपादक सुधीर महाजन हे या भावनिक क्षणांचे साक्षीदार ठरले. यावेळी व्यासपीठावर चंद्रसागर जैन धर्मशाळेचे अध्यक्ष डॉ. प्रकाश पापडीवाल, सचिव आनंद सेठी, भारतीय जैन संघटनेचे माजी अध्यक्ष गौतम संचेती, अध्यक्ष प्रफुल पारीख, खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत पार्श्वनाथ मंदिरचे अध्यक्ष ललित पाटणी, माणिकचंद गंगवाल, एम.आर.बडजाते, प्रशिक्षक रत्नाकर महाजन, मनीषा भन्साली आदींची प्रमुख उपस्थिती होती. ‘कौन सुने गा, किस को सुना ये, इसलिए चूप रहते है’ अशी स्वरचित कविता म्हणत साक्षी संचेती हिने आजच्या तरुणींची व्यथा मांडली. शिबिराने जीवनाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन मिळाला, अशी भावना सुहानी जैन हिने व्यक्त केली. पल्लवी भंडारी म्हणाली की, कोणालाही कमी लेखू नये हे आम्ही शिकलो. या शिबिराने आत्मविश्वास वाढला, असे श्रुतिका लोहाडे म्हणाली. आई-वडिलांनी दिलेल्या स्वातंत्र्याचा आम्ही कधी गैरफायदा घेणार नाही, असे वचन समीक्षा जैन हिने दिले. शिबिराने आमच्या जीवनाला एक नवी कलाटणी मिळाली, अशा भावना युवतींनी व्यक्त केल्या. प्रत्येक युवती आई-वडिलांना वचन देत होती तेव्हा साऱ्यांचे हृदय अभिमानाने भरून आले होते.