दोन मिनिटे लागली एका पदवीधरच्या मतदानाला

By | Updated: December 3, 2020 04:10 IST2020-12-03T04:10:12+5:302020-12-03T04:10:12+5:30

औरंगाबाद : शहरात पदवीधर मतदारांचा उत्साह दिसून आला. शहरातील ११७ मतदान केंद्रांवर एकूण मतदानाच्या अंदाजे ६५ टक्के मतदानाची नोंद ...

It took two minutes for a graduate to vote | दोन मिनिटे लागली एका पदवीधरच्या मतदानाला

दोन मिनिटे लागली एका पदवीधरच्या मतदानाला

औरंगाबाद : शहरात पदवीधर मतदारांचा उत्साह दिसून आला. शहरातील ११७ मतदान केंद्रांवर एकूण मतदानाच्या अंदाजे ६५ टक्के मतदानाची नोंद झाली. सकाळी ८ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाल्यानंतर शहरातील बहुतांश केंद्रांवर पदवीधर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. एका मतदाराला मतदानासाठी २ मिनिटांचा अवधी लागत होता. त्यामुळे सकाळच्या सत्रात मतदान संथ गतीने सुरू होते. दुपारनंतर मतदानाला वेग आला. दरम्यानच्या काळात पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या पदवीधर मतदारांची केंद्रांवर गर्दी होत गेली. केंद्रावर रांगेत उभ्या असलेल्या अनेक ज्येष्ठ मतदारांना नवमतदारांनी मतदान कसे करावे, मत बाद कसे होते याची माहिती विचारून मतदान केले.

शहरात गजानन महाराज मंदिर परिसर, हडको, सिडको, मुकुंदवाडी, जिल्हा परिषद, औरंगपुरा, उस्मानपुरा, चिकलठाणा, पुंडलिकनगर परिसर, जवाहर कॉलनी, अजबनगर, हर्सूल, नागसेनवन, लेबर कॉलनी, एन-७ आदी परिसरात मतदान केंद्रे होती. सर्वच केंद्रांवर मतदारांचा उत्साह होता. वृद्ध, तरुण, मध्यमवयीन मतदारांची गर्दी मतदान केंद्रांवर होती. ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेद्वारे हे मतदान होते. मतपत्रिकेवर क्रमांक लिहिणे, तत्पूर्वी घडी मारून मतपत्रिका घेणे, मत नोंदविल्यावर तशीच घडी मारून मतपेटीत टाकणे या प्रक्रियेमुळे प्रत्येकाला उशीर लागला.

दुपारनंतर मोबाईल बंदीचा आदेश

मतदान करताना, पहिल्या पसंतीचे मत नोंदविताना फोटो काढून ते सोशल मीडियावर टाकण्याच्या प्रकारामुळे दुपारनंतर शहरात आणि ग्रामीण भागात मतदान केंद्रांच्या आत मोबाईल नेण्यास बंदीचे आदेश प्रशासनाने जारी केले. विभागातील काही जिल्ह्यांतील व्हिडिओदेखील सोशल मीडियातून व्हायरल झाले होते.

सर्वच केंद्रांवर राजकीय नेत्यांची गर्दी

कडा ऑफिस येथील मतदान केंद्रावर भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी भेट देऊन आढावा घेतला. भाजपकडून खा. डॉ. भागवत कराड, आ. अतुल सावे, शिवसेना आ. अंबादास दानवे, विधानसभा संघटक राजू वैद्य, विश्वनाथ स्वामी यांच्यासह छाया जंगले, कदीर मौलाना आदींनी मतदानाचा आढावा घेतला.

स्वयंस्फूर्तीने मतदान केंद्रांवर

इतर निवडणुकींमध्ये पक्षाची यंत्रणा मतदार बाहेर काढण्यासाठी लावलेली असते; परंतु यावेळी मतदार स्वत: केंद्रांवर पोहोचले. स्वयंस्फूर्तीने मतदार आल्यामुळे मतदानाचा टक्का वाढत गेला. हायटेक प्रचारामुळे प्रत्येक मतदाराला व्हॉटस्‌अ‍ॅपद्वारे पोलिंग चीट देण्यात आल्याने मतदार उमदेवारांच्या तंबूवर जाण्याऐवजी थेट मतदान केंद्रांत गेले.

Web Title: It took two minutes for a graduate to vote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.